२९ मार्च २०२०

स्वाईन फ्ल्यू संकलित माहिती

स्वाइन फ्लू रोगाची लक्षणे

हा एक लेख स्वाईन इन्फ्लुएन्झा या रोगाबद्दल असून यास स्वाईन फ्लू/स्वाईन फ्ल्यू असेही म्हटले जाते.

आजाराची कारणे

स्वाईन इन्फ्लूएन्झा किंवा स्वाईन फ्लू हा इन्फ्लुएन्झा ह्या रोगाचा एक प्रकार आहे ; हा सामान्यतः डुक्करामध्ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे होतो. डुक्करांमध्ये सतत वावरणाऱ्या माणसाला ह्या विषाणूची बाधा होऊ शकते. स्वाइन फ्लू हा एक संसर्गजन्य रोग आहे, ार्थात तो एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे प्रसारित होऊ शकतो.

डुकराचे शिजवलेले मांस खाण्याचा या रोगाशी संबध नाही. त्या प्रमाणेच भारतात २००९मधील स्वाइन इन्फ्लूएन्झाची साथसुद्धा भारतातील डुकरांमुळे आलेली नव्हती, तर ती अमेरिका खंडातील मेक्सिको देशातील डुकरांपासून सुरू झलेलि होती.

संसर्ग

स्वाईन फ्लू या रोगाचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे होतो. याचा संसर्ग माणसाद्वारे सुद्धा होतो. रोग्याच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम वा त्याची थुंकी यांमधून या विषाणूंचा प्रसार होतो. स्वाईन फ्लूचे विषाणू हे हवेत साधारणतः 8 तास जीवंत राहतात.

आजाराची लक्षणे

ताप येणे, खोकला येणे, घसा दुखणे, अतिसार, उलट्या होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची काही लक्षणे आहेत. टॅमी फ्ल्यू हे औषध एच-१ एन-१ च्या विषाणूच्या संसर्गावर प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. या औषधाचा भारत सरकारकडे पुरेसा साठा असतो. तथापि, या औषधांचा वापर या विषाणूंचा संसर्ग झाल्याचे नक्की झाल्यावरच होणे आवश्यक आहे. या औषधास विषाणूंकडून प्रतिरोध निर्माण होऊ नये यासाठी शासन ही काळजी घेत असते.

टॅमी फ्ल्यू याा गोळ्यांशिवाय , एन ९५, मास्क आणि सर्जिकल मास्क वगैरे वैयक्तिक संरक्षक साधनांचा पुरेसा साठा भारत सारकारकडे असतो. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तसेच बंदरांवर येणाऱ्या परदेशी प्रवाशांची तपासणी वैद्यकीय पथकांच्या साहाय्याने करण्यात येते. २०१४ साली हा आजार महाराष्ट्रातही आला असून पुणे-मुंबईमध्ये आणि नाशिक जिल्ह्यामधील चांदवड, निफाड व मनमाड येथेही या रोगाचे रुग्ण सापडले आहेत.

आजार कसा टाळावा ?

१. हात नेहमी साबण-पाण्याने धुवावेत.

२. गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे.

३. स्वाईन फ्ल्यू रुग्णापासून किमान एक हात तरी दूर राहावे.

४. खोकताना- शिंकताना तोंडाला रुमाल लावावा.

५. भरपूर पाणी प्यावे व पुरेशी झोप घ्यावी.

६. पौष्टिक आहार घ्यावा.

७. हस्तांदोलन करण्याचे अथवा आलिंगन देण्याचे, व सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे टाळावे.

८. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे.

९. आजारी असल्यास शक्य तितक्या कमी लोकांशी संपर्क ठेवावा व घरीच विश्रांती घ्यावी.

१०. आहारात पातळ पदार्थ मोठ्या प्रमाणात घ्यावेत. . ११. तोंडावर मास्क लावावा.

उपचारानंतर दहा दिवसांत रुग्ण बरा होऊ शकतो.

रोग निदान, विषाणू तपासणी

स्वाईन फ्ल्यूचे प्राथमिक निदान लक्षणांवर आधारित आहे. निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत पाठवावा लागतो.रुग्णाच्या विषाणू तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही), पुणेव राष्ट्रीय संचारी रोग संस्था ("नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिजेस'-एनआयसीडी), दिल्ली येथे प्रयोगशाळा तपासणीची व्यवस्था उपलब्ध आहे.

उपचार

कोणत्याही खासगी वैद्यकांना, खासगी डॉक्टरांना अथवा खासगी रुग्णालयांची स्वाईन फ्लूवर उपचार करण्याची क्षमता नसून, त्यांना तशी परवानगीही नाही. या रोगाचे उपचार राज्य स्वाईन फ्ल्यू नियंत्रण कक्ष अथवा मान्यताप्राप्त शासकीय रुग्णालयातच उपलब्ध असतात, आणि तसे ते शासकीय रुग्णालयातूनच घेणे बंधनकारक आहे.जर एखादी व्यक्ती या रोगाने आजारी असेल, विषाणू प्रतिबंधक औषधे त्याचे आजार काही प्रमाणात कमी करू शकतात व त्यामुळे रोग्यास लवकर बरे वाटू शकते. लवकरात लवकर (लक्षणे दिसून आल्यावर दोन दिवसात) उपचार सुरु केल्यास, औषधांचा खूप फायदा होतो. विषाणू प्रतिबंधक लस घेण्याखेरीज घरात अथवा इस्पितळात पूरक देखभाल केल्यास ताप कमी होऊ शकतो तसेच यातना कमी होऊ शकतात. त्याप्रमाणेच, माध्यमिक संक्रमण व इतर आरोग्यविषयक समस्या ओळखू येतात.

प्रतिबंधक लस

या रोगाच्या विविध प्रकारांना प्रतिबंध करणाऱ्या विविध लसी उपलब्ध आहेत.
१५ सप्टेंबर २००९ ला अमेरिकन एफडीए ने स्वाइन फ्ल्यूसाठी पहिली लस प्रामाणित केली.
ती घेतली की १० दिवसांत शरीरामध्ये प्रतिबंधक रसायने तयार होतात.
अध्ययनातून असे लक्षात आले की, या लसी परिणामकारक तसेच सुरक्षितही आहेत.स्कॉटलंडमध्ये (२५डिसेंबर२००९ पूर्वी) लस घेतलेल्या २,४८,००० लोकांचे सर्वेक्षण केल्यावर असे लक्षात आले की, ९५% लोकांवर तिचा परिणाम झाला आहे

करोनाला झुंजवणाऱ्या चार प्रतिकारक पेशींचा शोध :

करोना विषाणूला मानवी शरीरातील प्रतिकारशक्ती प्रणाली कशा प्रकारे प्रतिसाद देते याचा अभ्यास ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांनी केला असून त्यांच्या मते लहान मुलातील प्रतिसाद यात सर्वात प्रखर असतो व वृद्धांमधील प्रतिसाद सर्वात क्षीण असतो. करोना विषाणूचा मानवी शरीर नैसर्गिक पातळीवर प्रतिकार करताना प्रतिपंड तयार होत असतात त्यांचा अभ्यास केल्याने आता या विषाणूवर औषध शोधणे सोपे जाणार आहे.

करोनाची लागण झालेल्या रुग्णांचा अभ्यास ऑस्ट्रेलियातील  संशोधकांनी केला असून त्यात रक्ताच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. ‘नेचर मेडिसिन’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून त्यात म्हटले आहे की, प्रथमच करोनाला मानवी प्रतिकारशक्तीकडून दिला जाणारा प्रतिसाद नोंदला गेला आहे.

मेलबर्न विद्यापीठातील पीटर डोहर्थी इन्स्टिटय़ूट फॉर इनफेक्शन अ‍ॅण्ड इम्युनिटी या संस्थेतील संशोधक कॅथरिन केडझिरन्स्का यांनी म्हटले आहे की, मानवी प्रतिकारशक्ती करोना विषाणूला जोरदार प्रतिसाद देत असते असे दिसून आले आहे. जे लोक दगावतात त्यांची प्रतिकारशक्ती क्षीण झालेली असते.

एक महिला तीन दिवस बरीच आजारी दिसत होती पण नंतर ती व्यवस्थित बरी झाली. मध्यम तीव्रतेच्या आजारात तरी प्रतिकारशक्ती चांगली काम करताना दिसली आहे. जे लोक बरे झाले त्यांच्यात नेमके कुठले घटक प्रभावी ठरले व जे मरण पावले त्यांच्यात कुठले घटक कमी पडले याचा शोध घेण्यात यश आल्याचा दावा करण्यात आला आहे. यातून विषाणूतज्ञांना लस तयार करणे सोपे जाणार आहे. 

कौशल्य वाढविण्यासाठी IIT गांधीनगर ‘प्रोजेक्ट ISSAC’ उपक्रम.

भारतीय तंत्रज्ञान संस्था, गांधीनगर (IIT-GN) ही संस्था देशात लागू असलेल्या संचारबंदीच्या परिस्थितीत घरातच असताना त्यांच्या विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी कल्पनाक्षम प्रकल्पांमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी ‘प्रोजेक्ट ISSAC’ नावाचा नवा उपक्रम राबवित आहे.

हा कार्यक्रम तयार करण्यास प्रसिद्ध शास्त्रज्ञ ‘सर आयझॅक न्यूटन’ यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेमधून प्रेरणा घेतली. केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये शिकत असताना 1665 साली लंडनमध्ये आलेल्या ग्रेट प्लेगच्या साथीमुळे त्यांना घरी पाठविण्यात आले होते. तेव्हा ते 22 वर्षांचे होते. त्या काळात त्यांनी कॅल्क्यूलस तसेच ऑप्टिक्स आणिगुरुत्वाकर्षणासंबंधी त्यांचे सिद्धांत यासह अनेक गहन शोध लावले होते.

कार्यक्रमाचे स्वरूप...

प्रकल्पाचा भाग म्हणून, लेखन, चित्रकला, कोडिंग, संगीत, कल्पक विधान अश्या अनेक नवीन कौशल्यांचा विद्यार्थ्यांमध्ये विकास करण्यासाठी संस्थेतर्फे चार वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतात.

💠विद्यार्थ्यांना लिखानाची सवय लावण्यासाठी टीव्ही, इंटरनेटवर उपलब्ध मनोरंजक मालिका / चित्रपट / नेत्यांचे संबोधन अश्या चित्रफिती बघून त्याविषयी अहवाल आणि त्यांचे विचार लिहिणे, कम्प्युटर कोडिंगसंबंधी 12 दिवसांची स्पर्धा, अश्या अनेक स्पर्धांचा समावेश आहे.

२८ मार्च २०२०

मराठी व्याकरण अलंकार

अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे. दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते. तसेच लेखक कवी आपल्या मनातील आशय सुंदर, आकर्षक शब्दांतून, विविध कल्पनांनी सजवून व्यक्त करतात. यालाच आलंकारिक भाषा म्हणतात.  

अलंकार हा मुळातले सौंदर्य वाढवणारा घटक आहे.  

🔹उदा.

ढगांशी वारा झुंजला रे

काळाकाळा कापुस पिंजला रे

आतां तुझी पाळी, वीज देते टाळी

फुलव पिसारा नाच !              

🟤भाषेचे अलंकार :-🟤

🔸भाषेला ज्या गुणधर्मामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात.  

🔹केव्हा दोन वस्तूंतील साम्य दाखवून, तर केव्हा विरोध दाखवून , केव्हा नाद निर्माण करणारे शब्द वापरुन, तर केव्हा एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगून आपण आपली भाषा अधिक सुंदर किंवा पारिणामकारक करण्याचा प्रयत्न करतो.                

🔹केव्हा शब्दांतील अक्षररचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते तर केव्हा योजिलेल्या शब्दांमुळे अर्थांचे सौदर्य खूलून दिसते.                

🔹भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार पडतात.🔹   

१. शब्दालंकार  

२. अर्थालंकार         

🟤शब्दालंकार🟤      

शब्दालंकार अलंकाराचे तीन उपप्रकार आहेत ते पुढीलप्रमाणे

अ) अनुप्रास अलंकार :-  

एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेंव्हा त्याला सौदर्य प्राप्त होते तेंव्हा अनुप्रास हा अलंकार होतो.

उदाहरणार्थ            

गडद गडद निळे जलद भरुनी आले, 

शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले.            

पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी ।

गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी ।       

🔹ब) यमक अलंकार :-

कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक या अलंकार होतो.          

उदाहरणार्थ              

राज्य गादीवरी । काढी तुझ्या आठवणी

फळा आली माय । मायेची पाठवणी

🔹पुष्पयमक या यमकाचे उदाहरण

सुसंगती सदा घडो,  

सृजनवाक्य कानी पडो, 

कलंक मातीचा झडो, 

विषय सर्वथा नावडो

🔹दामयमक या यमकाचे उदाहरण

आला वसंत कवीकोकील हाही आला, 

आलापितो सुचवितो अरुणोदयाला

🔹क) श्लेष अलंकार :-         

वाक्यात किंवा पद्यचरणात एकच शब्द दोन किंवा दोहोंपेक्षा जास्त अर्थांनी वापरल्यामुळे शब्दचमत्कृती साधली जाते, तेव्हा श्लेष अलंकार होतो.

एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेंव्हा शब्दचमत्कृती साधते तेंव्हा श्लेष हा अलंकार होतो.     

उदाहरणार्थ

मित्राच्या उद्याने कोणाला आनंद होत नाही.- अभंग श्लेष

हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस.- अभंग श्लेष          

ते शीतललोपचारे जागी झाले हळूच मग बोले

औषध नलगे मजला, परिसुनी माता बरे म्हणुनी डौले- अभंग श्लेष

श्रीकृष्ण नवरा मी नवरी  

शिशुपाल नवरा मी न-वरी- सभंग श्लेष  

कुस्करु नका ही सुमने  

जरी वास नसे तीळ यास, तरी तुम्हास अर्पिली सु-मने- सभंग श्लेष            

वरील ओळींमधील नवरी, न-वरी, सुमने, सु-मने, नलगे, न-लगे अशा रीतीने त्या त्या शब्दांची फोड केल्यानंतर दोन अर्थ कळून येतात या प्रकारच्या श्लेषाला सभंग श्लेष व एकच शब्द जसाच तसा ठेवून त्याचे दोन अर्थ संभवतात त्यास अभंग श्लेष म्हणतात.           

श्लेष हा शब्दालंकार आहे आणि अर्थालंकार ही आहे.

🟤अर्थालंकार🟤

अर्थालंकार अलंकाराचे काही उपप्रकार पुढीलप्रमाणे :-

१) उपमा अलंकार :-

दोन वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्णरीतीने जिथे वर्णन केलेले असते तिथे उपमा हा अलंकार होतो.

उदाहरणार्थ  

अ) मुंबईची घरे मात्र लहान, कबुतराच्या खुराड्यासारखी 

आ) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी 

इ) आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे 

🟤२) उत्प्रेक्षा अलंकार :-🟤

उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यातील एक म्हणजेच उपमेय हि जणू काही दुसरी वस्तूच म्हणजेच उपमानच आहे, अशी कल्पना करणे यालाच उत्प्रेक्षा म्हणतात.

उदाहरणार्थ

ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू.

अत्रीच्या आश्रमी, नेले मज वाटे, माहेरची वाटे, खरेखुरे

किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची कितीतरी मजेदार  

शिरोभागी तांबडा तुरा हाले, जणू जास्वंदी फुल उमललेले  

अर्धपायी पंढरीशी विजार, गमे विहंगातीत बडा फौजदार

🟤३. अपन्हुती अलंकार🟤

उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेंव्हा सांगितले जाते तेंव्हा अपन्हुती अलंकार होतो.

उदाहरणार्थ- 

आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी  

ती हाक येई कानी, मज होय शोककारी  

नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी

ओठ कशाचे ? देठची फुलले पारिजातकाचे              

हे हृद्य नसे, परी स्थंडिल धगधगलेले   

मानेला उचलीतो, बाळ मानेला उचलितो  

नाही ग बाई, फणा काढुनी नाग हो डोलतो 

🟤४. रूपक अलंकार 🟤  

उपमेय व उपमान यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे जेथे वर्णन असते तिथे रूपक अलंकार होतो.   

उदाहरणार्थ  

लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार दयावा तशी मूर्ती घडते.

उठ पुरुषोत्तमा, वाट पाहे रमा  

दावी मुखचंद्रमा सकळीकांसी

बाई काय सांगो, स्वामीची ती दृष्टी  

अमृताची वृष्टी, मज होय.              

🟤५. व्यतिरेक अलंकार🟤

उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर व्यतिरेक हा अलंकार होतो.   

उदाहरणार्थ  

अमृताहून गोड, नाम तुझे देवा             

कामधेनुच्या दुग्धाहुनही ओज हीच बलवान       

तू माउलीहून मयाळ, चंदाहून शीतळ, 

पानियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा         

सावळा ग रामचंद्र, रत्नमंचकी झोपतो,

त्याला पाहता लाजून, चंद्र आभाळी लोपतो    

🟤६. अनन्वय अलंकार 🟤

उपमेयाला दुस-या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणजे जेंव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेंव्हा अनन्वय अलंकार होतो. अन्वय = संबंध    

उदाहरणार्थ  

झाले बहु, होतील बहु, आहेताही बहु, परंतु यासम हा

आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी

या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान     

🟤७. भांतीमान अलंकार 🟤      

उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती घडली तर तिथे भ्रांतीमान अलंकार असतो.        

उदाहरणार्थ 

हसा विलोकुनी सुधाकर अष्टमीचा, 

म्या मनिला नितीलदेश तिचाच साचा  

शंख द्वयी धरुनी कुंकुम किरवाणी  

लावाक्या तिलक लांबविला स्वपाणी            

भृंगे विराजित नवी अरविंदपत्रे, 

पाहुनी मानुनी तिचीच विशाल नेत्रे  

घालीन अंजन अशा मातीने तटाकी  

कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी     

न्या. भूषण धर्माधिकारी यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 20 मार्च 2020 रोजी न्या. भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ दिली.

दिनांक 28 एप्रिल 1958 रोजी जन्मलेल्या न्या. धर्माधिकारी यांनी दिनांक 17 ऑक्टोबर 1980 रोजी वकील म्हणून नोंदणी केली.

त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दिवाणी, घटनात्मक, कामगार तसेच सेवासंबंधी प्रकरणांमध्ये वकिली (प्रॅक्टीस) केली.

न्या. धर्माधिकारी यांची दिनांक 15 मार्च 2004 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली तर दिनांक 12 मार्च 2006 रोजी त्यांची स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग फेब्रुवारी महिन्यात निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी न्या. भूषण धर्माधिकारी यांची प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

निधन सतीश गुजराल

●  सुप्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार सतीश गुजराल यांचं निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. भारताचे माजी पंतप्रधान इंद्र कुमार गुजराल यांचे ते भाऊ होते.

● कला क्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारने १९९९ मध्ये पद्म विभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. याचसोबत सतीश गुजराल यांना तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.

● दोन राष्ट्रीय पुरस्कार चित्रकलेतील योगदानासाठी आणि एक राष्ट्रीय पुरस्कार शिल्पकलेतील योगदानासाठी देण्यात आला आहे.

● सतीश गुजराल यांचा जन्म २५ डिसेंबर १९२५ रोजी झाला होता. त्यांनी लाहोर येथील मेयो स्कूल ऑफ आर्टमधून शिल्पकला आणि ग्राफिक डिझाईन याचं प्रशिक्षण घेतलं होतं.

● १९४४ मध्ये ते मुंबईत निघून आले. त्यानंतर त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून कलेचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली मात्र १९४७ मध्ये ते आजारी झाले. त्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. आपल्या वेगळ्या शैलीच्या चित्रकलेसाठी ते ओळखले जातात. त्यांची चित्रं भावनाप्रधान असतात.

● अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनीही सतीश गुजराल यांचा सन्मान करण्यात आला आहे. मेक्सिकोचा लिओ नार्डो द विन्सी आणि बेल्जियम येथील राजातर्फे गार्ड ऑफ क्राऊन या पुरस्कारांचा यामध्ये समावेश आहे.

● वैविध्यपूर्ण आकृत्यांमधून चित्र उलगडलं जाणं ही त्यांच्या चित्रांची खास शैली होती. पशू, पक्षी हे त्यांच्या चित्रांमधला एक प्रमुख भाग आहेत. इतिहास, लोककथा, पुराण, प्राचीन भारतीय संस्कृती आणि विविध धर्मांमधील प्रसंग त्यांनी आपल्या कॅनव्हासवर आणले.

चर्चित व्यक्ती रंजन गोगोई

• माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची सरकारने राज्यसभेवर निवड केली.

•  राष्ट्रपती नियुक्त सदस्यांपैकी एकाच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेली जागा भरण्यासाठी घटनेच्या अनुच्छेद ८०(१)(अ) अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून राष्ट्रपतींनी रंजन गोगोई यांची राज्यसभेवर नियुक्ती केली काँग्रेसचे केटीएस तुलसी यांच्या निवृत्तीमुळे ही जागा रिक्त झाली होती.

• ऐतिहासिक अयोध्या खटल्याचा गेल्या वर्षी ९ नोव्हेंबरला निकाल देणाऱ्या पाच सदस्यांच्या खंडपीठाचे अध्यक्ष गोगोई हे होते. त्याच महिन्यात १७ तारखेला ते निवृत्त झाले.

• ३ ऑक्टोबर २०१८ रोजी न्या. गोगोई यांनी सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारली होती.

• शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश आणि राफेल विमान खरेदीचा व्यवहार यांसारख्या प्रकरणांत निकाल देणाऱ्या खंडपीठांचेही ते प्रमुख होते.

•  राफेल खरेदी प्रकरणात चौकशीची मागणी त्यांच्या खंडपीठाने दोनदा फेटाळून लावली होती.

• गेल्या वर्षी न्या. गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोपही झाला होता. मात्र, आपल्याविरोधात हे षडम्यंत्र असल्याचा आरोप न्या. गोगोई यांनी केला होता. या प्रकरणात ते निर्दोष असल्याचे चौकशी समितीने म्हटले होते.

• ९ सप्टेंबर २०१० रोजी न्या. गोगोई यांची पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली होती.
त्यानंतर १२ फेब्रुवारी २०११ रोजी न्या. गोगोई यांना पंजाब व उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी पदोन्नती देण्यात आली.

• २३ एप्रिल २०१२ रोजी न्या. गोगोई यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली.

निधन पी. के. बॅनर्जी

● भारताचे महान फुटबॉलपटू पी. के. बॅनर्जी यांचे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.

● भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ अनुभवताना आघाडीवीर म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. १९६२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

● पश्चिम बंगालमधील जलपायगुरी येथे २३ जून १९३६ जन्मलेल्या बॅनर्जी यांचे कुटुंब फाळणीच्या आधी जमशेदपूर येथे राहात होते.

● १९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये त्यांनी फ्रान्सविरुद्धची लढत १-१ अशी बरोबरीत सोडवणारा गोल लगावला होता.

● त्याचबरोबर १९६२च्या जकार्ता आशियाई स्पर्धेत त्यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.

● भारतीय फुटबॉलमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) बॅनर्जी यांचा २०व्या शतकातील भारताचे महान खेळाडू म्हणून गौरव केला होता. तसेच त्यांना विशेष सन्माननीय पदकही फिफाकडून देण्यात आले होते.

● बॅनर्जी यांनी १९५६च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यात उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियावर ४-२ असा विजय मिळवून देण्यात बॅनर्जी यांनी महत्त्वाची कामगिरी साकारली होती.

●  १९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये ते भारतीय फुटबॉल संघाचे कर्णधार होते. दुखापतीमुळे १९६७ मध्ये व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्ती पत्करल्यानंतर ते प्रशिक्षणाकडे वळले. प्रशिक्षक म्हणून त्यांनी आपल्या संघाला ५४ विजेतेपदे मिळवून दिली. कारकीर्दीत ऐन बहरात असतानाही बॅनर्जी यांनी मोहन बागान आणि ईस्ट बंगाल यांसारख्या अव्वल संघांचे प्रतिनिधित्व केले नाही. ते कायम पूर्व रेल्वेकडूनच खेळल

निधन विलियम डफ्रिस

● जगभरातील तरणाईवर त्यांच्या लहानपणी अधिराज्य गाजवलेलं सर्वात लोकप्रिय कार्टून ‘बॉब द बिल्डर’ या कार्टूनचा खऱ्या अर्थाने आवाज ठरलेले विलियम डफ्रिस यांचं निधन झालं आहे.

विलियम डफ्रिस :-
• लंडन रेडिओमध्ये करियरची सुरुवात
• ऑडिओ ड्रामामध्ये 'स्पायडर मॅन' मधील पीटर स्पार्करची भूमिका
• बॉब द बिल्डर’च्या नऊ सिजनना आवाज दिला
• आत्तापर्यंत एकूण ‘बॉब द बिल्डर’च्या 75 भागांना आवाज
दरम्यान ‘बॉब द बिल्डर’ची सुरुवात 1998 साली झाली होती. ‘बॉब द बिल्डर..करके दिखाएंगे..हा भाई हा..’ हे शब्द ऐकल्यानंतर प्रत्येक जण टिव्ही बघायचे

ग्रामीण रुग्णालय

प्राथमिक आरोग्यकेंद्र

गावपातळीवरील आरोग्यसेवा

ग्रामीण रुग्णालय

ग्रामीण रुग्णालयाला सामुदायिक आरोग्य केंद्र असेही म्हणतात. ही रुग्णालये सरकार चालवते आणि इथे गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळतो. हे एका तालुक्यात 1-2 ठिकाणी असते. (तुमच्या तालुक्यात ते कुठे आहे ते माहीत आहे काय?)

प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात 30 खाटा, चार तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी असतात.

तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रांना ग्रामीण रुग्णालय मदत करते. त्यामुळे या सर्व ठिकाणांहून ग्रामीण रुग्णालयात रुग्ण येतात.

ग्रामीण रुग्णालयात ब-याच प्रकारचे उपचार आणि काही शस्त्रक्रियाही केल्या जातात. इथे एक बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, एक तज्ज्ञ (शल्यचिकित्सक) शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर, आणि एक भूल देणारे डॉक्टर असावे अशी अपेक्षा असते.

एका सुसज्ज आणि पूर्ण कर्मचारीवर्ग असणा-या ग्रामीण रुग्णालयात खालीलप्रमाणे अनेक वैद्यकीय सेवा मिळू शकतात.

1. साधी बाळंतपणे आणि अवघड बाळंतपणे. अडलेल्या बाळंतिणीकरता सिझेरियनची सोय.
2. वैद्यकीय गर्भपात आणि अर्धवट झालेला गर्भपात वैद्यकीय मदतीने पूर्ण करणे.
3. स्त्रियांच्या आरोग्य समस्यांवर उपचार : रक्तस्राव, पांढरे पाणी जाणे, ओटीपोटात दुखणे.
4. लहान मुलांचा न्यूमोनिया, अतिसार, शरीरातील पाणी कमी होणे, तीव्र कुपोषित मुले तसेच तान्ह्या बाळांचे आजार, या सर्व गोष्टींकरता वैद्यकीय मदत.
5. न्यूमोनिया, रक्तदाब, ताप, मधुमेह अशा आजारांवर उपचार.
6. साधे (हाड मोडणे)फ्रॅक्चर, गळू, हर्निया याला लागणा-या शस्त्रक्रिया.
7. विषबाधा किंवा सर्पदंश अशा अपघातांवर उपचार.

8. क्षयरोग नियंत्रणासाठी डॉट (समक्ष) उपचार
9. कुटुंबनियोजनाची नसबंदी शस्त्रक्रिया.
10. राष्ट्रीय योजनांचे आरोग्य उपक्रम राबवण्यास मदत करणे.
11. रक्त, लघवी आणि थुंकीची (बेडका) तपासणी.
12. क्ष-किरण तपासणी किंवा फोटो काढणे.
13. बलात्कार, मारहाणीमुळे झालेल्या जखमा याकरता आवश्यक कायदेशीर तपासण्या तसेच आरोग्य किंवा आजारपणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र.
14. पोलिसांच्या विनंतीवरून मृतांची शवचिकित्सा.
15. गर्भलिंग तपासणी करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आल्यास योग्य ती कारवाई करणे. यासाठी वैद्यकीय अधीक्षक सक्षम अधिकारी म्हणून नेमलेला असतो.
16. एच. आय.व्ही (एड्स-संसर्ग) ची चाचणीदेखील काही ग्रामीण रुग्णालयात होते.
17. रुग्णांना जास्त गंभीर उपचाराची गरज असते. उदा. बाळंतपणात पिशवी फाटणे किंवा हार्टऍटॅक. अशांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्याची सोय इथूनच होऊ शकते.
18. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेचीसुध्दा सोय असू शकते. बाळंतपणाला नेण्यासाठी उपयोग करायचा झाला तर या सेवेसाठी काहीच पैसे द्यावे लागत नाहीत. पण काही ग्रामीण रुग्णालयात मर्यादित सोयी असतात.
19. अतिकुपोषित बालकांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करता येते.
20. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाची एक रुग्णकल्याण समिती असते. रुग्णालयात जमा होणारा निधी ते तिथेच वापरू शकतात. रुग्णालयाला देणग्याही घेता येतात.

रुग्णालयात पैसे द्यावे लागतात का?

एक अल्पशी नोंदणी रक्कम कागद काढण्यासाठी वगळता, दारिद्रयरेषेखाली असणा-या सर्व रुग्णांना रुग्णालयाची सेवा मोफत आहे.
इतर रुग्णांना काही रक्कम भरायला लागेल. कोणत्या सेवेसाठी किती रक्कम भरायची याचा तक्ता तिथे लावलेला असेल. रक्कम भरल्यावर पावती अवश्य घ्यावी.

जर याविषयी काही तक्रार असेल तर ती वैद्यकीय अधीक्षकाकडे नोंदवा किंवा तक्रार पेटीत पत्र टाका. कधीकधी ग्रामीण रुग्णालयात काही औषधांचा साठा नसतो. अशा वेळी ते बाहेरून औषधे विकत आणायला सांगू शकतात. पण सल्लागार समितीने हा भार गरीब रुग्णांवर वारंवार पडणार नाही ही दक्षता घेतली पाहिजे.

रुग्णालय सल्लागार समिती

प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात स्थानिक सदस्यांची एक सल्लागार समिती असतेच. रुग्ण कल्याण समिती किंवा रुग्णालय समिती या नावाने ती ओळखली जाते. रुग्णांना मदत करणे, उपलब्ध सेवांच्या प्रतीवर नियंत्रण ठेवणे, वैद्यकीय सामग्रीची दुरुस्ती करून घेणे अशा या समितीच्या जबाबदा-या आहेत.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...