Thursday, 5 September 2024

भाऊराव पायगौंडा पाटील


(२२ सप्टेंबर १८८७–९ मे १९५९). 


महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक व शिक्षणप्रसारक. सर्व जातिधर्मांच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या भगीरथ प्रयत्नांनी त्यांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. त्यांचे शैक्षणिक व सामाजीक कार्य पाहून गाडगे महाराज (Gadge Maharaj) यांनी त्यांना कर्मवीर पदवी दिली.  ते अण्णा या नावानेही परिचित आहेत.

 जन्म:


कुंभोज (जि. कोल्हापूर) या खेड्यात पायगौंडा व गंगुबाई या जैन दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे मूळ घराणे मूडब्रिदी (जि. दक्षिण कन्नड – कर्नाटक) गावचे. देसाई हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु पुढे त्यांच्या घराण्याला पाटीलकी मिळाल्याने ते देसाईचे पाटील झालेत. 


शिक्षण:

एतवडे बुद्रुक (जि. सांगली) येथे प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे ते कोल्हापुरात इंग्रजी सहावीपर्यंत शिकले. राजर्षी शाहूमहाराजांच्या प्रभावाखाली त्यांच्यावर समाजसेवेचे संस्कार झाले. विद्यार्थिदशेतच सातव्या एडवर्ड बादशाहाच्या पुतळ्यास डांबर फासल्याच्या खोट्या आरोपावरून त्यांना तुरुंगवास सोसावा लागला. त्याला कंटाळून आत्महत्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु पुढे त्यांची सुटका होऊन त्यांनी कोल्हापूर सोडले.


भाऊराव हे ओगले काच कारखान्याचे व पुढे किर्लोस्कर नांगराचे १९१४ ते १९२२ या दरम्यान विक्रेते होते. या काळात ठिकठिकाणी खेड्यांत फिरल्यामुळे जनतेचे दारिद्र्य व शिक्षणाचा अभाव यांची जाणीव त्यांना झाली. 


कार्य:

१९०९ मध्ये दादा जिनप्पा मद्वण्णा यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह दूधगाव (जि. सांगली) येथे शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केली होती. या शिक्षण संस्थेपासून प्रेरणा घेऊन कर्मवीरांनी १९१९ मध्ये कराडजवळील काले या गावी त्यांनी पहिले वसतिगृह काढले (१९१९). तोच रयत शिक्षण संस्थेचा शुभारंभ होता. पुढे १९२४ मध्ये सातारा येथे अस्पृश्यांसह सर्व जातिधर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतिगृह काढले. त्यास राजर्षी शाहू महाराजांचे नाव देण्यात आले. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी या वसतिगृहास १९२७ साली भेट दिली. त्या वेळी गांधीजींनी ‘भाऊराव का कार्यही उनका सच्चा किर्तीस्तंभ है’ अशी कर्मवीरांच्या कार्यांची प्रशंसा केली. तेव्हापासून भाऊराव खादी वापरू लागले व राजकारणापासून दूर राहून शिक्षणाच्या कार्यास त्यांनी पूर्णतः वाहून घेतले. गोरगरीब पण हुशार मुले जेथेजेथे खेड्यापाड्यांत दिसतील, तेथून त्यांना उचलून आणून वसतिगृहात ठेवून पोटच्या पोरांप्रमाणे सांभाळले. त्यांतील काही विद्यार्थांच्या परदेशी शिक्षणाची सोय पालक या नात्याने त्यांनीच केली. ‘स्वावलंबनाने कष्ट करून शिका’, या मंत्राबरोबरच भाऊरावांनी ‘तुम्हास एक वर्षाची तयारी करायची असेल, तर धान्य पेरा आणि शंभर वर्षांची तयारी करायची असेल, तर माणसे पेरा’ हा संदेश दिला.

सत्यशोधक चळवळीशी त्यांचा अत्यंत संस्कारक्षम अशा वयात आलेला निकटचा संबंध. या चळवळीतून बहुजनसमाजाच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळावयाची, तर तिचा रोख शिक्षण प्रसाराच्या द्वारा त्या समाजातील अनिष्ट रूढी व अंधश्रद्धा नष्ट करण्याकडे असणे आवश्यक होते. भाऊरावांनी शिक्षणकार्य पतकरून हे साधण्याचा नेटका प्रयत्न केला. या कार्यामुळे विरोधक व सनातनी मंडळींचा रोष होऊन त्यांना जाच सहन करावा लागला. सर्व जातिधर्माचे आजन्म कार्यकर्ते सेवक या संस्थेत तयार झाले.वटवृक्ष हे बोधचिन्ह व स्वावलंबी शिक्षण हे संस्थेचे बोधवाक्य ठरले. भाऊरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी त्यांच्या कार्यास मनःपूर्वक साथ दिली. महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले (Mahatma Jyotirao Govindrao Phule) व राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Mharaj) यांची शिक्षणाप्रसाराची इच्छा त्यांनी पूर्ण केली. ते सत्यशोधक समाज (Satyashodhak Samaj) याचे एक महत्त्वाचे सदस्य होते. पुणे विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट्.’ ही सन्मान्य पदवी अर्पण केली. 


निधन:

भाऊराव यांचे हृदयविकाराने पुणे येथे निधन झाले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...