🧩स्वातंत्र्याची घोषणा :
🅾️नवी दिल्ली येथील संसद भवनाच्या भव्य सभागृहात 14 ऑगस्टच्या रात्री भारताच्या संविधान समितीची बैठक सुरू होती.मध्यरात्री बाराचे ठोके पडले आणि भारताचे पारतंत्र्य संपले. भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवण्यात आला.
🅾️ त्याच्या जागी भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला. वर्षानुवर्षांच्या गुलामगिरीच्या शृंखला गळून पडल्या.
ब्रिटिश सत्तेने भारतात पाय रोवल्यापासून ज्या लक्षावधी भारतीयांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी असीम त्याग केला होता, अनेकांनी आपले प्राण वेचले होते त्यांच्या महान त्यागाची ही फलश्रुती होती.
🅾️या ऐतिहासिक क्षणाचे महत्व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या प्रभावी भाषणात उलगडून दाखवले.ते म्हणाले, 'अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता. आज त्याची पूर्तता, पूर्णपणे नसली तरी बर्याच मोठया प्रमाणात आपण करत आहोत.
🅾️ मध्यरात्रीचा ठोका पडेल तेव्हा सारे जग झोपलेले असताना स्वतंत्र व चैतन्यमय भारत जन्माला येईल.या मंगल क्षणी केवळ भारतीयांच्याच नव्हे तर सर्व मानवजातीच्या सेवेला वाहून घेण्याची शपथ घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले लक्षावधी भारतीयांनी स्वातंत्र्याचा सोहळा अभूतपूर्व उत्साहाने साजरा केला.
स्वातंत्र्यप्रातीचा हा उत्कट आनंद निर्भळ मात्र नव्हता.
🅾️देशाची फाळणी आणि त्या वेळी उफाळलेला भयानक हिंसाचार यामुळे भारतीय जनता दु:खी होती. स्वातंत्र्य सोहळयात सहभागी व्हायला गांधीजी दिल्लीत थांबले नव्हते.शांतता व जातीय सलोखा टिकवण्यासाठी ते बंगालमध्ये जिवाचे रान करत होते.
🅾️भारत स्वतंत्र करण्यासाठी अहर्निश झटलेल्या या महात्म्याची स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच निर्घृण हत्या करण्यात आली.
ही हत्या नथुराम गोडसे याने 30 जानेवारी, 1948 रोजी केली.हिंदु-मुस्लिम ऐक्य टिकवण्यासाठी गांधीजींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती व त्यासाठीच त्यांनी आपल्या प्राणाचेही मोल दिले.
No comments:
Post a Comment