Saturday, 23 December 2023

करोनाचा नवा JN.1 उपप्रकार


करोनाचा उपप्रकार असलेल्या BA.2.86 च्या जातीतील JN.1 हा नवा विषाणू केरळच्या काही भागांमध्ये पसरत आहे.


INSACOG (Indian SARS-CoV-2 Genomics Consortium) या प्रयोगशाळेने केरळमध्ये सध्या अमेरिका आणि चीनमध्ये पसरत असलेल्या करोनाचा JN.1 हा नवा उपप्रकार आढळून आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यावर आयसीएमआरचे डीजी डॉ. राजीव बहल म्हणाले की, केरळमधील काराकुलम, तिरुवनंतपुरम येथे ८ डिसेंबर रोजी झालेल्या RT-PCR चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह नमुन्यात JN.1 हा विषाणूचा नवा उपप्रकार आढळून आला. त्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी काही नमुन्यांची RT-PCR चाचणीही पॉझिटिव्ह आली. रुग्णामध्ये इन्फ्लूएंझासारखी सौम्य लक्षणे होती. परंतु, काही दिवसांनी हे रुग्ण बरे झाले आहेत.


JN.1 हा विषाणू नेमका काय आहे?


करोनाचा JN.1 हा उपप्रकार BA.2.86 प्रकाराशी संबंधित आहे. सामान्यतः तो पिरोला म्हणून ओळखला जातो. करोनाचा हा नवा उपप्रकार आधीच्या उपप्रकारांच्या तुलनेत स्पाइक प्रोटीनमध्ये फक्त एक अतिरिक्त उत्परिवर्तन करत आहे. पिरोलाचे आधीच्या उपप्रकारांच्या तुलनेत स्पाइक प्रोटीनमध्ये ३९ पेक्षा जास्त उत्परिवर्तन होत आहे. यामुळे शास्त्रज्ञ त्यावर लक्ष ठेवून होते. Sars-CoV-2 च्या स्पाइक प्रोटीनवरील उत्परिवर्तने महत्त्वपूर्ण आहेत. कारण ते मानवी पेशींवरील रिसेप्टर्सला जोडतात आणि व्हायरसला त्यात प्रवेश करू देतात.


JN.1 मुळे रुग्णसंख्या वाढ होऊ शकते का?

पिरोला अधिक प्रभावीपणे प्रतिकारशक्तीला शह देत त्वरीत पसरू शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात होती, मात्र, तसे झालेले नाही. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या मते, देशात उपलब्ध अद्ययावत लसींमुळे पिरोला संसर्ग प्रभावीपणे रोखता येऊ शकला. पण तरीही लोकांनी JN.1 पासूनही स्वत:चे संरक्षण केले पाहिजे.


JN.1 उपप्रकाराचे रुग्ण का वाढत आहेत?

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलेय की, GISAID या जागतिक डेटाबेसवर अपलोड केलेल्या Sars-CoV-2 अनुक्रमांपैकी पिरोला आणि त्यांच्या वंशजांचा वाटा १७ टक्के आहे. त्यापैकी निम्म्याहून अधिक रुग्ण डिसेंबरच्या सुरुवातीस JN.1 चे होते. जागतिक डेटाबेसवर JN.1 च्या किमान तीन हजार रुग्णांची माहिती अपलोड केली गेली होती. त्यातील बहुतेक रुग्ण अमेरिका, कॅनडा आणि युरोपीय देशांमधून आले होते. “BA.2.86 आणि JN.1 सारखी नवीन रूपे लक्ष वेधून घेत असताना, सध्या SARS-CoV-2 प्रकारांपैकी ९९ टक्के भाग हा XBB गटाचा भाग आहे, असेही US CDC ने म्हटले आहे.


JN.1 उपप्रकारापासून कसे कराल स्वतःचे संरक्षण?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की Sars-CoV-2 चे नवीन उपप्रकार येतच राहतील. श्वासोच्छवासाच्या विषाणूपासून संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रकरणांची संख्या वाढत असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे बंद करा आणि जाणारच असल्यास मास्क घाला. हवेशीर जागेत राहिल्याने संसर्गाचा प्रसार कमी होतो. संसर्ग टाळण्यासाठी वारंवार हात धुवा आणि सामाजिक अंतर ठेवा.

No comments:

Post a Comment