Tuesday, 8 February 2022

फेसबुकच्या शेअर्सची ऐतिहासिक घसरण, मार्क झुकरबर्गला बसला ३१ अब्ज डॉलर्सचा फटका


🔰आत्तापर्यंत जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या १० मध्ये असणारा फेसबुकचा प्रमुख मार्क झुकरबर्ग २०१५नंतर पहिल्यांदाच पहिल्या दहामधून बाहेर पडला आहे. आणि याला कारणीभूत ठरली आहे फेसबुकच्या युजर्सची घटणारी संख्या! बुधवारी फेसबुककडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार फेसबुकच्या युजर्सच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.

🔰गेल्या तिमाहीपेक्षा या तिमाहीमध्ये ही घट मोठी असून हा आकडा गेल्या १७ वर्षांतला सर्वाधिक आहे. त्याचा परिणाम थेट फेसबुकच्या शेअर्सवर झाला असून खुद्द मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत तब्बल ३१ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.

🔰बुधवारी ही आकडेवारी जाहीर झाल्यानंतर गुरुवारी सकाळपासूनच फेसबुकची पालक कंपनी असलेल्या मेटाचे शेअर्स घसरू लागले होते. पहिल्या तासाभरातच फेसबुकच्या शेअर्सच्या किंमती २० ते २२ टक्क्यांनी घटल्या होत्या. त्यापाठोपाठ संध्याकाळपर्यंत हे शेअर्स मोठ्या प्रमाणावर खाली आले. याचा फटका मार्क झुकरबर्गसोबतच मेटाच्या इतर प्रमुख सदस्यांना देखील बसला आहे.

ऑलिम्पिकच्या मांडवाआडून चीन-रशिया खलबते


🔰रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे शुक्रवारी बीजिंग येथे आगमन झाले. हिवाळी ऑलिम्पिक सामन्यांच्या उद्घाटन समारंभास हजर राहण्याबरोबरच चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांच्याशी चर्चा करणे हा त्यांच्या भेटीचा उद्देश आहे. अमेरिका आणि त्याच्या मित्रपक्षांना शह देण्यासाठी एकजूट दाखविण्याचाही या भेटीचा हेतू असल्याचे मानले जाते.

🔰सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव वाढत असून त्याची परिणिती युद्धात होऊ शकते. अशावेळी चीन रशियासोबत उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर पुतिन बीजिंगच्या दौऱ्यावर आले आहेत.

🔰बीजिंगमधील या ऑलिम्पिक सोहळय़ासाठी आपला प्रतिनिधी पाठवायचा नाही, असा निर्णय अमेरिका, ब्रिटन आदी मित्रराष्ट्रांनी घेतला आहे. चीनमध्ये मानवी अधिकारांचे उल्लंघन होत असून तेथील युघेर आदी मुस्लीम समुदायांना योग्य वागणूक दिली जात नसल्याचा आरोप या देशांनी केला आहे. अशा स्थितीत पुतीन हेच या सोहळय़ातील प्रमुख पाहुणे आहेत.

सू ची यांच्याविरुद्ध अकरावा खटला


🔰म्यानमारमध्ये वर्षभरापूर्वी निवडणुकीनंतर लष्कराने सत्ता ताब्यात घेत पदच्युत केलेल्या नेत्या आँग सान सू ची यांच्याविरुद्ध पोलिसांनी भ्रष्टाचाराचा अकरावा खटला दाखल केला आहे. शासकीय वृत्तसेवेने ही बातमी दिली आहे.  दी ग्लोबल न्यू लाईट ऑफ म्यानमार या वृत्तपत्रातील बातमीनुसार, सू ची यांच्यावर भ्रष्टाचारविरोधी कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई केली जात आहे. त्यांच्यावर लाचबाजीचा आरोपही आहे. त्यासाठी त्यांना जास्तीत जास्त १५ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

🔰गेल्या वर्षी १ फेब्रुवारीला लष्कराने सू ची यांना ताब्यात घेतल्यापासून त्यांच्यावर अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यांना पुन्हा सक्रिय राजकारणात परतता येऊ नये याच उद्देशाने हे खटले दाखल केले जात आहेत, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. देशात २०२३ मध्ये निवडणूक घेण्याचे आश्वासन लष्कराने दिले आहे. 

🔰याआधी बेकायदा वॉकीटॉकी बाळगल्याप्रकरणी तसेच करोनानिर्बंधांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली सू ची यांना सहा वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला आहे. गोपनीयता कायद्याखालीही त्यांच्यावर खटला सुरू असून त्यात जास्तीत जास्त १४ वर्षांची शिक्षा होऊ शकते.

टेस्ला’च्या आयातीत अडचण ; इलेक्ट्रिक वाहनासाठी करसवलतीची मागणी भारताने फेटाळली

🔰इलेक्ट्रिक कार आयात करण्यासाठी कर सवलत देण्याची अमेरिकी उद्योगपती इलोन मस्क यांच्या टेस्ला कंपनीची मागणी भारताने फेटाळली आहे. ती फेटाळताना, अंशत: बांधलेली वाहने आयात करण्याबाबत आणि त्यांची उर्वरित जोडणी भारतात करण्यासाठी कमी कर आकारणीचा नियम आधीपासून लागू असल्याचे कारण देण्यात आले आहे.

🔰केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष विवेक जोहरी म्हणाले, ‘‘आयात शुल्कात पुन्हा बदल करणे आवश्यक आहे की किंवा काय हे आम्ही तपासले, परंतु देशात सध्या काही वाहननिर्मिती सुरू आहे आणि काही गुंतवणूकही सध्याच्याच कररचनेनुसार आली आहे. त्यामुळे कर किंवा शुल्क आकारणी हा टेस्लापुढील अडथळा नाही, हे स्पष्टच आहे.’’ केंद्र सरकारने मागणी केल्यानंतरही ‘टेस्ला’ने स्थानिक पातळीवर उत्पादनासाठी आणि भारतातून खरेदीसाठी अद्याप आपली योजना सादर केलेली नाही, असेही जोहरी यांनी स्पष्ट केले.

🔰भारत सरकारने मस्क यांच्या ‘टेस्ला’ कंपनीला स्थानिक पातळीवर इलेक्ट्रिक वाहननिर्मितीस प्रोत्साहन देण्याचा विचार आहे. परंतु मस्क यांची अशी इच्छा आहे की आयात केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांवर भारताने १०० टक्के करसवलत द्यावी, जेणेकरून कंपनीला स्पर्धात्मक किमतीत इतरत्र निर्मिती केलेल्या वाहनांची प्रथम विक्री करता येईल. परंतु देशात जोडणीसाठी आयात होणाऱ्या भागांवर सध्या १५ ते ३० टक्क्यांदरम्यान आयात शुल्क आकारण्यात येत आहे.

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...