Tuesday, 18 January 2022

१२ ते १४ वयोगटासाठी लसीकरण मार्चपर्यंत सुरू होण्याची चिन्ह

🔰देशात करोना महामारीची तिसरी लाट आलेली आहे. दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठ वाढ दिसून येत आहे. शिवाय, करोनाचाच नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनाचे रूग्ण देखील आढळून येत आहे.

🔰या पार्श्वभूमीवर आता केंद्र व राज्य सरकारांकडून अधिक सतर्क होत, विविध उपाय योजनांची अमलबाजवणी केली जात आहे. याचच एक भाग म्हणजे १०० टक्के लसीकरणावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरण लवकरच सुरू केले जाण्याचे संकेत मिळाले आहेत.

🔰१२ ते १४ वयोगटासाठी लसीकरण कार्यक्रम मार्चपासून सुरू होणार आहे, लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या (NTAGI) COVID-19 कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा यांनी टाईम्स ऑफ इंडियाला याबाबत माहिती दिली.

🔰आतापर्यंत देशातील १५-१७ वर्षे वयोगटातील तीन कोटींहून अधिक मुलांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. अवघ्या १३ दिवसांत या वयोगटातील सुमारे ४५ टक्के मुलांना ही लस देण्यात आली आहे. ३ जानेवारीपासून १५-१७ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे.

पंतप्रधानांकडून कौतुक

🔰रविवारी एक वर्ष पूर्ण केलेल्या भारताच्या कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. महासाथीच्या विरोधातील लढ्याला या मोहिमेने बळ दिले असून, तिच्यामुळे जीव वाचवण्यास आणि उपजीविकांचे संरक्षण करण्यास मदत झाली आहे, असे ते म्हणाले.

🔰 महासाथीचा पहिल्यांदा फटका बसला, त्या वेळी या विषाणूबद्दल कुणाला फारशी माहिती नव्हती. तथापि, आमचे शास्त्रज्ञ व संशोधक यांनी लशी विकसित करण्यात स्वत:ला झोकून दिले. लशींच्या माध्यमातून महासाथीशी लढण्यात आमचा देश योगदान देऊ शकला याचा भारताला अभिमान आहे, असे ट्वीट मोदी यांनी केले.

🔰‘लसीकरण मोहिमेशी संलग्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी नमन करतो. आमचे डॉक्टर, परिचारिका व आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी यांची भूमिका असाधारण राहिलेली आहे’, असेही मोदी यांनी नमूद केले.

🔰 ‘दुर्गम भागांत लोकांना लस दिली जात आहे, किंवा आमचे आरोग्य कर्मचारी तेथे लशी घेऊन जात आहेत अशी दृश्ये आम्ही पाहतो, तेव्हा आमची हृदये आणि मने अभिमानाने भरून येतात’, असे पंतप्रधान म्हणाले. महासाथीशी लढण्यात भारताचा दृष्टिकोन नेहमीच विज्ञानावर आधारित राहील, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

MPSC अर्ज भरताना तांत्रिक अडचणींची समस्या; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला मोठा निर्णय


🔰महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला ऑनलाइन सेवा पुरवणारी वेबसाईट डाऊन (Online application process for MPSC stopped) असल्याच्या तक्रारी मागील काही दिवसांपासून समोर येत होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या प्रकरणानंतर विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढही दिली. मात्र रविवारी मुदतवाढ दिल्यानंतर पुन्हा एकदा ऑनलाइन अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या.

🔰एमपीएससीसाठी उत्सुक असणाऱ्या उमेदवारांना (MPSC Recruitment) तांत्रिक अडचणी म्हणजेच टेक्निकल फॉल्टमुळे अनेकांना अर्ज भरता येत नव्हता. वेळेत अर्ज कसा भरावा असा प्रश्न विद्यार्थ्यासमोर निर्माण झालेला असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दिलासा देणारा एक निर्णय घेतलाय. आयोगाने जाहीर केलेल्या सर्व जाहिरातींनुसार सुरु असणारी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित केलीय.

🔰ऑनलाइन अर्ज करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींची दखल घेत आयोगाने संपूर्ण प्रक्रियाच स्थगित केलीय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली. संबंधित वेबसाईटवरील तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतरच पुन्हा उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी योग्य ती मुदतवाढ देण्यात येईल, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं स्पष्ट केलंय. “प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल तसेच सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल,” असं ट्विट करण्यात आलंय.