ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील अठराव्या शतकातील बुंदेलखंडातील एक संस्थान. हे संस्थान उत्तरेस ग्वाल्हेर संस्थान व जालौन, पूर्वेस धसान नदी, पश्चिमेस दतिया, ग्वाल्हेर ही संस्थाने, दक्षिणेस ओर्छा संस्थान यांनी सीमांकित झाले होते.
झांशी संस्थानातून ब्रिटिशांनी झांशी जिल्हा निर्माण केला. त्याचे क्षेत्रफळ ९,२८२ चौ. किमी. लोकसंख्या सु. पाऊण लाख (१८५४) व उत्पन्न ४·३ लाख रु. होते.
प्राचीन काळी या संस्थानच्या आसपास परिहार, काठी राजपूत व गोंड लोकांची वस्ती होती. काही वर्षे ते चंदेल्लांच्या अंमलाखाली होते.
११८२ साली पृथ्वीराजाने चंदेल्लांचा पराभव केला. तेराव्या शतकारंभी कुत्बुद्दीन (१२०२-०३) व अल्तमश (१२३४) यांनी या प्रांतावर स्वाऱ्या केल्या. नंतर हा प्रदेश खेंगर टोळीच्या ताब्यात गेला.
त्यांनीच येथे किल्ला बांधला. तेराव्या शतकात रुद्रप्रताप बुंदेल्याने खेंगरांचा पराभव करून तेथे राज्य स्थापिले. त्याचा मुलगा भारतीचंद्र याने १५३१ मध्ये ओर्छा शहर वसविले. ओर्छाचा राजा बीरसिंगदेव याने १६१३ मध्ये झांशीची स्थापना करून झांशीचा किल्ला बांधला. अकबर, शाहजहान व वीरसिंग यांच्यात चकमकी उडाल्या होत्या.
सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात चंपतराय बुंदेला याचा मुलगा छत्रसाल याने झांशीवर आपला अधिकार प्रस्थापित केला. त्याने पहिल्या बाजीरावास मुसलमानांविरुद्ध मदतीस बोलाविले. बाजीरावने मुसलमानांचा पराभव केला.
त्याबद्दल छत्रसालने बुंदेलखंडाचा तिसरा हिस्सा बाजीरावास देण्याचे कबूल केले. हा करार प्रत्यक्ष पाळला गेला नाही.
महाराष्ट्रातून कोणी सरदार जाऊन सालीना सहा लक्षांची खंडणी वसूल करी. १७४२ मध्ये मल्हार कृष्ण व राणोजी शिंदे हे झांशीस गेले असता ओर्छाकरांनी त्यांचा पराभव करून मल्हार कृष्णचा खून केला. तेव्हा पुण्याहून गेलेल्या नारो शंकराने ओर्छाकरांचा पराभव करून झांशी मराठ्यांच्या ताब्यात आणली.
पेशव्यांनी मल्हार कृष्णच्या वंशजांना झांशीची जहागीर दिली. १७४२ ते १७७० पर्यंत नारो शंकर, बाबुराव, कान्हेरपंत, विश्वासराव लक्ष्मण हे झांशीचे सुभेदार होते.
नारो शंकराने झांशीचा किल्ला ताब्यात घेऊन किल्ल्याला लागून नवीन शहर वसविले. हाच झांशी संस्थानचा संस्थापक. झांशीची सुभेदारी वंशपरंपरेने १७७० मध्ये रघुनाथ हरी नेवाळकर यांच्या घराण्याकडे आली.
रघुनाथरावाने २५ वर्षे कारभार केल्यानंतर आपला भाऊ शिवराव याच्या नावाने पुण्याहून वस्त्रे मागविली. इंग्रजांनी बुंदेलखंडावर चाल केली, तेव्हा शिवरावने त्यांना साह्य केले. ६ फेब्रुवारी १८०४ रोजी इंग्रज आणि शिवराव यांच्यात तह झाला.
१८ वर्षे कारभार केल्यानंतर शिवरावचा नातू रामचंद्रराव हा गादीवर आला. १३ जून १८१७ रोजी पेशवे आणि इंग्रज यांच्यात झालेल्या तहान्वये झांशी संस्थान हे इंग्रजांच्या ताब्यात गेले.
इंग्रज व रामचंद्रराव यांच्यात तह होऊन इंग्रजांनी झांशी संस्थान रामचंद्ररावाकडे वंशपरंपरेने चालविण्याचे मान्य केले. भरतपूरच्या वेढ्यात रामचंद्ररावाने इंग्रजांना साह्य केले म्हणून १८३२ मध्ये इंग्रजांनी त्याला महाराज हा किताब दिला.
१८३५ मध्ये रामचंद्ररावानंतर त्याचा चुलता रघुनाथराव गादीवर बसला, पण तो १८३८ मध्ये मरण पावला. त्यानंतर त्याचा भाऊ गंगाधरराव गादीवर आला, पण वाद होऊन १८३८ ते १८४३ पर्यंत इंग्रजांनी झांशी संस्थानचा कारभार आपल्या हातात घेतला. पुढे इंग्रजांनी गंगाधररावाबरोबर तैनाती फौजेचा तह केला. तहाप्रमाणे २,२७,००० रु. वसुलाचा मुलूख इंग्रजांना मिळाला.
गंगाधररावांची पहिली पत्नी मरण पावल्यावर त्याने मोरोपंत तांबे यांची मुलगी लक्ष्मीबाई (मनुबाई) हिच्याशी लग्न केले. १८५३ मध्ये गंगाधरराव व लक्ष्मीबाई यांनी नेवाळकर घराण्यातील आनंदराव यास दत्तक घेतले. नंतर त्याच साली गंगाधरराव मरण पावले.
१८५४ साली लॉर्ड डलहौसीने दत्तक वारस अमान्य करून झांशी संस्थान ब्रिटिश राज्यात समाविष्ट केले. लक्ष्मीबाईने आपला दत्तक मंजूर व्हावा, म्हणून खटपट केली. ती अखेरपर्यंत आशावादी होती आणि इंग्रजांना मदत करीत होती.
अखेर राणीला वार्षिक ६०,००० रु. तनखा देऊन तिला शहरातील राजवाड्यात राहण्याची परवानगी दिली. १८५७ च्या उठावात झांशी इंग्रजांच्या हाती पडू नये, म्हणून राणीने आटोकाट प्रयत्न केले. अखेरीस राणी रणांगणी मृत्यू पावली.
No comments:
Post a Comment