Tuesday, 3 May 2022

अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस

अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस

>अर्थशास्त्र>अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस
अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस: (ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस = आयटक). ३१ ऑक्टोबर १९२० रोजी स्थापन झालेली भारतीय सर्वांत जुनी मध्यवर्ती ⇨कामगार  संघटना. १९१८ पासून भारतात कामगारसंघ उदयास येत होते. त्यांची मध्यवर्ती संस्था म्हणून आयटकची स्थापना झाली. जिनिव्हा येथे दर वर्षी भरणाऱ्या ⇨आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या परिषदेकरिता भारतीय कामगार प्रतिनिधी निवडण्यासाठी मध्यवर्ती संस्थेची आवश्यकता होती. ब्रिटनच्या ट्रेड युनियन काँग्रेसच्या धर्तीवर स्थापन झालेल्या आयटकने ती उणीव भरून काढली.

देशातील सर्व कामगार संघटनांशी सहकार्य करणे, निरनिराळ्या संघटनांच्या कार्यवाहीत सुसूत्रता आणणे, वेगवेगळ्या धंद्यांतील आयटकशी संबद्ध अशा कामगारसंघांना मार्गदर्शन करणे आणि कामगारांच्या मागण्यांसाठी संघटित स्वरूपाची चळवळ उभारणे, ही तिची उद्दिष्टे होत. प्रारंभापासूनच आयटकने कामगारांच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय हितसंबंधांचा पाठपुरावा केला.

लाला लजपतराय हे आयटकचे पहिले अध्यक्ष. सी. आर. दास, सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस इत्यादींनीही ते पद भूषविले. प्रारंभी आयटक व राष्ट्रीय काँग्रेस यांच्यात सलोख्याचे संबंध होते. १९३० नंतर मात्र हे संबंध बिघडत गेले. त्यापूर्वी आयटकमध्ये पहिली दुफळी पडली होती. १९४७ नंतर ह्या संघटनेत साम्यवाद्यांखेरीज दुसरे कोणीही उरले नाही. आयटकचे प्रधान कार्यालय नवी दिल्ली येथे आहे.

आयटकच्या संलग्न संघांच्या प्रतिनिधींची परिषद वेळोवेळी भरते. ती आयटकचे धोरण निश्चित करते आणि पदाधिकाऱ्यांची व एका साधारण मंडळाची निवड करते. ह्याशिवाय एक कार्यकारी मंडळ असते. भारतातील प्रत्येक राज्यात आयटकच्या शाखा आहेत. आयटकने कापडउद्योग, ज्यूट, खाणकाम आदी उद्योगधंद्यांसाठी संघसमूह (फेडरेशन्स) बनविले आहेत. ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स’ ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील साम्यवादी गटाच्या महासंघाशी आयटक संलग्न आहे.

आयटक ट्रेड युनियन रेकॉर्ड  नावाचे पाक्षिक प्रसिद्ध करते.

आयटकशी १९७१ च्या अखेर ३, ०१८ कामगारसंघटना संलग्न असून सभासदांशी संख्या १८,७२,९८२ होती. देशातील मध्यवर्ती कामगार संघटनांमध्ये ⇨इंटकनंतर आयटकचा दुसरा क्रमांक लागतो.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...