Thursday, 5 May 2022

परीक्षेची संधी थोडक्यात हुकली आहे. आशा लोकांसाठी एक छोटीशी गोष्ट शेअर करत आहे.


----------------------------------------------

टीचरने शिट्टी वाजवली तशी चिमुकल्या पावलांचा ५० मुलामुलींचा गट शाळेच्या मैदानावर धावू लागला. 

एकच लक्ष. 

पलिकडच्या टोकाला टच करुन लवकर परत यायचं. 


पहिल्या तिघांना बक्षिस. 

पहिल्या तीनसाठी सगळ्यांची चढाओढ.


 बघायला सगळ्यांचे आईबाबा म्हणुन उत्साह जरा  जास्तच होता. 


पावले परत फिरली. 

गर्दीतुन बघ्यांचे "पळ पळ" म्हणून  आवाज वाढू लागले. 

पहिल्या तिघांनी हात वर करत आनंदाने पालकांकडे पाहिलं.


 चौथे, पाचवे काठावर बक्षिस हुकले म्हणुन नाराज झालेले. काही पालकही नाराज झालेले.


आणि नंतरचे आता बक्षिस मिळणार नाही, आता कशाला पळा म्हणत चालू लागले.

त्यांच्यासोबत दमलेले, मनापासुन शर्यतीत नसणारे सगळेच. 


५ व्या आलेल्या मुलीने नाराजीनेच बाबाकडे धाव घेतली.


 बाबानेच आनंदाने पळत पुढे जाऊन तिला उचलून घेतले आणि म्हणाला, 

" वेल डन बच्चा. चल कुठले आइस्क्रिम खाणार?". 


" पण बाबा माझा नंबर कुठे आलाय ?" मुलीनं आश्चर्याने विचारलं.


" आलाय की. पहिला नंबर आलाय तुझा बेटा. "


" कसा काय बाबा. ५ वा आला ना ?"  मुलगी गोंधळलेली.


"अगं, तुझ्या मागे कितीजण होते ?"


थोडीशी आकडेमोड करत ती म्हणाली ,

" ४५ जण"


" म्हणजे उरलेल्या ४५ जणात तू पहिली आलीस. म्हणून तुला आइस्क्रिम."


" आणि पुढचे चार जण ?"

 गोंधळ वाढला तिचा.


" त्यांच्याशी आपली शर्यत नव्हतीच यावेळी".


"का ?".


" कारण त्यांनी जास्त तयारी केलेली. आता आपण

परत चांगली तयारी करायची. मग पुढल्यावेळी तु

४८ जणात पहिली येणार. त्यानंतर ५० जणात."


"असं असतंय बाबा ?".


" होय बेटा असंच असतंय ".


"मग पुढल्यावेळी शेवटी एकदम मोठी उडी मारुन पहिली येते की ?".  आता मुलीला उत्साह आलेला.


" एवढी घाई कशाला बेटा ? पाय मजबूत होऊ देत की. आणि आपण आपल्यापुढे जायचं. दुस-यांच्या नाही".


तिला फार काही समजलं नाही पण विश्वासानं म्हणाली, " तुम्ही म्हणाल तसं ".


"आता आइस्क्रिम सांगा की हो ". - बाबा.


मग मात्र नवीन आनंद गवसावा तशी, मुलगी ४५ जणात पहिली आल्याच्या आनंदात बाबाच्या खांद्यावर हसत मान ठेऊन जोरात ओरडली,

" मला बटरस्कॉच आइस्क्रिम पाहिजे".


मित्रहो या गोष्टीतून आपणास शिकण्यासारखं बरंच काही आहे. तुम्ही थोडक्यात हुकला याचा अर्थ असा नाही की तुमचा अभ्यास कमी होता, फक्त त्या लोकांचा अभ्यास आपल्यापेक्षा थोडा जास्त होता, जो आपणासही करण्यासाठी येत्या काळात भरपूर वेळ आपल्याकडे आहे. 


एक गोष्ट बऱ्याच अधिकाऱ्यांकडून तुम्ही ऐकली असेल, "जोपर्यंत तुम्ही त्या पदाच्या लायक बनत नाही, तोवर पोस्ट मिळणार नाही" त्यामुळे दुःख/अपयश थोडं बाजूला ठेऊन पुन्हा जोमाने अभ्यासाला लागणे फार गरजेचे आहे. स्वतःमध्ये त्या क्षमता आणणे फार गरजेचे आहे. आत्मपरीक्षण करून कुठे चूक झाली पाहणे, आणि त्या चुका पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी घेणेही तितकेच आवश्यक आहे.


आगामी काळात आपणास अभ्यासासाठी भरपूर वेळ उपलब्ध आहे, तेंव्हा पुन्हा एकदा अगदी अगदी सुरवातीपासून सगळं व्यवस्थित जुळवून आणण्याची संधी आपल्याकडे आहे.


अभ्यासासाठी शुभेच्छा...!

No comments:

Post a Comment