Thursday, 21 April 2022

श्री. लाल बहादूर शास्त्री

श्री. लाल बहादूर शास्त्री

June 9, 1964 - January 11, 1966 | Congress

श्री. लाल बहादूर शास्त्री

श्री. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून सात मैल दूर मुघलसराई या लहान रेल्वे गावात झाला. लाल बहादूर शास्त्री केवळ दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. विशीतील त्यांची आई आपल्याड तीन मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाली.

लहान गावात लालबहादूर यांचे शालेय शिक्षण यथातथाच झाले. मात्र तरीही गरीबीतही त्यांचे बालपण काही प्रमाणात सुखात गेले.
उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे, यासाठी त्यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले. घरी सर्वजण त्यांना “नन्हे” नावाने हाक मारीत. ते कित्येक मैल अनवाणी चालत शाळेला जायचे. कडक उन्हाळयातही तापलेल्या रस्त्यावरुन ते शाळेत जायचे. वयात आल्यावर, लाल बहादूर शास्त्री यांना परकीयांच्या गुलामीमधून देशाला मुक्त करण्याच्या लढयात रुची निर्माण झाली. भारतात ब्रिटीश राजवटीला पाठिंबा देणाऱ्या भारतीय राजांची महात्मा गांधी यांनी केलेल्या निंदेमुळे ते अत्यंत प्रभावित झाले. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री केवळ अकरा वर्षांचे होते, आणि तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करण्याबाबतची प्रक्रिया त्यांच्या मनात घोळू लागली.

गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले, त्यावेळी लाल बहादूर शास्त्री सोळा वर्षांचे होते. गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून‍ शिक्षण सोडून देण्याचा विचार एकदा त्यांनी केला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या आईच्या आशा आकांक्षांना हादरा बसला. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगून त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ते प्रयत्न असफल ठरले. लाल बहादूर शास्त्री यांचा निर्धार ठाम होता. त्यांच्या निकटच्या व्यक्तींना माहित होते की एकदा निर्णय घेतला की ते तो कधीही बदलणार नाहीत, कारण बाहेरुन मृदू वाटणारे शास्त्री आतून एखादया खडकासारखे कणखर होते.

ब्रिटीश राजवटीच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या अनेक राष्ट्रीय संस्थांपैकी एक वाराणसीतील काशी विद्यापीठात ते सामील झाले. येथे अनेक महान विद्वान आणि देशभक्तीचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडला. विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पदवीचे नाव “शास्त्री” होते. मात्र लोकांच्या मनात त्यांच्या नावाचा एक भाग म्हणून शास्त्री हे नाव कोरले गेले.

1927 मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांची पत्नी ललिता देवी हया त्यांच्याच शहराजवळील मिर्झापूर येथील होत्या. त्यांचा विवाह पारंपारिक पध्दतीने पार पडला. हुंडा म्हणून एक चरखा आणि हाताने विणलेले काही मीटर कापड होते. यापेक्षा अधिक त्यांना आणखी काही नको होते.
1930 मध्ये, महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा केली आणि मिठाचा कायदा मोडला. या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती आली. लाल बहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढयात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांनी अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व केले आणि एकूण सात वर्षे ब्रिटीश तुरुंगवासात घालवली. स्वातंत्र्याच्या या संग्रामाने ते अधिक परिपक्व झाले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस जेव्हा सत्तेवर आली, त्यापूर्वीच राष्ट्रीय संग्रामातील नेत्यांना नम्र आणि विनित लाल बहादूर शास्त्री यांचे महत्त्व लक्षात आले होते. 1946 मध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाले, तेव्हा या “छोटया डायनॅमो”ला देशाच्या कारभारात रचनात्मक भूमिका पार पाडण्यासाठी सांगण्यात आले. त्यांना त्यांच्या उत्तर प्रदेश राज्याचे संसदीय सचिव नियुक्त करण्यात आले आणि लवकरच ते गृहमंत्री पदावर आरुढ झाले. त्यांची कठोर मेहनत करण्याची क्षमता आणि त्यांची कार्यक्षमता उत्तर प्रदेशात एक लोकोक्ती बनली. 1951 मध्ये ते नवी दिल्लीत आले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वे मंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उदयोग मंत्री, गृहमंत्री आणि नेहरुंच्या आजारपणात बिनखात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांची प्रतिष्ठा निरंतर वाढतच होती. एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे त्यांनी स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला. देश आणि संसदेने त्यांच्या अभूतपूर्ण निर्णयाची प्रशंसा केली. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी या घटनेबाबत संसदेत बोलताना लालबहादूर शास्त्री यांची इमानदार वृत्ती आणि उच्च आदर्शमूल्यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की शास्त्री यांचा राजीनाम मी स्वीकारत आहे कारण यामुळे घटनात्मक मर्यादेमध्ये एक उदाहरण कायम राहील. जे काही घडले त्याला शास्त्री जबाबदार नाहीत. रेल्वे अपघातावरील दीर्घ चर्चेला उत्तर देताना लाल बहादूर शास्त्री म्हणाले “कदाचित माझी उंची कमी असल्यामुळे तसेच नम्र असल्यामुळे लोकांना वाटत असावं की कणखर होऊ शकत नाही. जरी मी शारीरिकदृष्टया धडधाकट नसलो तरी मला वाटते की मी आतून इतका कमकुवतही नाही.”
आपल्या मंत्रालयीन कामकाजादरम्यान, काँग्रेस पक्षाशी संबंधित व्यवहाराकडेही त्यांनी लक्ष दिले आणि त्यात भरीव योगदानही दिले. 1952, 1957 आणि 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकांमधील पक्षाच्या निर्णायक आणि जबरदस्त यशामध्ये त्यांचे संघटनात्मक कौशल्य आणि एखाद्या गोष्टीची जवळून पारखण्याची त्यांची क्षमता यांचे मोठे योगदान होते.

तीसहून अधिक वर्षे आपल्या समर्पित सेवेदरम्यान लाल बहादूर शास्त्री निष्ठा, क्षमतेसाठी जनमानसांत लोकप्रिय झाले. नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी लोकांची भावना समजून घेणारे खऱ्या अर्थाने त्यांचे मित्र बनले. त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. लाल बहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता. आपले गुरु महात्मा गांधीच्या शैलीत ते एकदा म्हणाले. “कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे.” महात्मा गांधी यांची परंपरा कायम राखणारे लाल बहादूर शास्त्री यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले.

No comments:

Post a Comment