महात्मा गांधी
मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, इ.स. १८६९ - जानेवारी ३०, इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते.
महात्मा
मोहनदास करमचंद गांधी
असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. इ.स. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. इ.स. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. गांधी आजीवन साम्प्रदायीकातावादाचे (सम्प्रदायांवर राजकारण करणे) विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणाऱ्या खिलाफत चळवळीला त्यांनी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले. इ.स. १९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. (२५० मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. इ.स. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.
गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यांनी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. ब्रिटनमधील विन्स्टन चर्चिल यांनी १९३० साली त्यांची "अर्धनग्न फकीर" म्हणून निर्भत्सना केली. स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले. त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये भारत पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झालेल्या गांधींनी हिंदू-मुस्लिम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्न केले.
सुरुवातीचा काळ
महात्मा गांधी लहानपणीचे
महात्मा गांधी इंग्लंड मध्ये
गांधींचा जन्म ऑक्टोबर २, इ.स. १८६९ या दिवशी सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. करमचंद गांधी तत्कालीन काठेवाड प्रांतातील पोरबंदरमध्ये दिवाण होते. त्यांच्या आजोबांचे नाव उत्तमचंद गांधी असे होते. त्यांना उत्ता गांधी असेदेखील म्हणत. पुतळीबाई या करमचंद यांच्या चौथ्या पत्नी होत्या. आधीच्या तीन पत्नी प्रसूतिदरम्यान मृत पावल्या होत्या. अत्यंत धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या पुढील आयुष्यावर दिसून येतो. विशेषतः अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता, इतरांबद्दल करुणा या तत्त्वांचे बीज याच काळात रोवले गेले. आईमुळे मोहनदासांवर जैन संकल्पना आणि प्रथांचा प्रभाव होता. प्राचीन वाङ्मयातील श्रावणबाळ आणि हरिश्चंद्र या दोन कथांचा मोहनदासचा मनावर गहिरा परिणाम होता. स्वतःच्या आत्मचरित्रात ते कबूल करतात की या दोन कथांमुळे त्यांच्या मनावर अमिट परिणाम झाला होता. ते लिहितात "त्याने मला झपाटले आणि मी अगणित वेळा माझ्याशीच हरिश्चंन्द्रासारखा वागलो असेन" गांधीच्या सत्य आणि प्रेम या दैवी गुणाशी झालेल्या स्व:ओळखीचा माग हा या पौराणिक पात्रांपर्यंत येऊन पोहोचतो.
इ.स. १८८३ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा कस्तुरबा माखनजी यांच्या बरोबर बालविवाह झाला.त्यांचे नाव लहान करून कस्तुरबा (आणि प्रेमाने बा) असे घेतले जाई. पण त्या काळातील रिवाजानुसार कस्तुरबा बहुतांश काळ त्यांच्या वडिलांच्या घरीच होत्या.[२]या प्रक्रियेत मोहनदासला शालेय शिक्षणाचे एक वर्ष गमवावे लागले. लग्नाच्या दिवसाच्या आठवणींबद्दल ते एकदा म्हणाले होते, "आम्हाला लग्नाबद्दल फार काही माहीत नसल्यामुळे लग्न म्हणजे आमचासाठी नवीन कपडे घालणे, गोड खाऊ खाणे आणि नातेवाइकांबरोबर खेळणे" हेच होते. इ.स. १८८५ मध्ये जेव्हा गांधीजी १५ वर्षांचे होते तेव्हा त्यांना पहिले अपत्य झाले, पण ते खूप कमी काळ जगले. त्याच वर्षी आधी वडील करमचंद गांधींचा स्वर्गवास झाला होता.पुढे गांधीजी आणि कस्तुरबा यांना अजून चार मुले झाली- इ.स. १८८८ मध्ये हरीलाल, इ.स. १८९२ मध्ये मणिलाल, इ.स. १८९७ मध्ये रामदास आणि इ.स. १९०० मध्ये देवदास.
त्यांच्या पोरबंदरमधील प्राथमिक तसेच राजकोटमधील माध्यमिक शिक्षणामध्ये ते एक साधारण विद्यार्थी होते. त्यांचा एका वार्षिक परीक्षेतील अहवाल पुढीलप्रमाणे होता - "इंग्रजीत चांगला, अंकगणितात ठीक आणि भूगोलात कच्चा. वर्तणूक अतिशय चांगली, हस्ताक्षर खराब " ते मॅट्रिकची परीक्षा भावनगरमधील शामळदास कॉलेजमधून थोड्या कष्टानेच पास झाले आणि तेथे असतांना, त्यांनी वकील व्हावे या त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेबद्दल ते नाखूश होते.
बॅरिस्टर
शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी इ.स. १८८८ मध्ये ते इंग्लंडमध्ये लंडनला युनिव्हर्सिटी कॉलेज, वकिलीचे शिक्षण घेण्यास गेले. तेथे त्यानी इनर टेंपल या गावी राहून बॅरिस्टर होण्यासाठी भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला. इंग्लंडला जाण्याआधी त्यांनी आईला जैन साधूच्या उपस्थितीत आपण मांस, बाई व बाटली (दारू) यापासून दूर राहू असे वचन दिले होते, त्याचे त्यांनी तिथे पालन केले. परंतु लंडन मधील सपक शाकाहारी जेवणाची चव त्यांना आवडली नाही. आणि लंडनमधील त्याकाळी दुर्मीळ असलेली एक भारतीय खानावळ सापडेपर्यंत ते खूप वेळा उपाशी राहिले. गांधींनी तेथे इंग्रजी चालीरीती ग्रहण करण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ नर्तनाची शिकवणी लावणे. ते इंग्लंडमध्ये शाकाहारी संस्थेचे सदस्य बनले आणि लवकरच त्याच्या अध्यक्षपदी पोहोचले. तेथे ज्या शाकाहारी व्यक्तीना गांधी भेटले, त्यातील काही स्त्रिया थिओसोफ़िकल सोसायटीच्या सदस्य होत्या. त्यांनी गांधीना आपल्यात येऊन मिळण्यासाठी आणि भाषांतरित आणि मूळ भगवद्गीता वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले. आधी धार्मिक गोष्टीत रस नसणारे गांधी धार्मिक गोष्टीत रस घ्यायला लागले.
इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले आणि हिंदुस्थानात परत येऊन वकिली करू लागले. १८९१ मध्ये ते इंग्लंड सोडून परत भारतात आले. भारतात आल्यावर कळले की त्यांच्या आईचा ते लंडनमध्ये असतानाच देहान्त झाला आहे आणि त्यांच्या कुटुंबाने ही बातमी त्यांच्यापासून लपवून ठेवली. मुंबईमध्ये कायद्याची प्रॅक्टिस उभी करण्याची त्यांची योजना सफल झाली नाही कारण ते कोर्टात बोलण्यासाठी अतिशय लाजाळू होते. खटल्यांसाठी मसुदा तयार करण्याच्या साध्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी ते राजकोटला परत आले परंतु एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या विरोधात गेल्याने हे काम त्यांना बंद करावे लागले. १८९३ मध्ये त्यानी त्या काळच्या ब्रिटिश साम्राज्यामधील नाताळ (दक्षिण आफ्रिका) येथील दादा अब्दुल्ला आणि कंपनी नावाच्या एका भारतीय कंपनीतील एका पदासाठी एक वर्षाचा करार केला.
दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य
महात्मा गांधी (सर्वात मध्ये) १९१३ला सहयोग्यांबरोबर दक्षिण आफ्रिकेत
गांधीनी आयुष्याची २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालवली, जेथे त्यानी त्यांचे राजकीय दृष्टिकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्ये विकसित केली. दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांचे नेतृत्व असणाऱ्या श्रीमंत मुस्लिमांनी आणि अतिशय कमी अधिकार असणाऱ्या गरीब हिंदू गिरमिट्यानी(?) गांधीना नोकरी दिली. 'भारतीयत्व' सर्व धर्म आणि जातींमध्ये उतरले आहे असा दृष्टिकोन आयुष्यभर ठेवत गांधीनी या सर्वाना भारतीयच मानले. मुख्यत्वे धर्माच्या बाबतीत ऐतिहासिक भिन्नता आपण सांधू शकू असा त्यांना स्वतःबद्दल विश्वास होता, आणि हा विश्वास घेऊन ते भारतात आले. येथे त्यांनी या विश्वासाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला.
दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधींना समाजाच्या विकालांगाची ओळख झाली. भारतीय धर्म आणि संस्कृती यांमध्ये असलेल्या गुंतागुंतीच्या समस्यांपासून आपण दूर आहोत याची त्यांना जाणीव झाली आणि दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना समजून घेऊन व त्यांचे नेतृत्व करून आपणास भारत समजला असे ते मानू लागले.
दक्षिण आफ्रिकेत गांधीना गौरेतर लोकांबद्दल असलेल्या भेदभावाला सामोरे जावे लागले, तेथील भारतीयांना दिली जाणारी असमान वागणूक अनुभवली. पहिल्या वर्गाचे तिकिट असतांनासुद्धा त्यांना पीटरमारित्झबर्गमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांनी तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले. गांधीजीनी नकार देताच त्यांना अपमान करून आगगाडीमधून ढकलून देण्यात आले. ती संपूर्ण रात्र गांधीनी फलाटावरील गेस्टरूममध्ये काढली. (७ जून १८९३). गांधीनी ठरवले असते तर उद्दाम वर्तन करणाऱ्या त्या रेल्वे अधिकाऱ्यास ते अद्दल घडवू शकले असते. पण सूडभावनेने कोणाला शिक्षा करविणे हा त्यांचा हेतू नव्हता तर अन्यायकारक व्यवस्था बदलवणे हा त्यांचा हेतू होता.
पुढे एकदा, प्रवाशांना वाट करून न दिल्यामुळे वाहन चालकाने त्यांना मारले. पूर्ण प्रवासात त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या. अनेक हॉटेलमधून त्यांना हाकलून देण्यात आले. अशा अनेक घटनांपैकी अजून एक घटना म्हणजे, डर्बनमध्ये न्यायाधीशाने त्यांना त्यांची टोपी काढून ठेवण्याचा हुकूम दिला. गांधींनी तेव्हाही नकार दिला. या घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्याऱ्या ठरल्या. हे सर्व अनुभव घेतल्यावर गांधीनी स्वतःचे समाजातील स्थान आणि ब्रिटिश राज्यातील आपल्या लोकांची किंमत याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे भारतीयांबद्दलच्या वंशभेद, असमानता यांना सामोरे गेल्यावर गांधींनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास व समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली.
तेथील भारतीयांचा मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू करण्यात येणार होता, या कायद्याला विरोध करणाऱ्या भारतीयांना मदत करण्यासाठी गांधींनी आपले दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य काही काळासाठी वाढवले. हा कायदा रद्द करण्यात जरी ते अयशस्वी ठरले तरी यामुळे भारतीयांवरील अन्यायाकडे लक्ष वेधण्यात त्यांची चळवळ यशस्वी झाली. त्यांनी इ.स. १८९४ मध्ये नाताळ भारतीय काँग्रेसची स्थापना केली व याद्वारे दक्षिण आफ्रिकेतील विखुरलेल्या भारतीयांना त्यांनी एका राजकीय पक्षात परावर्तित केले. इ.स. १८९७ मध्ये काही काळाच्या भारतातील वास्तव्यानंतर दरबानमध्ये उतरत असताना काही गोऱ्या लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला व त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आणि केवळ पोलीस अधीक्षकाच्या पत्नीच्या सहकार्याने त्यांची सुटका झाली. या घटनेत त्यांच्या तोंडाला इजा झाली आणि दोन दात तुटले. पण त्यांनी न्यायालयात तक्रार करण्यास नकार दिला. वैयक्तिक त्रासाबद्दल न्यायालयात जाणे त्यांच्या तत्त्वांमध्ये नव्हते.
इ.स. १९०६ मध्ये ट्रान्सवाल सरकारने एका नवीन कायद्याची घोषणा केली. या कायद्यानुसार तेथील प्रत्येक भारतीयाला स्वतःची नोंदणी करणे बंधनकारक झाले होते. याला विरोध करण्यासाठी बोलवलेल्या सभेमध्ये, त्या वर्षीच्या ११ सप्टेंबर ला, गांधींनी, पहिल्यांदाच आपल्या अजूनही विकसित होत असलेल्या असलेल्या सत्याग्रहाच्या किंवा अहिंसात्मक कार्यप्रणालीला आपलेसे केले. त्यांनी भारतीय बांधवांना अहिंसक पद्धतीने या कायद्यास विरोध करण्यास सांगितले व असे करतांना झालेले अत्याचार सहन करण्यास सांगितले. तेथील समुदायाने या आवाहनाला साद दिली आणि आगामी सात वर्षात हजारो भारतीयांनी हरताळ केल्यामुळे, नोंदणी करण्यास नकार दिल्यामुळे, नोंदणी पत्रक जाळून टाकणे आणि तत्सम अहिंसात्मक कार्यात सामील झाल्यामुळे लोकांनी तुरुंगवास भोगला, चाबकाचे फटके खाल्ले आणि बंदुकीच्या गोळ्याही खाल्या. सरकारने भारतीय आंदोलकांचा हा विरोध यशस्वीरीत्या मोडून काढला तरी पण या अहिंसक चळवळीची व लोकक्षोभाची नोंद घेण्यास आणि गांधींशी वाटाघाटी करण्यास स्वतः तत्त्वज्ञ असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील नेता जॉन क्रिस्तिआन स्मट्स याला भाग पडले. शांततामय मार्गाने निदर्शने करणाऱ्या निदर्शकांवरील दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने केलेल्या कठोर कारवायांमुळे लोकक्षोभ निर्माण झाला होता. गांधींच्या कल्पनांनी आकार घेतला आणि सत्याग्रहाची संकल्पना या संघर्षादरम्यान परिपक्व झाली.
१९०६ मध्ये इंग्रजांनी नाताळमध्ये झुलू राज्याविरुद्ध युद्ध पुकारले. इंग्रजांच्या बाजूने लढण्यासाठी भारतीयांना भरती करवून घेण्यासाठी गांधीनी इंग्रजांना प्रोत्साहित केले. भारतीयांनी पूर्ण नागरिकत्वाच्या दाव्यास वैध ठरवण्यासाठी इंग्रजांच्या पाठिंबा देणे गरजेचे आहे असा युक्तिवाद त्यानी केला. ब्रिटिशानी गांधींची ही मागणी मान्य केली. आणि २० जणांच्या भारतीय स्वयंसेवकांच्या तुकडीला जाऊ दिले. जखमी सैनिकांना उपचार देण्यासाठी स्ट्रेचरवरून वाहून नेणे ही या तुकडीची जबाबदारी होती. ही तुकडी गांधींच्या नियंत्रणाखाली होती. दोन महिन्यांपेक्षाही कमी काळ या तुकडीने काम केले. या अनुभवातून ते असे शिकले की ब्रिटिशांच्या अपरिहार्य वाढणाऱ्या मिलिटरी ताकदीस उघड उघड आवाहन देणे निराशाजनक आहे - त्यानी ठरवून टाकले की याचा प्रतिकार हृदयातील पवित्र अश्या अहिंसात्मक पद्धतीनेच करता येईल. नंतर जेव्हा काळ्या लोकांचे बहुमत सत्तेत आले तेव्हा गांधीना राष्ट्रीय नायक म्हणून विविध स्मारकांत घोषित करण्यात आले.
स्वातंत्र्यसंग्राम
इ.स. १९१५मध्ये गांधीजी कायमसाठी भारतात परत आले. एक प्रमुख भारतीय राष्ट्रवादी, थिओरिस्ट आणि संघटक अशी त्यांची आंतरराष्ट्रीय ख्याती होती. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक संमेलनांतून बोलले. खऱ्या अर्थी भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी करून दिला. गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रमुख नेते होते. गोखले त्यांच्या संयम, संतुलन आणि व्यवस्थेच्या आतमध्ये राहून काम करण्याच्या आग्रहाबद्दल ओळखले जात. आजही ते गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात. गांधीनी गोखल्यांचा ब्रिटिशांच्या परंपरांवर आधारित उदार दृष्टिकोन अनुसरला, आणि तो पूर्णपणे भारतीय दिसण्यासाठी बदलला. १९२० मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्यावर ते राष्ट्रीय सभेचे प्रमुख नेते बनले.
गांधीनी १९२०मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर मागण्यांमध्ये सतत वाढ करत करत (काही ठिकाणी थांबत आणि तडजोड करत) २६ जानेवारी १९३० काँग्रेसने भारताचे स्वातंत्र्य जाहीर करून टाकले. अधिकाधिक वाटाघाटी होत गेल्या आणि काँग्रेसने १९३०मध्ये प्रांतीय सरकारमध्ये भाग घेऊ पर्यंत ब्रिटिशांना हे ओळखता आले नाही. १९३९ च्या सप्टेंबर मध्ये कोणाशीही सल्लामसलत न करता व्हाईसरॉयने जेव्हा जर्मनीविरुद्ध युद्ध जाहीर केले तेंव्हा गांधीनी आणि काँग्रेसने ब्रिटिश सरकारचा पाठिंबा काढून घेतला. गांधीनी १९४२मध्ये तत्काळ स्वराज्याची मागणी करेपर्यंत आणि ब्रिटिश सरकारने प्रतिसाद म्हणून त्यांना आणि लाखो काँग्रेसच्या नेत्यांना तुरुंगात डांबेपर्यंत तणाव वाढतच गेला. दरम्यान मुस्लिम लीगने ब्रिटनला सहकार्य केले, आणि गांधींच्या तीव्र विरोधाला डावलून मुस्लिमांच्या संपूर्ण स्वतंत्र राष्ट्राची, पाकिस्तानची मागणी केली. १९४७ मध्ये ब्रिटिशानी भूमीची फाळणी केली आणि गांधीनी अमान्य केलेल्या शर्तींवर भारत आणि पाकिस्तानने वेगवेगळे स्वातंत्र्य मिळवले.
पहिल्या महायुद्धातील भूमिका
एप्रिल १९१८ला पहिल्या महायुद्धाच्या नंतरच्या काळात, व्हाईसरॉय ने गांधीना दिल्लीत एका युद्ध परिषदेसाठी बोलावले. कदाचित गांधीनी त्यांचा इंग्रज साम्राज्यास असलेला पाठींबा दर्शवावा आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीसाठी मदत मिळवावी हा त्यामागचा हेतू होता. गांधीनी भारतीयांना सक्रियपणे युद्धात उतरवण्याची तयारी दर्शवली. १९०६ मधील झुलू युद्ध आणि १९१४ मधील प्रथम जागतिक युद्धामधील भरतीच्या विरुद्ध या वेळी जेंव्हा त्यानी रुग्णवाहिका दलासाठी स्वयंसेवक भरती केले, तेंव्हा योद्धे भरती करण्याचा प्रयत्न केला. जून १९१८ला प्रसिद्ध केलेल्या एका ' फौजेत भारती होण्याचे आवाहन' मध्ये गांधी म्हणतात - "ही गोष्ट (स्वातंत्र्य) प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्यामध्ये स्वतःचे रक्षण करण्याची क्षमता असली पाहिजे, म्हणजेच शस्त्र बाळगण्याची आणि वापरण्याची क्षमता...... आपल्याला जर शस्त्र सर्वाधिक कौशल्याने वापरण्याची कला अवगत करायची असेल तर फौजेत भरती होणे हे आपले कर्तव्य आहे" असे जरी असले तरी व्हाईसरॉयच्या खासगी सचिवास लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात "वैयक्तिकरीत्या कोणालाही, मित्र व शत्रूस, मारणार नाही अथवा जखमी करणार नाही."
गांधींच्या युद्धभरतीने त्यांच्या अहिंसेबद्दलच्या एकजिनसीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यांचा मित्र चार्ली आंद्रीउस नमूद करतो - "वैयक्तिकरीत्या मला कधीही त्यांच्या ह्या वर्तणुकीचा त्यांच्या स्वतःच्या इतर वर्तनांशी मेळ घालता आला नाही. ज्यावर मी वेदनादायकरीत्या असहमत झालो आहे हा त्या मुद्यांपैकी एक आहे."
चंपारण आणि खेडा
मुख्य पान: चंपारण व खेडा सत्याग्रह
महात्मा गांधी खेडा येथे १९१८
गांधीजीना पहिले मोठे यश १९१८ मध्ये चंपारण आणि खेडामधील सत्याग्रहात मिळाले. चंपारण, बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत. त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे. यांमुळे ते सतत गरिबीत राहत. शेतकऱ्यांची गावे अत्यंत घाणेरडी आणि आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठेवली जात. तसेच दारू, अस्पृश्यता, पडदा पद्धत अशा अनेक समस्या या गावांमध्ये होत्या. यावर भर म्हणजे तेथील दुष्काळ, पण इंग्रजानी तरीही अनेक जाचक कर लादले होते आणि ते वाढतच होते. गुजरातमधील खेडामध्येसुद्धा स्थिती काही वेगळी नव्हती. गांधीजींनी तिथे एक आश्रम उभारला. तिथे त्यांनी त्यांच्या लहान-मोठ्या सर्व अनुयायांना एकत्र केले. त्यांनी त्या भागातील परिस्थितीची माहिती गोळा केली व तिचा सखोल अभ्यास केला. गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी गावाच्या स्वच्छतेचे तसेच शाळा, रुग्णालयाच्या बांधकामाचे काम हाती घेतले. याचसोबत गावातील प्रमुखांना वर उल्लेखलेल्या प्रथा नष्ट करण्यास प्रवृत्त केले.
जेव्हा पोलिसांनी त्यांना प्रदेशात अशांतता निर्माण करण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली व तो भाग सोडून जाण्यास सांगितले, तेव्हा गांधीजींचा प्रभाव जाणवून आला. हजारो लोकांनी या अटकेचा विरोध केला. त्यांनी गांधीजींच्या सुटकेसाठी तुरुंगाबाहेर, पोलीस स्थानकासमोर आणि न्यायालयासमोर मोर्चे काढले. न्यायालयाने शेवटी नाइलाजाने त्यांची मागणी मान्य केली. गांधीजींनी जमीनदारांविरुद्ध सुसंघटित आंदोलने चालू केली. याचा परिणाम म्हणजे तेथील जमीनदारांनी ब्रिटिश सरकारच्या मार्गदर्शनाखाली एक ठराव मंजूर केला. त्यानुसार शेतकऱ्यांना जास्त मोबदला आणि स्वतःच्या मतानुसार पीक घेण्याची मोकळीक मिळाली, तसेच करवाढ होऊन दुष्काळ असेपर्यंत कर भरण्यापासून सूट मिळाली. या आंदोलनादरम्यानच गांधीजींचा उल्लेख लोक ”’बापू”’ आणि ”’महात्मा”’ म्हणून करू लागले. खेडामध्ये सरदार पटेलांनी शेतकऱ्यांच्या बाजूने इंग्रजांसोबत वाटाघाटी केल्या. त्यानतर कर रद्द करण्यात आला आणि सर्वांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. या आंदोलनामुळे गांधीजींची प्रसिद्धी सर्व भारतभर पोहोचली.
असहकार
गांधीजींनी असहकार, अहिंसा आणि शांततामय विरोध यांना शस्त्र म्हणून इंग्रजांविरुद्ध वापरले. पंजाबमध्ये जालियनवाला बाग हत्याकांडानंतर लोकांच्या क्रोधाचा उद्वेग झाला आणि अनेक ठिकाणी हिंसक विरोध झाले. गांधीजींनी जालियनवाला बाग हत्याकांड तसेच त्यानंतरचे हिंसक विरोध दोन्हींचा निषेध केला. त्यांनी या दंग्यांना बळी पडलेल्या ब्रिटिश नागरिकांबद्दल सहानुभूती दर्शविणारा आणि दंग्यांचा निषेध करणारा एक ठराव मांडला. या ठरावाला काँग्रेसमध्ये सुरुवातीला विरोध झाला. पण गांधीजींच्या तत्त्वांनुसार कोणत्याही प्रकारची हिंसा ही पाप होती आणि त्याचे समर्थन करता येणे शक्य नव्हते. हे तत्त्व मांडणाऱ्या त्यांच्या भावनाप्रधान भाषणानंतर काँग्रेसने त्यांचा ठराव मान्य केला. पण या हत्याकांडाच्या आणि त्यानंतरच्या हिंसेच्या पश्चात गांधीजींनी आपले सर्व लक्ष पूर्ण स्वराज्यावर केंद्रित केले. त्यांच्या पूर्ण स्वराज्याच्या कल्पनेत पूर्ण वैयक्तिक, धार्मिक आणि राजकीय स्वातंत्र्य समाविष्ट होते.
डिसेंबर इ.स. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पूर्ण अधिकार गांधीजींना देण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची पुनर्बांधणी नवीन संविधानानुसार करण्यात आली. ज्याचा मुख्य उद्देश होता - स्वराज्य. पक्षाचे सभासदत्व थोड्याशा फीच्या मोबदल्यात सर्वांना खुले करण्यात आले. पक्षातील शिस्त वाढवण्यासाठी श्रेणीनुसार समित्या बनवल्या गेल्या. यामुळे फक्त उच्चभ्रूंसाठीच समजल्या जाणाऱ्या पक्षाचे स्वरूप बदलले आणि काँग्रेस जनसामांन्याचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष बनला. गांधीजींनी अहिंसेच्या तत्त्वाला स्वदेशीची जोड दिली. त्यांनी सर्वांना परदेशी - विशेषतः ब्रिटिश - वस्तूंचा बहिष्कार करण्याचे आवाहन केले. या तत्त्वानुसार सर्व भारतीयांनी ब्रिटिश कपड्यांच्या ऐवजी खादीचा उपयोग करावा असे अभिप्रेत होते. प्रत्येक भारतीय पुरूष आणि स्त्रीने, प्रत्येक गरीब आणि श्रीमंत व्यक्तीने, दिवसाचा काही काळ भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या समर्थनार्थ चरख्यावर सूत कातावे असा गांधीजींचा आग्रह होता.याचा मुख्य उद्देश शिस्त आणि स्वावलंबनाचे महत्त्व लोकांच्या मनावर ठसवणे तसेच स्त्रियांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी करूण घेणे हा होता. ब्रिटिश वस्तूंच्या बहिष्काराबरोबरच ब्रिटिश शैक्षणिक संस्थांचा बहिष्कार, सरकारी नोकरीचा त्याग आणि ब्रिटिशांनी दिलेल्या मान आणि पदव्यांचा त्याग करण्याचे आवाहन गांधीजींनी केले.
असहकार चळवळीला समाजातील सर्व स्तरांमधून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. पण असहकार चळवळ जोमात असतांनाच असस्मात थांबवण्यात आली. याला कारण ठरले,उत्तर प्रदेशमधील चौरी चौरा गावात चळवळीला मिळालेले हिंसक वळण. ४ फेब्रुवारी इ.स. १९२२ रोजी पोलिसांनी जमावावर केलेल्या गोळीबाराने संतप्त होऊन आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला व नंतर पोलीस ठाण्याला आग लावली. जमावावरील गोळीबारात तीन जण मरण पावले तर पोलीस ठाण्यात २३ पोलीस जळून मरण पावले. पुढे अजून जास्त हिंसक घटना घडतील या भीतीने गांधीजींनी चळवळ स्थगित केली.१० मार्च इ.स. १९२२मध्ये गांधीजींना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली व सहा वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला. इ.स. १९२४ मध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासानंतर अपेंडिक्सच्या ऑपरेशनच्या कारणावरून त्यांची सुटका करण्यात आली.
गांधीजी तुरुंगात असतांना त्यांच्या नेतृत्वाअभावी काँग्रेसमध्ये फूट पडू लागली. शेवटी काँग्रेसचे दोन गटात विभाजन झाले. एका गटाचे नेतृत्व चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांच्याकडे होते. हा गटाचा कल संसदीय कार्यकारणीत भाग घेण्याकडे होता. पण चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या गटाचा याला विरोध होता. हिंदू-मुस्लिमांमधला चळवळीदरम्यान वाढीस लागलेला एकोपासुद्धा हळूहळू कमी होत होता. गांधी़जींनी हे मतभेद दूर करण्याचे अनेक प्रयत्न केले. इ.स. १९२४ मध्ये त्यांनी यासाठी तीन आठवड्यांचा उपवास केला. पण या प्रयत्नांना म्हणावे तितके यश मिळाले नाही.
स्वराज्य आणि मिठाचा सत्याग्रह
महात्मा गांधी दांडी यात्रेत
महात्मा गांधी दांडी येथे मीठ उचलतांना गांधीजी
१९२० च्या दशकाचा मोठा काळ गांधीजी प्रत्यक्ष राजकारणापासून दूर राहिले आणि त्यांनी आपले लक्ष स्वराज्य पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील मतभेद दूर करण्यावर केंद्रित केले. या काळात त्यांनी समाजातील अस्पृश्यता, दारू समस्या आणि गरिबी कमी करण्याचे आपले प्रयत्न चालू ठेवले. राजकारणाच्या पटावर ते इ.स. १९२८ मध्ये परत आले. एक वर्ष आधी ब्रिटिश सरकारने संविधानात सुधारणा करण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीमध्ये एकपण भारतीय सदस्य नव्हता. या कारणाने भारतीय पक्षांनी या समितीवर बहिष्कार टाकला. गांधीजींनी १९२८ च्या कलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनात एक ठराव पास केला. त्याद्वारे ब्रिटिश सरकारकडे भारताला सार्वभौम दर्जा देण्याची मागणी करण्यात आली व ही मागणी मंजूर न केल्यास परत पूर्ण स्वराज्यासाठी असहकार चळवळ सुरू करण्यात येईल असे बजावण्यात आले. पक्षातील सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या तरुण नेत्यांची मागणी तात्काळ स्वराज्याची होती. पण गांधीजींनी ब्रिटिश सरकारला उत्तरासाठी एका वर्षाचा अवधी दिला. पण ब्रिटिश सरकारने काही उत्तर दिले नाही आणि ३१ डिसेंबर इ.स. १९२९ मध्ये लाहोर अधिवेशनात भारताचा ध्वज फडकवण्यात आला. हा दिवस काँग्रेसने स्वराज्य दिन म्हणून साजरा केला. पक्षातील प्रत्येक लहान थोराने हा दिवस साजरा केला. गांधीजींनी मग मार्च इ.स. १९३० मध्ये मिठावरील कराच्या विरोधात सत्याग्रहाची घोषणा केली आणि त्याची परिणती प्रसिद्ध दांडी यात्रेत झाली. १२ मार्चला अहमदाबादहून निघालेली यात्रा, ६ एप्रिलला ४०० कि.मी.चा (२५० मैल) प्रवास करून दांडीला पोहोचली. हजारोंच्या संख्येने भारतीय या यात्रेत सहभागी झाले होते. ही यात्रा इंग्रजांची भारतातील पाळेमुळे उखडण्याच्या प्रयत्नांमधील सर्वांत यशस्वी प्रयत्न ठरली. ब्रिटिशांनी उत्तरादाखल ६०,०००हून अधिक लोकांना तुरुंगात डांबले.
शेवटी लॉर्ड एडवर्ड आयर्विन यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सरकारने गांधीजींशी वाटाघाटी करण्याचे ठरवले. मार्च इ.स. १९३१ मध्ये गांधी-आयर्विन करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार ब्रिटिश सरकारने सर्व भारतीय कैद्यांना मुक्त करण्याचे मान्य केले आणि त्याबदल्यात कायदेभंगाची चळवळ बंद करण्याची मागणी घातली. याबरोबरच गांधीजींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एकमेव प्रतिनिधी म्हणून लंडनमध्ये होणाऱ्या गोल मेज परिषदेचे आमंत्रण दिले. ही परिषद गांधीजी आणि पक्षासाठी निराशाजनकच ठरली, कारण त्यामध्ये सत्तांतरणावर भर देण्याऐवजी भारतातील राजे-रजवाडे आणि अल्पसंख्यक यांच्यावर जास्त भर देण्यात आला होता. यातच भर म्हणजे आयर्विननंतर आलेले लॉर्ड विलिंग्डन यांनी राष्ट्रवाद्यांची चळवळ नरम पाडण्याचे प्रयत्न चालू केले. गांधी़जींना अटक करण्यात आली. त्यांचा अनुयायांवरील प्रभाव कमी करण्यासाठी त्यांना वेगळे करण्याचा हा डाव होता. पण त्यांचे हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.
इ.स. १९३२ मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या मागणीनुसार ब्रिटिश सरकारने दलितांना वेगळे मतदारसंघ देण्याचा निर्णय घेतला. याविरोधात गांधीजींनी सहा दिवसांचे उपोषण केले. यामुळे ब्रिटिश सरकारला अजून जास्त समानतेवर आधारित मतदारसंघ विभागणी करणे भाग पडले. या वाटाघाटी दलित समाजातील (भूतपूर्व क्रिकेट खेळाडू) पी. बाळू यांच्या मध्यस्थीने पार पडल्या. याबाबत गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये पुण्यामध्ये झालेल्या करारास पुणे करार असे म्हटले जाते. येथून पुढे गांधीजींनी दलितांच्या उद्धारासाठी काम करणे चालू केले. ते दलितांना हरिजन (देवाची माणसे) म्हणत. ८ मे इ.स. १९३३ला गांधीजींनी दलित चळवळीसाठी २१ दिवसाच्या उपोषणाची सुरुवात केली. त्यांचे हे प्रयत्न तितके यशस्वी ठरले नाहीत. दलित समाजामधून त्यांना पुरेसा पाठिंबा मिळाला नाही. आंबेडकरांनी दलितांना हरिजन म्हणण्याचा निषेध केला. त्यांच्या मते दलितांना हरिजन म्हणणे म्हणजे त्यांना सामाजिकदृष्ट्या अपरिपक्व म्हणण्यासारखे आहे आणि ते संबोधन, उच्च जातीं दलितांच्या पालक आहेत, असे प्रतीत करते. गांधीजी हे दलितांचे राजनैतिक हक्क हिरावून घेत आहेत असेपण आंबेडकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना वाटत असे. आंबेडकरांसारखे दलित समाजातील नेते असतांनासुद्धा आणि स्वतः वैश्य असूनही, आपण दलितांची बाजू मांडू शकतो असा गांधीजींना विश्वास होता.
इ.स. १९३४च्या उन्हाळ्यात गांधीजींवर तीन अयशस्वी प्राणघातकी हल्ले झाले.
जेव्हा काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा आणि फेडरेशन आराखड्याअंतर्गत सत्ता हातात घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा गांधीजींनी आपल्या पक्ष-सभासदत्वाचा राजीनामा दिला. गाधींजी पक्षाच्या या निर्यणाबद्दल असहमत नव्हते. पण त्यांना असे वाटले की, जर त्यांनी राजीनामा दिला तर, त्यांची भारतीयांमधील प्रसिद्धी, पक्षाच्या इतर साम्यवादी, समाजवादी, कामगार प्रतिनिधी, विद्यार्थी, धार्मिक रूढीतत्त्ववादी आणि व्यापारी वर्गातील प्रतिनिधींना आपले विचार जनतेसमोर मांडू देण्याच्या आड येणार नाही. तसेच गांधीजी ब्रिटिश सरकारमध्ये सहभाग स्वीकारलेल्या पक्षाचे (काँग्रेसचे) नेतृत्व करून इंग्रजांना त्यांच्याविरुद्ध बोलण्याची अजून एक संधी देऊ इच्छित नव्हते.
गांधीजी इ.स. १९३६ मध्ये पक्षात परत आले. तेव्हा जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे लखनौ येथे अधिवेशन चालू होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या भविष्याबद्दल विचार करण्यापेक्षा आधी पूर्ण स्वराज्य कसे मिळेल यावर सर्व लक्ष केंद्रित करण्यात यावे, असे गांधीजींचे मत होते. पण तरीही पक्षाच्या समाजवादी धोरणाचा अवलंब करण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध केला नाही. इ.स. १९३८ साली पक्षाध्यक्षपदी निवडून आलेले सुभाषचंद्र बोस आणि गांधीजीं यांच्यात अनेक वाद झाले. गांधीजींच्या या विरोधाची मूळ कारणे सुभाषचंद्रांचा अहिंसेवरील अविश्वासही होती. गांधीजींचा विरोध असूनसुद्धा बोस सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आले. पण जेव्हा सुभाषचंद्रांनी गांधीजींच्या तत्त्वांना सोडून दिले आहे असे कारण पुढे करून देशभरात अनेक पक्षनेत्यांनी सामुदायिक राजीनामे दिले, तेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
दुसरे महायुद्ध आणि भारत छोडो आंदोलन
पंडित नेहरू आणि महात्मा गांधी. ८ ऑगस्ट १९४२. भारत छोडो आंदोलन. यानंतर लगेचच दुसरी दिवशी सकाळी गांधीना अटक करण्यात आली.
इ.स. १९३९ मध्ये जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले आणि दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. सुरुवातीला गांधीजी ब्रिटिशांना 'अहिंसक नैतिक पाठिंबा' देण्याच्या मताचे होते. पण पक्षातील इतर नेते, भारतीय लोकप्रतिनिधींचे मत घेतल्याशिवाय भारताला एकतर्फीपणे युद्धात ओढल्यामुळे नाखुश होते. सर्व काँग्रेस नेत्यांनी मंत्रिमंडळातून सामुदायिक राजीनामे देण्याचे ठरवले.दीर्घ विचारविनिमयानंतर गांधीजींनी जाहीर केले की, भारत या युद्धाचा एक भाग बनणार नाही, कारण हे युद्ध वरवर तर लोकशाहीवादी स्वातंत्र्यासाठी म्हणून लढवले जात होते आणि दुसरीकडे तेच स्वातंत्र्य भारताला नाकारण्यात येत होते. जसेजसे युद्ध पुढे सरकत गेले तसेतसे गांधीजी स्वातंत्र्याची मागणी तीव्र करत गेले. त्यांनी एक ठराव मांडला ज्याद्वारे इंग्रजांना 'भारत सोडून जा' (भारत छोडो) असे ठणकावण्यात आले. हा गांधीजी आणि पक्षाचा ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्याचा सर्वांत स्पष्ट व अंतिम प्रयत्न होता.
पक्षातील आणि इतरही काही नेत्यांनी गांधीजींवर टीका केली. यात ब्रिटिशांचे समर्थन करणारे तसेच त्यांना विरोध करणारे दोन्ही गट सामील होते. काहींना वाटले की इंग्रजांच्या जीवनमरणाच्या अशा या युद्धात त्यांना विरोध करणे अनैतिक होय तर काहींचे मत होते की गांधीजी मिळालेल्या संधीचा पूर्ण उपयोग करून घेत नाही आहेत. भारत छोडो चळवळ भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील सर्वांत प्रभावी चळवळ ठरली. यात लाखांच्या संख्येने लोकांना अटका झाल्या, अभूतपूर्व अत्याचार करण्यात आला.हजारो आंदोलक पोलिसांच्या गोळीबारात मरण पावले.गांधीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे स्पष्ट केले की भारताला तात्काळ स्वातंत्र्य दिल्याशिवाय भारत महायुद्धात मदत करणार नाही. गांधीजींनी हेसुद्धा स्पष्ट केले की यावेळेस एखाद-दुसऱ्या हिंसक घटनेमुळे ही चळवळ मागे घेण्यात येणार नाही. आवरात ठेवलेल्या अराजकतेपेक्षा खरी अराजकता बरी. असे सुचवून त्यांनी काँग्रेस सदस्यांना अहिंसेचे पालन करण्याचे आवाहन केले आणि भारतीयांना 'करो या मरो' (करा किंवा मरा) हा मूलमंत्र दिला.
गांधीजी आणि काँग्रेसची पूर्ण कार्यकारणी समिती यांना इंग्रजांनी ९ ऑगस्ट इ.स. १९४२ला मुंबईमध्ये अटक केली. गांधीजींना दोन वर्षासाठी पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये बंदिवासात ठेवण्यात आले. तेथील वास्तव्यात गांधीजींना वैयक्तिक आयुष्यात दोन धक्के सहन करावे लागले. सहा दिवसांनंतरच त्याचे खाजगी सचिव महादेव देसाई वयाच्या ५०व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा १८ महिन्यांच्या बंदिवासानंतर २२ फेब्रुवारी इ.स. १९४४ला मरण पावल्या. ६ अठवड्यांनंतरच गांधीजींना तीव्र मलेरिया झाला. त्यांच्या ढासळत्या प्रकृतीमुळे आणि ऑपरेशनच्या आवश्यकतेमुळे त्यांना युद्ध संपण्याआधीच ६ मे इ.स. १९४४ला सोडण्यात आले. ते बंदिवासात मरण पावले तर संपूर्ण देश संतप्त होईल अशी भीती ब्रिटिश सरकारला वाटत होती. जरी भारत छोडो आंदोलनाला माफक यश मिळाले तरी करड्या जरबेने व कडक उपाययोजनांनी इंग्रजांनी इ.स. १९४३च्या अंतापर्यंत भारतातील आपले राज्य सुरळीत ठेवले होते. युद्धाच्या शेवटी इंग्रजांनी भारतीयांच्या हाती सत्ता देण्याचे स्पष्ट संकेत दिले. तेव्हा गांधीजींनी आंदोलन संपवले आणि जवळपास एक लाख राजकीय कैद्यांची सुटका करण्यात आली. त्यांमध्ये काँग्रेस नेत्यांचापण समावेश होता.
स्वातंत्र्य आणि भारताची फाळणी
इ.स. १९४६ मधील ब्रिटिश कॅबिनेट मिशनच्या शिफारशी नामंजूर करण्याची सूचना गांधीजींनी काँग्रेसला दिली. या शिफारशींमधील मुस्लिम बहुसंख्य राज्यांच्या एकत्रीकरणाबद्दल गांधीजी साशंक होते. त्यांच्या मते ही फाळणीची नांदी होती. पण जरी पक्ष गांधीजींचा सल्ला खचितच मानत असे, तरी यावेळी मात्र त्यांनी हा सल्ला मानला नाही. कारण पंडित नेहरू आणि पटेलांना माहित होते की जर ब्रिटिशांच्या शिफारशी मान्य नाही केल्या तर राज्य कारभाराचे नियंत्रण मुस्लिम लीग कडे जाईल. इ.स. १९४६ आणि इ.स. १९४८च्या दरम्यान ५,०००हून जास्त माणसे दंगलींमध्ये मारली गेली. जी भारताची फाळणी दोन राष्ट्रांत करेल अश्या प्रत्येक योजनेचा गांधीजींनी जोरदार विरोध केला. भारतातील बहुसंख्य मुस्लिम, जे हिंदू आणि शिखांच्या सोबत राहत होते, ते फाळणीला अनुकूल होते.[ संदर्भ हवा ] अजून म्हणजे, मुस्लिम लीगचे नेते, मोहम्मद अली जिना यांना, पश्चिम पंजाब, सिंध, उत्तर-पश्चिम फ्रॉंटियर प्रांत आणि पूर्व बंगालमध्ये बराच पाठिंबा होता. हिंदू-मुस्लिमांमधील अंतर्गत युद्ध टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणून काँग्रेसने फाळणीच्या आराखड्याला मान्यता दिली. काँग्रेस नेत्यांना माहित होते की गांधीजी फाळणीला तीव्र विरोध करतील आणि गांधीजींच्या पक्षातील आणि देशातील पाठिंब्यामुळे त्यांच्या अनुमतीशिवाय पुढे जाता येणार नाही. गांधीजींच्या निकटच्या सहकाऱ्यांनी फाळणीचा (त्या परिस्थितीतील) सर्वोत्तम पर्याय म्हणून स्वीकार केला होता. सरदार पटेलांनी गांधीजींना पटवून देण्याचा प्रयत्न केला की, फाळणी हा अंतर्गत युद्ध टाळण्यासाठी एकमेव पर्याय आहे. शेवटी उद्वेगाने गांधीजींनी आपली अनुमती दिली.
त्यांनी उत्तर भारतातील तसेच बंगालमधील प्रक्षुब्ध जमावाला शांत करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम समाजातील नेत्यांसोबत दीर्घ चर्चा केल्या. इ.स. १९४७च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवरदेखील, भारत सरकारचा फाळणी करारानुसार ठरलेले ५५ कोटी रूपये पाकिस्तानला न देण्याचा निर्णय त्यांना आवडला नाही. सरदार पटेलांसारख्या नेत्यांना वाटत होते की, या पैशांचा उपयोग पाकिस्तान युद्धासाठी भांडवल पुरवण्यासाठीच करेल. सर्व मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवून द्यावे या मागणीने परत जोर पकडला होता. तसेच हिंदू आणि मुस्लिम नेते एकमेकांना समजून घेण्यात असमर्थता दाखवीत होते.या सर्व कारणांनी गांधीजी अत्यंत व्यथित झाले होते. त्यांनी या दंगली बंद करण्याच्या आणि पाकिस्तानला ५५ कोटी देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण चालू केले. गांधीजींना भीती वाटत होती की, पाकिस्तानमधील अस्थिरतेमुळे आणि असुरक्षिततेमुळे तेथील लोकांचा भारताबद्दलचा राग वाढेल आणि या दंगली देशाच्या सीमा ओलांडून जातील, तसेच हिंदू आणि मुस्लिमांमधील शत्रुत्व परत डोके वर काढील आणि त्याची परिणिती अंतर्गत बंडात होईल. त्यांच्या आयुष्यभराच्या सहकाऱ्यासोबतच्या अनेक वादविवादांनंतरही गांधीजी आपल्या निर्णयावरून मागे हटले नाहीत आणि शेवटी सरकारने आपला निर्णय मागे घेतला आणि पाकिस्तानला ५५ कोटी रूपये दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय हिंदू महासभा यांचे नेते यांचे तसेच अन्य हिंदू नेते, मुस्लिम नेते व शीख नेते यांनी हा हिंसाचार थांबवण्याचे आणि लोकांकडून शांतता राखण्याची मागणी करण्याचे वचन दिले. यानंतर गांधीजींनी संत्र्याचा रस पिऊन आपले उपोषण सोडले.
मृत्यू
वर्ध्याच्या आश्रमात कुष्ठरोगाच्या जंतूंचे निरीक्षण करताना गांधी. १९४०
३० जानेवारी १९४८ ला, दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली. त्यांचा मारेकरू नथुराम गोडसे हा एक पुरोगामी हिंदू होता व त्याचे संबंध जहालमतवादी हिंदू महासभेशी होते. नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या करण्यासाठी बरेटा मॉडेलचे पिस्तूल वापरले होते.त्याच्या मते पाकिस्तानला पैसे देऊन भारताला दुबळे पाडण्यासाठी गांधीजी जबाबदार होते.गोडसे आणि त्याचा सहकारी नारायण आपटे यांच्यावर खटला दाखल करून त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यांना १५ नोव्हेंबर १९४९ला फाशी देण्यात आली. गांधीजींच्या राजघाट येथील समाधीवर ’हे राम’ असे लिहिले आहे. हे त्यांचे शेवटचे शब्द होते असे अनेक जण मानतात, पण त्याची सत्यासत्यता वादग्रस्त आहे.गांधीजींच्या मृत्यूनंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी रेडियोवरून देशाला संबोधित केले:
"माझ्या मित्र आणि सहकाऱ्यांनो, आपल्या आयुष्यातून प्रकाश निघून गेला आहे आणि सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे आणि मला कळत नाही आहे तुम्हाला काय आणि कसे सांगावे. आपले आवडते नेते-राष्ट्रपिता, ज्यांना आपण प्रेमाने ’बापू’ म्हणत असू, आता आपल्यामध्ये नाही आहेत. कदाचित तसे म्हणणे चूकच ठरेल, पण आपण त्यांना आता बघू शकणार नाहीत, जसे आपण त्यांना इतके वर्ष बघत आलो आहोत. (संकटांमध्ये) त्यांचा सल्ला घ्यायला आपण आता धावत जाऊ शकणार नाही. त्यांच्या सानिध्यातील शांती आणि समाधान आपल्याला मिळणार नाही. हा एक प्रचंड धक्का आहे, केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर या देशातील कोट्यवधी लोकांसाठीसुद्धा."
गांधीजींच्या अस्थी रक्षापात्रांमध्ये भरून देशभरात त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाठविण्यात आल्या. जवळपास सर्व अस्थींचे विसर्जन १२ फेब्रुवारी १९४८ला अलाहाबाद येथील संगमावर करण्यात आले. पण काही अस्थी लपवण्यात आल्या होत्या. १९९७ मध्ये तुषार गांधी यांनी एका रक्षापात्राचे विसर्जन केले. हे रक्षापात्र एका बँकेमधील लॉकरमध्ये सापडले होते आणि न्यायालयात खटला दाखल करून हस्तगत करण्यात आले होते. ३० जानेवारीला त्यांच्या परिवाराने अजून एका रक्षापात्राचे विसर्जन मुंबईत गिरगाव चौपाटीवर केले. हे पात्र एका दुबईमधील व्यापाऱ्याने मुंबईमधील एका वस्तुसंग्रहालयाला पाठविले होते. अजून एक रक्षापात्र पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये आहे (जिथे गांधीजी १९४२ आणि १९४४ च्या दरम्यान बंदिवासात होते) आणि दुसरे एक पात्र लॉस एंजेलस येथील सेल्फ रिअलायझेशन लेक श्राइन येथे आहे. त्यांच्या परिवाराला जाणीव आहे की तेथील अस्थी राजकीय फायद्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. पण ते पात्र तिथून काढून घेतल्यास तो मठ बंद पडेल या भीतीने गांधीजींचे वंशज ते रक्षापात्र तिथून काढून घेऊ इच्छित नाहीत.
तत्त्वे
गांधीजीनी एकादश (अकरा) व्रतांचा स्वीकार केला होता. ती पुढीलप्रमाणे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, अपरिग्रह, शरीरश्रम, आस्वाद, सर्वत्र भयवर्जन (निर्भयता), सर्वधर्म सामान्ताव्य (सर्वधर्म समभाव), स्वदेशी, स्पर्शभावना (अस्पृश्यतेचा त्याग). निर्भयता या तत्त्वाला गांधीजी आधारभूत मानत. त्यांच्यामते निर्भयतेमुळेच इतर तत्त्वांचे पालन करता येऊ शकते.
महात्मा गांधींच्या अहिंसक आंदोलनाने प्रभावित होऊन "असा हाडामासाचा माणूस या भूतलावर होऊन गेला यावर पुढच्या पिढ्यांचा विश्वास बसणार नाही", असले गौरवोद्गार प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी काढले होते.
सत्य
गांधीजींनी आपले आयुष्य सत्याच्या शोधासाठी अर्पण केले होते. त्यांचे आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग या नावाखाली प्रसिद्ध आहे. गांधीजींनी म्हटले आहे की, सर्वांत महत्त्वाची लढाई ही स्वतःच्या वाईट प्रवृत्ती, भय आणि असुरक्षितता यांच्यावर मात करणे ही होय. "परमेश्वर सत्य आहे." असे त्यांचे मत होते. पुढे त्यांनी ते, "सत्य (हेच) परमेश्वर आहे." असे बदलले.
अहिंसा
जरी अहिंसेचे तत्त्व गांधीजींनी स्वतः मांडले नसले तरी इतक्या मोठ्या राजकीय स्तरावर अहिंसेचा अवलंब करणारे ते पहिले व्यक्ती होते.हिंदू, बौद्ध, जैन, ज्यू धर्मात अनेक ठिकाणी अहिंसेच्या तत्त्वाचा उल्लेख आहे. "माझे सत्याचे प्रयोग" मध्ये गांधीजींनी त्यांचे अहिंसेचे तत्त्वज्ञान मांडले आहे. ते म्हणतात,
"जेव्हा मी निराश होतो,तेव्हा मी स्मरण करतो की, इतिहासात प्रत्येक वेळी सत्य आणि प्रेमाचाच विजय होत आला आहे. (इतिहासात) अनेक क्रूरकर्मे होऊन गेले आणि काही काळासाठी ते अजिंक्य पण वाटले, पण नेहमी शेवटी त्यांचा पराभवच झाला आहे-विचार करा, नेहमीच."
"विध्वंस हा सर्वंकषतावादाच्या नावाखाली केला गेला की, स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या नावाखाली-(त्यातील) मृतांसाठी, अनाथांसाठी आणि गृहहीनांसाठी काय फरक असणार?"
"डोळ्यासाठी डोळा सर्व जगाला आंधळे करून सोडेल."
"अशी अनेक ध्येये आहेत ज्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे. पण असे एकही ध्येय नाही ज्यासाठी मी कुणाचा जीव घेईन."
पण गांधीजींना माहीत होते की, अहिंसेचे या पातळीपर्यंत पालन करण्यासाठी प्रचंड श्रद्धा आणि धैर्य आवश्यक आहे, आणि प्रत्येकाजवळच ते असणे शक्य नाही. त्यामुळे ते सल्ला देत की जर अहिंसा भित्रेपणाला झाकण्यासाठी वापरण्यात येत असेल तर प्रत्येकाने अहिंसेचे पालन करणे आवश्यक नाही.
स्वदेशी
शाकाहार
लहानपणी अनेकदा गांधीजींनी मांस भक्षण केले होते. ते मुख्यत्वेकरून त्यांच्या कुतुहलामुळे तसेच त्यांचा मित्र शेख मेहताब याच्या सांगण्यावरून होते. शाकाहाराची कल्पना हिंदू तसेच जैन प्रथांमध्ये खोलवर रुजली आहे. तसेच गांधीजींची जन्मभूमी गुजरातमध्ये बहुतांश हिंदू आणि सर्व जैन शाकाहारी होते आणि गांधीजींचे कुटुंबही याला अपवाद नव्हते. लंडनला शिकायला जाण्याआधी गांधीजींनी त्यांची आई पुतळीबाई आणि काका बेचारजी स्वामी यांना वचन दिले होते की ते मांस, बाई व बाटली (दारू) यांच्यापासून दूर राहतील. पुढे गांधीजी कडक शाकाहारी बनले. त्यांनी "मोराल बेसिस ऑफ व्हेजिटेरिअनिझम" (Moral Basis of Vegetarianism) हे पुस्तक लिहिले आहे तसेच शाकाहारावर अनेक लेखसुद्धा लिहिले आहेत. त्यातील काही लेख लंडन व्हेजिटेरिअन सोसायटीच्या "द व्हेजिटेरिअन" या प्रकाशनातून प्रसिद्ध झाले आहेत.
लेखन
महात्मा गांधींनी विपुल लेखन केले आहे. अनेक दशके त्यांनी बऱ्याच वर्तमानपत्रांचे संपादन केले. यामध्ये गुजराती, हिंदी आणि इंग्रजीमधील हरिजन, दक्षिण आफ्रिकेमध्ये असतांना इंडियन ओपिनियन आणि भारतात परत आल्यावर इंग्रजीमधील यंग इंडिया, गुजराती मासिक नवजीवन यांचा समावेश आहे. नंतर नवजीवन हिंदीमधून पण प्रकाशित केले गेले. या बरोबरच, ते जवळपास प्रत्येक दिवशी अनेक वर्तमानपत्रांना आणि व्यक्तींना पत्रे लिहीत असत.
गांधींनी काही पुस्तके सुद्धा लिहिली आहेत. त्यांचे आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग या नावाखाली प्रकाशित झाले आहे. त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील संघर्षावर त्यांनी "सत्याग्रहा इन साऊथ आफ्रिका" (दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह) हे पुस्तक लिहिले आहे. तसेच त्यांनी "हिंद स्वराज" किंवा "इंडियन होम" ही राजकीय पुस्तिका लिहिली आहे आणि जॉन रस्किनच्या "Unto This Last"चे गुजराती भाषांतर केले आहे. हा शेवटचा लेख त्यांच्या अर्थशास्त्रावरील विचारसरणीचे वर्णन करतो. त्यांनी शाकाहार, आहार आणि स्वास्थ्य, धर्म, सामाजिक परिवर्तन इत्यादी विषयांवरसुद्धा विपुल लेखन केले आहे. ते सामान्यतः गुजराथीमध्ये लिखाण करत, पण त्यांच्या पुस्तकांच्या हिंदी आणि इंग्रजी भाषांतरांचे परीक्षणसुद्धा ते करत असत.
गांधींचे पूर्ण लेखन भारत सरकारने "संकलित महात्मा गांधी" (The Collected Works of Mahatma Gandhi) या नावाखाली १९६० च्या दशकात प्रकाशित केले आहे. यामध्ये जवळपास १०० खंड व त्यांची ५०,००० पृष्ठसंख्या आहेत. इ.स. २००० मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधित आवृत्तीवरून अनेक वाद झाले होते. सरकारने राजकीय फायद्यासाठी त्यात बदल केले आहेत असा आरोप गांधींच्या अनुयायांनी केला होता.
गांधींनी लिहिलेली पुस्तके
Indian Home Rule (हिंद स्वराज्य)
गांधीजींची संक्षिप्त आत्मकथा
गांधीजीचे जीवन त्यांच्याच शब्दांत
गांधी विचार दर्शन : अहिंसाविचार
गांधी विचार दर्शन : राजकारण
गांधी विचार दर्षन : सत्याग्रह प्रयोग
गांधी विचार दर्शन : सत्याग्रह विचार
गांधी विचार दर्शन : सत्याग्रहाची जन्मकथा
गांधी विचार दर्शन : हरिजन
नैतिक धर्म
भगवद्गीता : गांधीजींच्या चिंतनातून (महात्मा गांधी यांनी जनसामान्यांसाठी भगवद्गीतेचे केलेले नेमके विवेचन; मराठी अनुवाद : भगवान दातार)
माझ्या स्वप्नांचा भारत
गांधींवरील पुस्तके
महात्मा गांधींवर अनेक लेखकांनी पुस्तके लिहिली आहेत. एका अहवालानुसार गांधींवर एक लक्ष पेक्षा अधिक पुस्तक देशी-विदेशी भाषांमध्ये लिहिली गेली आहेत.
अखंड प्रेरणा गांधीविचारांची (डॉ. रघुनाथ माशेलकर)
असा झाला पुणे करार (प्रभाकर ओव्हाळ; प्राजक्त प्रकाशन)
अस्त गांधीयुगाचा आणि नंतर (अनंत ओगले)
अज्ञात गांधी नावाचे पुस्तक नारायणभाई देसाई यांनी लिहिले आहे. सुरेशचंद्र वारघडे यांनी त्याचे मराठीत भाषांतर केले आहे.
आपले बापू (माया बदनोरे)
गंगेमध्ये गगन वितळले (अंबरीश मिश्र)
Gandhi-An Illustrated Biography (प्रमोद कपूर)
गांधी आणि अली बंधू : एका मैत्रीचे चरित्र (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - राखहरी चॅटर्जी; मराठी अनुवादक - ?)
गांधी आणि आंबेडकर (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - एलिनाॅर झेलियट; मराठी अनुवाद - ?)
गांधी आणि आंबेडकर (गं.बा. सरदार)
गांधी : गीता (प्रा. डाॅ. विश्वास पाटील)
गांधीजी आणि त्यांचे टीकाकार (सुरेश द्वादशीवार, आधी भाषणमाला, मग लेखमाला (दोन्ही १५ ऑगस्ट २०१७ ते २४ फेब्रुवारी २०१८) आणि नंतर पुस्तक (२८ फेब्रुवारी २०१८)
गांधी उद्यासाठी (५० लेखांचा संग्रह, संपादक दिलीप कुलकर्णी)
गांधी - जसे पाहिले जाणिले विनोबांनी (विनोबा भावे)
गांधीजींचे असामान्य नेतृत्व
गांधीजींचे जीवन त्यांच्याच शब्दांत
गांधीजींच्या आठवणी (शांतिकुमार मोरारजी, स्वामी आनंद; मराठी अनुवाद - अंबरीश मिश्र)
गांधीजी होते म्हणून (बाळ पोतदार)
गांधींनंतरचा भारत (मूळ इंग्रजी लेखक रामचंद्र गुहा, मराठी अनुवाद शारदा साठे)
गांधी नावाचे महात्मा (अनेक विद्वानांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह-संपादक रॉय किणीकर)
गांधी पर्व (दोन खंड, गोविंद तळवलकर)
गांधी : प्रथम त्यांस पाहता (मूळ थॉमस वेबर, मराठी अनुवाद सुजाता गोडबोले)
गांधी भारतात येण्यापूर्वी (अनुवादित, मूळ लेखक - रामचंद्र गुहा; अनुवादक - शारदा साठे)
गांधी-विचार (ठाकुरदास बंग)
गांधी, विनोबा आणि जयप्रकाश (मिलिंद बोकील)
चले जाव आंदोलन (बा.बा. राजेघोरपडे)
डी. जी. तेंडुलकर यांचे आठ खंडी "महात्मा : लाईफ ऑफ मोहनदास करमचंद गांधी"
द डेथ ॲन्ड आफ्टरलाईफ ऑफ महात्मा गांधी (इंग्रजी पुस्तक, २०१५; लेखक : मकरंद आर. परांजपे)
दुसरे प्रॉमिथियस : महात्मा गांधी (वि.स. खांडेकर)
बहुरूप गांधी (मूळ अनू बंदोपाध्याय, मराठी अनुवाद - शोभा भागवत)
बापू-माझी आई (मूळ मनुबहेन गांधी, मराठी अनुवाद - ना.गो. जोशी)
बापूंच्या सहवासात (संपादक - अरुण शेवते)
मराठीमध्ये पु.ल. देशपांडे आणि अवंतिकाबाई गोखले यांनी गांधीजींचे चरित्र लिहिले आहे.
प्यारेलाल आणि सुशीला नायर यांचे दहा खंडी "महात्मा गांधी". (उल्लेखनीय)
महात्मा आणि मुसलमान (यशवंत गोपाळ भावे)
महात्मा गांधी आणि आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय" (नामदेव कांबळे)
महात्मा गांधी आणि त्यांचा भारतीय संघर्ष (अनुवादित, मूळ इंग्रजी Great Soul Mahatma Gandhi and His Struggle with India, लेखक - जोसेफ लेलिव्हेल्ड , मराठी अनुवाद - मुक्ता देशपांडे)
महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना (नरेंद्र चपळगावकर)
महात्मा गांधींची विचारसृष्टी (लेखक - यशवंत सुमंत)
महात्मा गांधी : जीवन आणि कार्य (अनुवादित, मूळ इंग्रजी The Life of Mahatma Gandhi, लेखक - लुई फिशर; मराठी अनुवादक : वि.रा. जोगळेकर). हेच पुस्तक वाचून रिचर्ड ॲटनबरो याने 'गांधी' सिनेमा बनवला..
"मोहनदास" (राजमोहन गांधी (इंग्लिश पुस्तक); मराठी अनुवाद: मुक्ता शिरीष देशपांडे)
लेट्स किल गांधी (मूळ तुषार गांधी, अनुवाद अजित ठाकुर)
विधायक कार्यक्रम
शोध गांधींचा (चंद्रशेखर धर्माधिकारी)
सत्याग्रही समाजवाद व व मार्क्सवादाचा समन्वय : आचार्य शं. द. जावडेकरकृत मीमांसा (प्राचार्य डॉ. शिरीष पवार)
सूर्यासमोर काजवा : गांधीहत्येचा इतिहास (चुनीभाई वैद्य)
चित्रपट व नाटके
ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक सर रिचर्ड ॲटनबरो यांनी गांधीजींच्या आयुष्यावर इंग्रजी चित्रपटाची निर्मिती केली. यात महात्मा गांधींची भूमिका बेन किंग्जले या ब्रिटिश अभिनेत्याने केली. हा चित्रपट इ.स. १९८१ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने ८ ऑस्कर पुरस्कार जिंकून त्या वेळेस विक्रम स्थापला होता. या चित्रपटाचे हिंदीसह जगातील सर्वच मुख्य भाषेत भाषांतर झाले असून बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगले यश मिळवले.
इ.स. २००६ मध्ये बॉलिवुडमध्ये विधू विनोद चोप्रा यांनी लगे रहो मुन्नाभाई या विनोदी चित्रपटाची निर्मिती केली. यात एक गुंड प्रवृतीचा नायक एका मुलीला प्रभावित करण्यासाठी आपण गांधीजींचे मोठे अनुयायी आहोत हे दाखवतो व त्यासाठी तो गांधींजींच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतो. त्यानंतर त्याला नेहेमी गांधीजी जवळ असल्याचे व त्याला चांगल्या मार्गावर नेण्यासाठी मार्गदर्शन करत असल्याचे भास होत राहतात. या चित्रपटात गांधीजींच्या अहिंसा व सत्याग्रह या तत्त्वांचा आजच्या काळातही वापर करता येतो हे दर्शविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.या चित्रपटात गांधींची भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी केली होती..
ॲन्ड गांधी गोज मिसिंग (मराठी लघुपट), दिग्दर्शक : देवेंद्र जाधव. सर्व भारतीय भाषांत अनुवाद
गांधी आडवा येतो (मराठी नाटक), लेखक : शफाअतखान
गांधी आणि आंबेडकर (मराठी नाटक), लेखक : प्रेमानंद गज्वी, या नाटकाचे कानडीतही प्रयोग झाले आहेत.
द गांधी मर्डर (हिंदी चित्रपट, २०१९)
गांधी : माय फादर (हिरालाल गांधींवरील हिंदी चित्रपट) - २००७, निरमाता अनिल कपूर. . या चित्रपटातील गांधींचीची भूमिका दर्शन जरीवाला याने केली होती. या पुस्तकाला २००७ सालचा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला.
गांधी व्हर्सेस गांधी (मराठी नाटक), लेखक : अजित दळवी, या नाटकाचा डी.एस. चौधरी यांनी कानडी भाषेत अनुवाद केला आहे.
गोडसे गांधी.कॉम (हिंदी नाटक) लेखक : असगर वजाहत
नाईन अवर्स टु रामा (हिंदी चित्रपट, १९६३)
मी नथूराम गोडसे बोलतोय (मराठी नाटक), लेखक : प्रदीप दळवी
द मेकिंग ऑफ महात्मा (श्याम बेनेगल दिग्दर्शित हिंदी चित्रपट) - १९९६ (गांधीच्या भूमिकेत - रजित कपूर)
मोहन से महात्मा (हिंदी नाटक, डॉ.सुनील केशव देवधर, पुणे) : या नाटकाला विष्णूदास भावे पुरस्कार मिळाला आहे.
‘मोहनसे महात्मा’ या विषयावर गौरी कुलकर्णी नृत्याविष्कार करतात.
युगपुरुष (महात्मा गांधींचे आध्यात्मिक गुरू (जैन तत्त्ववेत्ते श्रीमद् रामचंद्रजीं)वरील मूळ गुजराथी नाटक. लेखक - उत्तम गाडा. नाटकाचे गुजराथी, मराठी, हिंदी आणि कन्नड या भाषांत प्रयोग होत असतात. (एप्रिल २०१७)
सरदार (गांधींच्या भूमिकेत अन्नू कपूर) (चित्रपट इंगजीत डब झाला आहे.)
सेलेब्रेटिंग दि महात्मा (हिंदी लघुपट, निर्माता राजकुमार हिरानी; कलावंत - आमिर खान, आलिया भट्ट, कंगना राणावत, रणबीर कपूर, विकी कौशल, शाहरूख खान, सलमान खान, सोनम कपूर आहुजा.)
हे राम (हिंदी चित्रपट, दिग्दर्शक - कमल हसन) (गांधींच्या भूमिकेत नसीरुद्दीन शाह)
गांधींच्या विचारांवर आधरित हिंदी चित्रपट
अछूतकन्या
चंडीदास : चित्रपटाची सुरुवात अशी आहे - एक ब्राह्मण आणि एक धोबीण एका नदीच्या घाटावर कपडे धुवायला आली आहेत. दोघांची प्रतिबिंबे पाण्यात पडली आहेत. एक लाट येते, दोन्ही प्रतिमा एकमेकांत मिसळून जातात, आणि एका प्रेमकथेची सुरुवात होते. दिग्दर्शक - देवकी बोस
दो ऑंखे बारा हाथ : दिग्दर्शक, निर्माता - व्ही. शांताराम
महात्मा विदूर : या चित्रपटात विदुराला चष्मा आहे आणि त्याच्या हातात काठी आहे. चित्रपटाचे निर्माते द्वारकादास संपत.
सुजाता : दिग्दर्शक - बिमल राॅय
पुरस्कार व सन्मान
इ.स. १९३० मध्ये टाइम मासिकाने गांधी यांना ‘द मॅन ऑफ दी इयर’ म्हणून संबोधित केले.[ संदर्भ हवा ]
नागपूर विद्यापीठाने त्यांना एलएल.डी. ही पदवी इ.स. १९३७ मध्ये दिली.
No comments:
Post a Comment