रोजगार व बेरोजगारी बद्दल संपूर्ण माहिती
आपल्या जीवनात व्यक्ति म्हणून समाजाचे सदस्य म्हणून कामाची/रोजगाराची महत्वाची भूमिका असते. हे पुढील मुद्यांवरून स्पष्ट होईल.
लोक स्वत:च्या तसेच आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी काम करतात.
रोजगारामुळे स्वमुल्याची आणि आत्मसन्मानची भावना निर्माण होते.
प्रत्येक कार्यरत व्यक्ति राष्ट्रीय उत्पन्नात तसेच देशाच्या विकासात भर घालत असतो.
मूलभूत संकल्पना :
कामगार म्हणजे काय?
उच्च किंवा निम्न अशा कोणत्याही स्तरावरील आर्थिक क्रियांमध्ये गुंतलेल्या व त्याव्दारे राष्ट्रीय उत्पादात भर घालण्यार्या सर्व व्यक्तींना कामगार (worker) असे म्हणतात.
आजार, इजा, प्रतिकूल हवामान, सण, सामाजिक किंवा धार्मिक समारंभ अशा कोणत्याही कारणांमुळे कामाहून तात्पुरता गैरहजर राहणारा व्यक्तीसुद्धा कामगारच असतो.
मुख्य कामगारांना मदत करणारे व्यक्तींचा सुद्धा समावेश कामगारांमध्ये होतो.
कामगारांमध्ये स्वयं-रोजगारी तसेच नोकरी करून पगार मिळविण्याचा समावेश होतो.
कामगारांचे वर्गीकरण :
कामगारांचे त्यांच्या रोजगाराच्या स्तरावरून तीन गट केले जातात.
नियमित पगारदार/मजुरी कामगार (Regular Salaried/Wage Employees) –
हे इतरांच्या कृषि किंवा गैर-कृषि उपक्रमांमध्ये (घरगुती तसेच गैर-घरगुती) काम करतात आणि त्या बदल्यात नियमित आधारावर पगार किंवा मजुरी मिळवितात.
त्यामध्ये काल मजुरीबरोबरच (time wage) अंश मजुरी (piece wage) मिळविणार्या चाही समावेश होतो.
किरकोळ मजुरी कामगार (Casual Wage Labour) –
हे कामगार इतरांच्या कृषि किंवा गैर-कृषि उपक्रमांमध्ये (घरगुती तसेच गैर-घरगुती) काम करतात आणि त्या बदल्यात मालकाशी करारानुसार दैनिक किंवा ठराविक कलावधिनुसार मजुरी मिळवितात.
स्वंय-रोजगारी (Self-Employed) –
हे व्यक्ती स्वत:चे कृषि किंवा गैर-कृषि उपक्रम चालवितात किंवा ते स्वतंत्र व्यवसाय किंवा व्यापारात एकटे किंवा भागीदारांसहीत गुंतलेले असतात.
त्यांचे अजून तीन गट केले जातात.
स्वयं – लेखा कामगार (Own-account Workers) –
भाडोत्री कामगारांविना आपला उपक्रम/व्यवसाय चालविणारे
रोजगार देणारे (Employers) –
भाडोत्री कामगारांच्या सहाय्याने आपला उपक्रम/व्यवसाय चालविणारे
मदतनीस (Helpers) –
स्वत:च्या घरगुती उपक्रमांमध्ये पूर्ण किंवा अंशकालीन काम करणारे असे व्यक्ती ज्यांना कोणताही नियमित मोबदला मिळत नाही.
काही व्याख्या :
श्रम शक्ती (Labour Force) –
श्रम शक्तिमध्ये काम करण्यार्या किंवा काम शोधत असलेल्या किंवा कामासाठी उपलब्ध आलेल्या सर्व व्यक्तींचा समावेश होतो.
श्रम शक्ती सहभाग दर (Labour Force Participation Rate) –
देशाच्या एकूण लोकसंख्येत श्रम शक्तीचे प्रमाण.
कार्य शक्ती (Work Force) –
श्रम शक्तीपैकी प्रत्यक्ष रोजगारात गुंतलेल्या व्यक्तींची संख्या.
कार्य सहभाग दर (Work Participation Rate) –
श्रम शक्तीपैकी प्रत्यक्ष रोजगारात गुंतलेल्या व्यक्तींचे प्रमाण.
बेरोजगारी दर (Unemployment Rate) –
श्रम शक्तीपैकी रोजगार प्राप्त नसलेल्या व्यक्तींचे प्रमाण.
संघटित व असंघटित क्षेत्र :
कार्य शक्तीचे विभाजन दोन गटात केले जाते: संघटित क्षेत्रातील कामगार व असंघटित क्षेत्रातील कामगार.
संघटित क्षेत्रातील कामगारांचे कामगार कायद्यांव्दारे संरक्षण केले जाते.
हे कामगार आपल्या ट्रेड युनियन स्थापना करून मालकांशी चांगली मजुरी व सामाजिक सुरक्षेच्या उपायांसाठी (पेन्शन, प्रोव्हिडन्ड फंड, ग्रॅच्युईटी, मातृत्व लाभ इ.) वाटाघाटी करू शकतात.
सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उधोगांमध्ये/उपक्रमांमध्ये काम करणार्यार व्यक्तींचा तसेच 10 किंवा अधिक कामगरांना रोजगार देणार्यार खाजगी क्षेत्रातील उधोगांमध्ये/उपक्रमांमध्ये काम करणार्या व्यक्तींचा समावेश संघटित क्षेत्रामध्ये होतो.
उर्वरित उधोगांमधील/उपक्रमांमधील कामगारांचा समावेश असंघटित क्षेत्रामध्ये होतो. त्यांना वरील प्रमाणे लाभ उपलब्ध होत नाही.
त्यांमध्ये हजारो शेतकरी, शेतमजुर, छोटया उपक्रमांचे मालक, भाडोत्री कामगार नसलेले स्वयं-रोजगारी व्यक्ती इत्यंदींचा समावेश होतो.
बेरोजगारी (Unemployment) :
अर्थ: रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल.
रोजगार मिळविण्यासाठी उत्सुक असलेली ही व्यक्ती त्यासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या समर्थ असावी, तिची काम करण्याची इच्छा असावी, तसेच समाजातील प्रचलित वेतन दरावर काम करण्याची तिची इच्छा असावी.
या तिन्ही अटी पूर्ण करण्यात व रोजगार मिळविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केल्यानंतरही रोजगार न मिळालेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल.
बेरोजगारीचे प्रकार :
खुली बेरोजगारी (Open Unemployment) –
काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही नियमित उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त होत नसेल तर त्याला खुली बेरोजगारी असे म्हणतात.
उदा. ग्रामीण भागातील स्वत:च्या मालकीची शेत जमीन नसलेले अकुशल व अर्धकुशल कामगार, रोजगारासाठी ग्रामीण भागातून शहरी भागात आलेले बेरोजगार इ.
हंगामी बेरोजगारी (Seasonal Unemployment) –
शेतीची नांगरणीपासून कापणीपर्यंतचा कालावधी सोडून वर्षाच्या इतर काळात भासणारी बेरोजगारी.
अशा प्रकारची बेरोजगारी वुलन कापडाचे कारखाने, आईसक्रिमचे कारखाने इत्यादींमध्येही निर्माण होऊ शकते.
अदृश्य/ प्रच्छन्न बेरोजगारी (Disguised Unemployment) –
आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून एखादे काम जेवढे व्यक्ती करू शकतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या कामात गुंतलेले असल्यास ते जास्तीचे व्यक्ती अदृश्यपणे/प्रच्छन्नपणे बेरोजगार आहेत असे म्हटले जाते.
उदा. शेतीचे एक क्षेत्र जर एक व्यक्ती आपल्या क्षमतेचा वापर करून पिकवू शकतो तर त्याऐवजी 4-5 लोक तेथे काम करीत असल्यास ते प्रच्छन्नपणे बेरोजगार असतात.
सकृतदर्शनी या व्यक्तींचे काम उत्पादक स्वरूपाचे मुळीच नसते.
म्हणजेच त्यांची सीमान्त उत्पादकता (Marginal Productivity) शून्य किंवा नाममात्र असते.
कारण अशा व्यक्तींना व्यासायातून बाजूला सारले तरी त्यामुळे उत्पादनाच्या पातळीवर मुळीच विपरीत परिणाम होत नाही.
कमी प्रतीची बेरोजगारी (Underemployment) –
ज्यावेळी एखाधा व्यक्तीला आपल्या क्षमतेपेक्षा/कार्यक्षमतेपेक्षा/शिक्षणाच्या दर्जापेक्षा कमी प्रतीच्या रोजगारावर समाधान मानावे लागते त्यावेळी तिला कमी प्रतीची बेरोजगारी असे म्हणतात.
उदा. एखाधा इंजिनिअरला क्लार्कची नोकरी करावी लागणे.
सुशिक्षित बेरोजगारी (Educated Unemployment) –
जेव्हा सुशिक्षित लोक कमी प्रतीच्या किंवा खुल्या बेरोजगारीला बळी पडतात तेव्हा त्याला सुशिक्षित बेरोजगारी असे म्हणतात.
चक्रीय बेरोजगारी (Cyclic Unemployment) –
विकसित भांडवलशाही देशांमधील व्यापारी चक्राच्या मंदीच्या परिस्थितीत जी बेरोजगारी दिसून येते तिला चक्रीय बेरोजगारी असे म्हणतात.
घर्षणात्मक बेरोजगारी (Frictional Unemployment) –
विकसित देशांना जेव्हा नवीन उधोग जुन्या उधोगांना आपल्या व्यवसायातून बाहेर पडण्यास भाग पडतात व कामगार अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतीक्षेत असतात तेव्हा ही बेरोजगारी निर्माण होते.
असा तात्पुरता कालावधी जेव्हा कामगार ऐच्छिकरित्या बेरोजगार असतो तेव्हा त्या परिस्थितीला घर्षणात्मक बेरोजगारी असे म्हणतात. (येथे घर्षण जुन्या व नव्या उधोगांमध्ये निर्माण झालेले असतात.)
संरचनात्मक बेरोजगारी (Structural unemployment) –
विकसनशील देशांमध्ये उत्पादनक्षमता (Productive capacity) कमी असते.
उत्पादन क्षमतेच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्हणजे संरचनात्मक बेरोजगारी होय.
भारतात रोजगार व बेरोजगारीचे मोजमाप (Employment and Unemployment Measurement in India) :
भारतात बेरोजगारीविषयक आकड्यांचे तीन प्रमुख स्त्रोत आहेत.
दशवार्षिक जनगणनेचे अहवाल,
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेचे (NSSO) रोजगार व बेरोजगाराबाबतचे अहवाल, आणि
रोजगार व प्रशिक्षण सरसंचालनालय (DGET) यांकडील एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजकडे झालेल्या नोंदणीची आकडेवारी.
यांपैकी NSSO चे अहवाल सर्वात महत्वाचे मानले जातात.
NSSO मार्फत 1972-73 पासून (आपल्या 27 व्या फेरीपासून भारतातील रोजगार व बेरोजगाराच्या परिस्थितीबाबतची राष्ट्रास्तरीय आकडेवारी जमा करण्यासाठी पंचवार्षिक सर्वेक्षणे (quinquennial surveys) केली जातात.
NSSO सध्या रोजगार व बेरोजगारीचे आकडे जमा करण्यासाठी तीन प्रमुख पद्धतींचा वापर करते: नित्य प्रमुख व दुय्यम दर्जा (UPSS), चालू साप्ताहिक दर्जा (CWS) आणि चालू दैनिक दर्जा (CDS).
नित्य प्रमुख व दुय्यम दर्जा (Usual Principal and Sub-sidiary Status: UPSS) –
यामध्ये व्यक्तीच्या गेल्या 365 दिवसांमधील प्रमुख आर्थिक कार्यकृतीचा, आणि 30 दिवसांमधील अधिक कलावधीसाठी केलेल्या दुय्यम आर्थिक कृतीचा समावेश होतो.
चालू साप्ताहिक दर्जा (Current Weekly Status: CWS) –
यामध्ये व्यक्तीच्या गेल्या 7 दिवसांतील आर्थिक कृतींचा समावेश होतो.
या आधारावर गेल्या 7 दिवसांत कोणत्याही एका दिवसात किमान एक तास काम करणार्यायला रोजगारी समजले जाते.
चालू दैनिक दर्जा (Current Daily Status : CDS) –
यामध्येही व्यक्तीच्या गेल्या 7 दिवसांतील आर्थिक कृतींचा समावेश होतो.
या आधारावर रोजगारी समजण्यासाठी त्याने संदर्भ आठवडयात दररोज किमान 4 तास काम करणे आवश्यक असते.
No comments:
Post a Comment