Wednesday, 27 April 2022

हरितगृह परिणाम

हरितगृह परिणाम

>वातावरणविज्ञान>हरितगृह परिणाम
हरित गृह परिणाम : हवेतील पाण्याची वाफ, कार्बन डाय–ऑक्साइड वायू , मिथेन व इतर विशिष्ट वायू यांमुळे भूपृष्ठ व तपांबर (वातावरणाचा सर्वांत खालचा स्तर) यांचे तापन (तापमानात वाढ) होण्याला हरितगृह परिणाम म्हणतात, तर या वायूंना हरितगृह वायू म्हणतात. यांपैकी पाण्याच्या वाफेचा परिणाम हरितगृह परिणामावर सर्वाधिक होतो.

सूऱ्यापासून येणारा बहुतेक सर्व दृश्य प्रकाश वातावरणातून भूपृष्ठावर पडतो. सूर्यप्रकाशाने भूपृष्ठ तापते आणि यांपैकी काही ऊर्जा भूपृष्ठ म अवरक्त प्रारणा च्या रूपात परत अवकाशात प्रारित करते. हे प्रारण शोषण्याची प्रवृत्ती वातावरणातील हरितगृह वायूंत असते. यामुळे वातावरणाचे तापमान वाढते पऱ्यायाने तापलेले वातावरण अवरक्त प्रारण परत भूपृष्ठाकडे प्रारित करते. [पादपगृहाला हरितगृह म्हणजे ग्रीन हाउस हे नाव असले, तरी पादपगृहातील तापनक्रिया ही हरितगृह परिणामापेक्षा वेगळी असते. पादपगृहात काचेतून किंवा प्लॅस्टिकाच्या पातळ पटलातून दृश्य प्रकाश आत जातो व तापलेली हवा पादपगृहात बंदिस्त झाल्याने तापमानात वाढ होते → पादपगृह].

हरितगृह परिणामाद्वारे तापण्याची क्रिया नसती, तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान सु.-१८° से. एवढे राहिले असते. शुक्राभोवतीच्या वातावरणात कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण खूप जास्त असल्याने तेथील हरितगृह परिणाम अगदी तीव्र स्वरूपाचे असून परिणामी तेथील पृष्ठभागाचे तापमान ४५०ॅ से. एवढे उच्च आहे.

हरितगृह परिणाम हा नैसर्गिक रीतीने घडणारा आविष्कार आहे. तथापि, मानवी व्यवहारांमुळे वातावरणात हरितगृह वायूंचे उत्सर्जन होऊन हरितगृह परिणाम अधिक तीव्र होऊ शकतो. औद्योगिकीकरणाच्या सुरुवातीपासून विसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंतच्या काळात वातावरणातील कार्बनडाय-ऑक्साइडाचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे, तर मिथेनाचे प्रमाण दुपटीहून अधिक वाढलेे आहे. अशा प्रकारे मानवी व्यवहारांद्वारे कार्बन डाय-ऑक्साइड आणि इतर हरितगृह वायू यांचे वातावरणातील प्रमाणवाढत राहिल्यास जगाचे सरासरी तापमान एकविसाव्या शतकाअखेरीस १.४°–५.८° से.ने वाढू शकेल, असा अनेक वैज्ञानिकांचा अंदाज आहे. या जागतिक तापनामुळे पृथ्वीचे जलवायुमान (दीर्घकालीन सरासरीहवामान) बदलू शकेल आणि त्यामुळे अवर्षण व पर्जन्यवृष्टी यांचे नवीन आकृतिबंध व टोकाची मूल्ये निर्माण होतील आणि काही विशिष्ट प्रदेशांतील अन्नधान्यांचे उत्पादन ठप्प होईल.

जागतिक तापन : पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सरासरी तापमानात होणाऱ्या वाढीला जागतिक तापन (ग्लोबल वॉर्मिंग) म्हणतात. पुष्कळदा विशेषतः १८०० सालानंतर झालेल्या अशा तापमान वाढीसाठी ही संज्ञा वापरतात. १८५०–२००० या काळात पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सरासरी तापमानात सु. ०.७६° से. एवढी वाढ झाल्याचे वैज्ञानिकांच्या आकडेमोडीवरून लक्षात आले आहे. ही तापमानातील बहुतेक वाढ १९००–२००० या काळात झालेली आढळते. पृथ्वीच्या संपूर्ण इतिहासात तिचा पृष्ठभाग सावकाशपणे तापण्याचे व थंड होण्याचे अनेक कालखंड होऊन गेल्याचे दिसून येते. ज्वालामुखी उद्रेक, सूऱ्यापासून येणाऱ्या ऊर्जेत झालेले फेरबदल इ. कारणांमुळे हे नैसर्गिक रीतीने घडले आहे.भूतकाळात नैसर्गिक प्रक्रियांमुळे पृथ्वीच्या जलवायुमानात बदल घडलेले आहेत. मात्र, १९०० सालानंतर जागतिक तापनात झालेली बहुतेक वाढ मानवी व्यवहारांमुळे झाल्याचे सबळ पुरावे वैज्ञानिकांना सापडले आहेत.

भूपृष्ठाचे सरासरी तापमान २१०० सालापर्यंत १.१°–६.४° से.ने वाढेल, असे अनुमान काही शास्त्रज्ञांनी केले आहे. हे तापन विनाअडथळा चालू राहिल्यास वाढत्या तापमानाचा मानवी समाजावर व नैसर्गिक पऱ्यावरणावर घातक परिणाम होऊ शकेल, असेही शास्त्रज्ञांचे मत आहे. उदा., जागतिक तापनामुळे ध्रुवांलगतच्या जमिनीवरील बर्फ पुरेशा प्रमाणात वितळेल आणि त्यामुळे समुद्राच्या पातळीत लक्षणीय वाढ होईल. या तापनामुळे अधिक मोठ्या प्रदेशावर अवर्षणाचा परिणाम होऊन अनेक प्राणी व वनस्पती यांच्या जातींचा निर्वंश होऊ शकेल.

जागतिक तापन मऱ्यादित करण्यासाठी संशोधकांनी अनेक मार्गविकसित केले आहेत. मात्र, हे तापन जागतिक समस्या असल्यानेयाविषयीच्या धोरणांत आपापले हितसंबंध असलेल्या विविध देशांमध्ये सहकार्य असण्याची आवश्यकता आहे. असे असले, तरी अनेक देश वैयक्तिक पातळीवर यावर उपाय योजित आहेत आणि आंतरराष्ट्रीय कराराद्वारे भावी तापनावर मऱ्यादा घालण्याचे प्रयत्न करीत आहेत.

आधुनिक उद्योगांमुळे हरितगृह वायूंचे वातावरणात होणारे उत्सर्जन बऱ्याच प्रमाणात वाढले आहे. दगडी कोळसा, खनिज तेल व नैसर्गिकवायू या इंधनांच्या ज्वलनातून वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण वाढत आहे. जंगले मोठ्या प्रमाणात तोडली जात असल्याने वनस्पतींकडून ⇨ प्रकाशसंश्लेषणात वापरल्या जाणाऱ्या कार्बन डाय–ऑक्साइडाचा वापर कमी झाल्यानेही त्याचे वातावरणातील प्रमाण वाढते.

मानवाच्या काही व्यवहारांमुळे भूपृष्ठ थंड होते. उदा., मोटारगाड्यांतून बाहेर पडणारे निष्कास वायू व कारखान्यांतून निघणारा धूर यांमधून काही वायुकलिले (सूक्ष्म कणांची निलंबने) वातावरणात प्रविष्ट होतात. वायुकलिलांमुळे ढगनिर्मितीस चालना मिळते. ढग व वायुकलिले सूऱ्याची उष्णता परत अवकाशात परावर्तित करतात व त्यामुळे भूपृष्ठ थंड होते. तथापि, मानवी व्यवहारांमुळे शीतनापेक्षा बऱ्याच अधिक प्रमाणात भूपृष्ठ तापते. नैसर्गिक प्रक्रियांच्या तुलनेत मानवी व्यवहारांमुळे भूपृष्ठाच्या तापमानात दहा पटींनी वाढ झालेली आढळते.

संशोधकांनी जागतिक तापनाचा संबंध सजीव आणि त्यांच्यापरिस्थितिवैज्ञानिक प्रणाली यांच्यावरील अनेक संभाव्य घातक परिणामांशी जोडला आहे. जागतिक तापनाने समुद्राची पातळीही वाढत आहे. शिवाय त्याचा आर्क्टिक प्रदेशावर जलदपणे प्रभाव पडत आहे. या तापनाने हवामानाच्या रचनाही बदलत असून जगभरातील मानवी आरोग्यावरही त्याचा परिणाम होणे शक्य आहे. तापन आणखी वाढल्यास हे परिणाम अधिक तीव्र व व्यापक होतील, असेही त्यांना वाटते.

जागतिक तापनामुळे मापनातील हंगामी बदल वर्षाच्या किंचित भिन्न वेळेत झाल्यास त्यांचा अनेक वनस्पती व प्राणी यांच्यावर विपरीत परिणाम होईल. उदा., फुले येणे, अंडी घालणे, स्थलांतर करणे, पालवी फुटणे इत्यादींच्या वेळेत बदल होईल.

वाढत्या तापमानामुळे अनेक प्राणी अधिक थंड भागाकडे म्हणजे ध्रुवांकडे व उंच ठिकाणी गेले. उदा., ऑस्ट्रेलियात फ्लाईंग फॉक्स नावाची मोठी वटवाघळे दक्षिणेकडील अधिक थंड भागाकडे स्थलांतरित झाली. जमिनीवरील अनेक प्राणी व वनस्पतींना नवीन ठिकाणी जाण्यात अडचणी असतात आणि अशा जीवांविषयी शास्त्रज्ञांना चिंता वाटते. हे तापनअधिक जलदपणे झाल्यास त्याच्याशी जुळवून घेणे अनेक जीवजातींना अवघड होईल. सरासरी तापमानात १.५°–२.५° से.ने वाढ झाल्यास २०–३०% जीवजातींची निर्वंश होण्याची जोखीम अधिक असेल.१९०० च्या शतकात सरासरी समुद्रपातळी १७ सेंमी.ने वाढली त्याला जागतिक तापनही कारणीभूत आहे. पाणी तापल्याने प्रसरण पावते व त्यामुळेही समुद्रपातळी वाढते. वाढत्या तापमानामुळे जमिनीवरील बर्फ वितळून बनलेले पाणी समुद्रात जाऊनही त्याची पातळी वाढते. किनारी भागांतील पूर, झीज व पाणथळ जमीन कमी होणे यामागे समुद्रपातळीतील वाढ हेही एक कारण आहे. तापमानामुळे समुद्रपातळी २१०० सालापर्यंत आणखी १८–५९ सेंमी.ने वाढू शकेल, असा संशोधकांचा अंदाज आहे. मात्र, ग्रीनलंड व अंटार्क्टिका येथील बर्फाचे स्तर वितळून वाढणारी समुद्रपातळी या अंदाजात धरलेली नाही. हे थर वितळण्याची त्वरा पाहिल्यास समुद्रपातळीत आणखी लक्षणीय वाढ होऊ शकेल.

आर्क्टिक प्रदेशामध्ये तापमानातील वाढ सरासरी जागतिक वाढीच्या दुप्पट झाल्याचे दिसते. या जलद तापनामुळे आर्क्टिकमधील उन्हाळ्यातील बर्फाच्छादित क्षेत्र १९०० सालापासून बरेच कमी झाले. तेव्हापासून उपग्रहांद्वारे याची नोंद ठेवण्यात येऊ लागली. वितळणाऱ्या बर्फाचा समुद्रपातळीवर विशेष परिणाम झाला नाही. कारण बर्फ आधीच सागरी पाण्यावर तरंगत असतो. मात्र, समुद्रातील बर्फ कमी झाल्याने तेथील अनेक जीवजातींना धोका निर्माण झाला आहे. उदा., बर्फावर शिकार करून जगणारी ध्रुवीय अस्वले व बर्फावर पिलांना जन्म देणारे सील.

तापणाऱ्या समुद्रामुळे सागरी परिस्थितिवैज्ञानिक प्रणाल्यांची (विशेषतः प्रवाळभित्ती) हानी झाली आहे. उच्च सागरी तापमानांमुळे प्रवाळांचे विरंजन होते. म्हणजे यामुळे त्यांच्या आत राहणारी व त्यांना अन्न पुरविणारी रंगीत शैवले नष्ट होतात. तापमान फार उच्च राहिल्यास प्रवाळ पांढरे होतात व मरतात. सागरी पृष्ठाच्या तापमानात आणखी फक्त १°–३° से.ने वाढ झाल्यास जगातील अनेक प्रवाळभित्ती मरतील, असा शास्त्रज्ञांचा होरा आहे. सागरातील अनेक जीवजातींना प्रवाळभित्तींमुळे अधिवास मिळत असल्याने ही वस्तुस्थिती विशेष चिंतेची आहे.

जागतिक तापनामुळे हवामानात टोकाचे बदल होतील, या तापनामुळे मुसळधार पाऊस व हिमवृष्टी या घटनांची वारंवारता वाढेल. शिवाय या तापनामुळे उष्णतेच्या लाटा, पूर व व्यापक अवर्षणे तीव्र रूपात वरचेवर घडू शकतील. या आघातांचा पाणीपुरवठ्यावर ताण पडून पिकांचे नुकसान व परिस्थितिवैज्ञानिक प्रणालींना इजा पोहचू शकेल, अशी संशोधकांची अटकळ आहे.

वारंवार व तीव्र उष्ण दिवस तसेच उष्णतेच्या लाटा यांच्यामुळे उष्णतेने होणारे आजार व मृत्यू यांच्यात भर पडू शकेल. वादळे, पूर, अवर्षणे व वणवे यांच्यामुळे होणारे मृत्यू व रोग यांत वाढ होऊ शकेल, असाही वैज्ञानिकांचा अंदाज आहे. याउलट उच्चतर तापमानांमुळे व थंडीमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट होऊ शकेल. तथापि, वाढत्या तापमानाचे मानवी आरोग्यावर होणारे घातक परिणाम हे त्याच्या फायद्यांपेक्षा जास्त वाईट असतील, असेही संशोधकांचे मत आहे.

जागतिक तापन मऱ्यादित ठेवण्याच्या अनेक उपायांचा वैज्ञानिकांनी अभ्यास केला आहे. कार्बन डाय-ऑक्साइडाच्या उत्सर्जनावर मऱ्यादा घालणे हा सर्वांत उघड असलेला उपाय आहे. कार्बन अलगीकरण हा दुसरा उपाय असून यात कार्बन डाय-ऑक्साइड वातावरणात प्रविष्ट होण्याला प्रतिबंध केला जातो किंवा वातावरणात आधीच असलेला हा वायूकाढून टाकला जातो. भू-अभियांत्रिकी या तिसऱ्या उपायात पऱ्यावरण अशा प्रकारे बदलायचे की, ते तापनाचा प्रतिकार करू शकेल किंवा तापनखंडित करू शकेल.

कार्बन डाय-ऑक्साइडाचे उत्सर्जन मऱ्यादित करण्यासाठी जीवाश्म इंधनांऐवजी सूर्यप्रकाश, वारा, अणुऊर्जा व भू-औष्णिक ऊर्जा हे पऱ्यायी ऊर्जास्रोत वापरता येतात. वाहनांतील इंधनाचे ज्वलन करणाऱ्या एंजिनाला पऱ्यायी प्रयुक्त्या (उदा., संकरित वाहने, जैवइंधने व इंधन विद्युत् घट) विकसित करणे वा या एंजिनांची कार्यक्षमता वाढविणे हाही कार्बन डाय–ऑक्साइडाचे उत्सर्जन मऱ्यादित करण्याचा उपाय आहे. शिवाय व्यक्तिगत पातळीवर ऊर्जेचे संरक्षण केल्याने जीवाश्म इंधने जाळण्याची गरज कमी होऊनही कार्बन डाय-ऑक्साइडाचे उत्सर्जन कमी करता येईल. उदा., वापर होत नसताना इलेक्ट्रॉनीय उपकरणे व परंपरागत दिवे बंद करणे, कमी ऊर्जा लागणारे दिवे वापरणे, स्वयंचलित वाहनांचा वापर कमी करणे किंवा सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करणे इत्यादी.

कार्बन अलगीकरण करताना नको असलेला कार्बन डाय-ऑक्साइड साठविण्याकरिता जागेची गरज असते. ती जमिनीखाली, पाण्याखालीकिंवा सजीव वनस्पतींत साठविता येऊ शकेल. कार्बन डाय-ऑक्साइडाचे उद्योगधंद्यांतून होणारे उत्सर्जन जमिनीखालील खडकांत किंवा समुद्राच्या पाण्यात अंतःक्षेपित करण्याचा (घुसविण्याचा) प्रयत्न करावा लागेल. ज्यांमधून बहुतेक खनिज तेल किंवा नैसर्गिक वायू काढून घेतलेला आहे, असे खनिज तेलाचे नैसर्गिक साठे व बेसाल्टासारख्या खडकांचे थर हे वायू साठविण्यासाठी योग्य जागा आहेत. त्यामुळे अशा साठ्यांत मागे राहिलेले खनिज तेल व नैसर्गिक वायू काढून घेणे सोयीचे होईल. बेसाल्टामुळे या वायूचे रासायनिक रीतीने घन लवणांत परिवर्तन होईल.

कार्बन डाय-ऑक्साइड पाण्यात सहजपणे विरघळतो व सागरात हा बहुतेक वायू नैसर्गिक रीत्या साठविला जातो. खोल सागरात हा वायू पंपाद्वारे थेट सोडून पाहण्याचे शास्त्रज्ञांचे प्रयत्न आहेत. तथापि, याचा सागरी जीवनावर होणारा परिणाम काळजीपूर्वक तपासायला हवा. उदा., सागरी पाण्याची अम्लता वाढण्याची शक्यता विचारात घ्यायला हवी.

प्रकाशसंश्लेषणासाठी कार्बन वापरून वनस्पती वाढतात तेव्हा हिरव्या वनस्पती वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेतात. वने वापिकेे यांच्यात वाढ करून विपुल वनस्पती असलेली परिस्थितिवैज्ञानिक प्रणाली निर्माण करून किंवा ती निर्माण होण्यास पाठबळ देऊन वाता-वरणातून पुष्कळ कार्बन डाय-ऑक्साइड काढून टाकता येईल.

जागतिक तापन मऱ्यादित ठेवण्यासाठी पऱ्यावरणात मोठ्या प्रमाणात बदल करण्याचे काम भू-अभियांत्रिकीत अपेक्षित आहे. वातावरणात वायुकलिले अंतःक्षेपित करणे हा एक उपाय आहे. त्यांच्यामुळे सूर्यप्रकाश परावर्तित होऊन पृथ्वी थंड राहील. समुद्रात लोखंड समाविष्ट करणे ही दुसरी योजना आहे. यामुळे फायटोप्लँक्टॉन या सूक्ष्म सागरी जीवांच्या वृद्धीला प्रोत्साहन मिळेल. हे जीव प्रकाशसंश्लेषणासाठी कार्बन डाय-ऑक्साइड ग्रहण करतात. तिसऱ्या उपायात अब्जावधी सूक्ष्म सौर पडदे वा सौरपट पृथ्वी-भोवतीच्या कक्षांत स्थापित करून काही सूर्यप्रकाश विचलित होईल.

अशा प्रस्तावांमध्ये अज्ञात जोखमी वा आव्हाने आहेत. उदा., वातावरणात वायुकलिले सोडल्याने विशिष्ट अम्लयुक्त पाऊस व इतर वर्षण यांत वाढ होईल. अम्लयुक्त पावसामुळे सरोवरांतील व जल-प्रवाहांतील मासे व इतर जीव मरू शकतात. समुद्रात मोठ्या प्रमाणावर लोखंड समाविष्ट झाल्यास सागरी पऱ्यावरणांचे नुकसान होऊ शकेल.सौरपट अवकाशात ठेवणे खूप खर्चिक काम असून ते तेथे दीर्घकाळ ठेवण्याची गरज आहे.

जागतिक तापन मऱ्यादित ठेवण्यासाठीचा प्रयत्न म्हणून अनेक राष्ट्रीय सरकारे व संस्थांनी हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी धोरणे तयार केली आहेत. या उत्सर्जनात कपात करण्याच्या हेतूने करण्यात आलेल्या क्योटो प्रोटोकॉल या आंतरराष्ट्रीय कराराला बहुतेक देशांनी मान्यता दिली आहे. या करारानुसार विकसित (सापेक्षतः सधन) देशांनी आपल्या देशांतून होणाऱ्या कार्बन डाय-ऑक्साइड व इतर पाच हरितगृह वायूंच्या उत्सर्जनावर मऱ्यादा घालणे आवश्यक आहे. सन २००८–१२ या कालावधीत भिन्न देशांसाठी भिन्न वार्षिक उत्सर्जन लक्ष्ये ठरवून दिली आहेत. या करारात विकसनशील (सधन नसलेल्या) देशांवर अशा मऱ्यादा घातलेल्या नाहीत.

जगभरातील प्रतिनिधींनी क्योटो (जपान) येथे प्राथमिक दस्तऐवज म्हणून हा करार स्वीकारला (१९९७). तो प्रत्यक्ष अंमलात येण्यासाठीया कराराला किमान ५५ देशांची मान्यता असायला हवी होती. शेवटी बहुतेक देशांनी या कराराला मान्यता दिली व २००५ मध्ये या कराराची कार्यवाही सुरू झाली. तथापि, अमेरिकेने या कराराला मान्यता देण्यास नकार दिला.

जागतिक तापन थांबविण्यासाठी या कराराचा थोडाच उपयोग होईल. यामुळे अगदी थोड्याच कालावधीतील हरितगृह वायूंचे उत्सर्जन व पातळ्या मऱ्यादित होतील. त्यामुळे हरितगृह वायूंच्या प्रमाणांत होणारी वाढ थांबणार नाही परंतु या करारामुळे भावी उपायांसाठीचा आधार तयार झाला आहे. बाली येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय जलवायुविज्ञानविषयक परिषदेतील प्रतिनिधींनी २०१२ सालानंतरच्या कालावधीसाठीच्या नवीन करारा-विषयीच्या वाटाघाटी सुरू केल्या.

जागतिक तापनाचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक विविध पद्धती व पुरावे वापरतात. तापमापक व इतर उपकरणांद्वारे १८५० सालानंतर मिळालेल्या माहितीचे जलवायुवैज्ञानिक विश्लेषण करतात. या आधीच्या काळातील जलवायुमानात झालेले बदल अभ्यासण्यासाठी पुराजल-वायुवैज्ञानिक माहितीचा ते उपयोग करतात. ही माहिती महासागरातील व सरोवरांतील अवसाद (गाळ), बर्फाच्या गाभ्याचे नमुने व वृक्षाच्या खोडावरील वलये यांसारख्या नैसर्गिक स्रोतांपासून मिळवितात. अखेरीस ते पृथ्वीच्या जलवायुमानाच्या प्रतिकृती संगणक वापरून तयार करतात. जलवायुमानातील भूतकालीन बदल जाणून घेण्यासाठी, भविष्यकालीन बदलांविषयी व जागतिक तापनाच्या परिणामांविषयी भाकीत करण्यासाठी या प्रतिकृतींचा उपयोग करता येतो.

सतराव्या व अठराव्या शतकांतील जलवायुमानविषयक काही नोंदी उपलब्ध आहेत. मात्र, एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून जलवायुमानाचे पद्धतशीर मापन करण्याचे काम सुरू झाले. या माहितीत समुद्रावरील आणि भूपृष्ठावरील पृष्ठभागाच्या तापमानाची मापने, वर्षणाचे प्रमाण, समुद्रातील बर्फाचा व्याप व जागतिक महासागराची पातळी यांचा अंतर्भाव असतो. कृत्रिम उपग्रहांच्या मदतीने १९७०च्या दशकापासून अभ्यास करण्यात येत आहे. त्यामुळे आणखी माहिती मिळाली. उदा., भूपृष्ठावरील आणि वातावरणाच्या स्तरांमधील तापमानाची प्रवृत्ती. तसेच माहिती संकलित करणारे महासागरातील फलाट हे सागरी पाण्याचे तापमान व इतर गुणधर्म मोजतात.

पुराजलवायुमानीय माहितीमुळे हजारो वर्षांत झालेल्या जलवायुमानातील बदलांची पुनर्रचना वा फेरमांडणी करणे शक्य होते. गाळाचे बहुतेक नमुने व परागांविषयीच्या नोंदी यांसारखे स्रोत दीर्घकालावधीतील जलवायुमानीय बदलांचे सविस्तर वर्णन करण्याच्या दृष्टीने पुरेसे असतात. वृक्षाच्या खोडावरील वलयांवरून त्यांच्या वाढीची केलेली मापने व बर्फाच्या गाभ्यातील नमुन्यांतून निःसारित झालेले वायू यांसारख्या स्रोतांमधून वार्षिक वा हंगामी जलवायुमानीय बदलांच्या नोंदी उपलब्ध होऊ शकतात. अंटार्क्टिका खंडाच्या खाली ३,००० मी. खोलीवर घेतलेल्या बर्फाच्या नमुन्यांत बंदिस्त झालेल्या वायूच्या बुडबुड्यांतील वायू ९ लाख वर्षांपूर्वी वातावरणात होते, असे लक्षात आले.

जलवायुमानाची नैसर्गिक चलनशीलता तसेच हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाला जलवायुमानाकडून मिळणारा प्रतिसाद यांच्या तपशीलवार संशोधनासाठी संगणकीकृत जलवायुमान प्रतिकृतींचा वापर होऊ शकतो. या प्रतिकृतींच्या जटिलतेच्या मात्रेत मोठी तफावत असते. अगदी सर्वाधिक तपशीलवार प्रतिकृतीही वातावरण व महासागर यांच्यावर परिणाम घडविणाऱ्या सर्व प्रक्रियांचा योग्य खुलासा करू शकत नाहीत. तथापि, अनेक प्रतिकृती जलवायुमानावर प्रभाव टाकणाऱ्या मूलभूत घटकांची चांगल्या रीतीने फेरमांडणी करण्याचे काम करू शकतात.

इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) ही जागतिक तापनाचे अध्ययन करणारी आघाडीवरील संघटना आहे. ही संघटना वर्ल्ड मिटिरिऑलॉजिकल ऑर्गनायझेशन आणि युनायटेड नेशन्स इन्व्हाय्र्न्मेंट प्रोग्रॅम यांनी १९८८ मध्ये स्थापन केली. आयपीसीसी संघटना जलवायुमानातील बदलाविषयीची अद्ययावत वैज्ञानिक, तांत्रिक व सामाजिक-आर्थिक माहिती ठरविते व ती संक्षिप्त करते तसेच आपल्या अहवालांत आपले निष्कर्ष प्रकाशित करते. हे अहवाल जगभरातील आंतरराष्ट्रीय संघटना व धोरण ठरविणारे तज्ञ यांना सादर करते. आयपीसीसी संघटनेच्या अखत्यारीखाली जलवायुमानीय बदलाविषयीच्या जगातील हजारो तज्ञांनी काम केले आहे.

आयपीसीसीच्या अहवालांत जागतिक तापनाच्या प्रगतीची नोंद झाली आहे आणि या आविष्कारातील मानवी व्यवहाराच्या भूमिकेविषयी वाढते मतैक्य होत असल्याचे दाखविले आहे. २००७ च्या अहवालात पुढील माहिती दिली आहे. विसाव्या शतकात भूपृष्ठाच्या जागतिक सरासरी तापमानात ०.७४° से. ने वाढ झाली आहे. मानवामुळे होणाऱ्या हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात घट करण्याचे योग्य उपाय योजले नाहीत, तर २१०० सालापर्यंत या तापमानात आणखी १.८°–४° से. एवढी वाढ होईल, असे भाकीतही केले आहे. जागतिक तापनात १९५० पासून झालेली बहुतेक सर्व वाढ ही मानवी व्यवहारांमुळे झालेली आहे, असे २००७ च्या अहवालात आहे. आयपीसीसीच्या या निष्कर्षांचे समर्थन अनेक वैज्ञानिक संघटनांनी केले आहे.

No comments:

Post a Comment