Tuesday, 5 April 2022

व्यक्ती विशेष : प्रा. अनीसउज्जमान


👉आपल्याकडे ‘पद्म’ पुरस्कारांचे जे महत्त्व, तेच पद्मा नदीपारच्या बांगलादेशात ‘एकुशे पदक’ या पुरस्काराचे. हे दोन्ही पुरस्कार- त्यातही ‘पद्मभूषण’ आणि ‘एकुशे पदक’ मिळवणाऱ्या व्यक्ती फार कमी, त्यांपैकी एक म्हणजे प्राध्यापक अनीसउज्जमान. बंगाली भाषा, साहित्य आणि शिक्षण यांच्या निरंतर सेवेसाठी त्यांना २०१४ मध्ये ‘पद्मभूषण’ने गौरविण्यात आले होते.

👉बांगलादेशनिर्मितीच्या चळवळीत ते सहभागी होतेच. पण त्यापुढेही, बांगलादेश हा अतिरेकी धर्मवाद्यांचा देश ठरू नये, इथे कला-संस्कृती बहरण्यासाठी आवश्यक असलेला मोकळेपणा रुजावा, यासाठी ते आजन्म प्रयत्नरत होते. त्यांचे निधन १४ मे रोजी ढाका येथे झाले.

👉कोलकात्यात १९३७ मध्ये जन्म, १९४७ मध्ये ढाक्याकडे स्थलांतर, तेथेच माध्यमिक व उच्चशिक्षण अशी पार्श्वभूमी असलेल्या अनीसउज्जमान यांचा वयाच्या १४ व्या वर्षांपासून विद्यार्थी चळवळीशी संबंध आला. ‘पाकिस्तानीकरण नको’ हा मुद्दा तत्कालीन विद्यार्थ्यांनाही आपला वाटत होता. बंगालीसाठी १९५२ मध्ये पहिली भाषा-चळवळ झाली, त्यात तरुण अनीसउज्जमान यांचा सहभाग होता. पुढे १९६९च्या चळवळीचे महत्त्वाचे केंद्र ठरलेल्या चित्तगांवमध्ये सहप्राध्यापक असताना त्यांनी नेतृत्वही केले. निर्णायक उठाव १९७१ मध्ये झाला, तोवर नव्या बांगलादेशाची उभारणी करणाऱ्यांत त्यांची गणना होत होती.

👉 मात्र राजकारणात न पडता ते लेखन आणि अध्यापनातच रमले. १४ पुस्तके आणि समीक्षा व समाजचिंतनपर अनेक निबंध त्यांच्या नावावर आहेत. ढाका व चित्तगांव येथे प्राध्यापकी करताना १९७८ ते १९८३ या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या संशोधन प्रकल्पांसाठी काम केले. हे प्रकल्प भाषा व समाज यांच्या संबंधांविषयी होते. ‘सॉरबाँ’ म्हणून ओळखले जाणारे पॅरिस विद्यापीठ (१९९४) व अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठ (१९९५) येथे अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर २०१० मध्ये ते कोलकाता विद्यापीठातही पाहुणे प्राध्यापक होते.

👉 पण त्यांच्या विद्यापीठीय विश्वनागरिकत्वावर कळस चढला तो, २००९ ते २०११ मध्ये शांतिनिकेतनच्या ‘विश्व भारती’ विद्यापीठातील त्यांच्या वावराने! प्राचीन बंगाली गद्यापासून ते स्त्रीचे साहित्य व समाजातील स्थान, सांस्कृतिक वैविध्य व बहुविधता, अशा विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिली. बांगलादेश आणि जग यांमधला एक सांस्कृतिक पूल त्यांच्या निधनामुळे निखळला आहे.                                

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...