Monday, 11 April 2022

आंनदयात्री कवी बाळकृष्ण भगवंत बोरकर उर्फ बा भ. बोरकर

आंनदयात्री कवी बाळकृष्ण भगवंत बोरकर उर्फ बा भ. बोरकर यांच्या विषयी
जन्म.३० नोव्हेंबर १९१९
१९३० मध्ये वयाच्या विसाव्या वर्षीच त्यांचा प्रतिमा हा काव्यसंगह प्रकाशित झाला. त्यांच्या या काव्यसंगहावर केशवसुत, बालकवी, गोविंदागज यांचा प्रभाव विशेषत्वाने जाणवतो. बोरकरांच्या मनावर घरातील धार्मिक वातावरण, प्रेमळ आप्त परिवार, शालेय जीवनातील संस्कार आणि गोव्याचा व कोकणचा रमणीय निसर्ग यांचा खोल परिणाम झालेला त्यांच्या कवितेतूनही दिसून येतो.
निसर्गाच्या भव्योत्कट सौंदर्याचा त्यांना जणू ध्यास जडला होता. निसर्ग हीच त्यांची भाषा बनली; त्यांच्या अविष्काराचे माध्यम बनले. गोव्याच्या निसर्गरम्य भूमीचे वर्णन ते पुढील शब्दांत करतात, - या गोव्याच्या भूमीत मधाचे नारळ असतात. कड्याकपारीतून दुधाचे घट फूटतात; आंब्या फणसांची रास असते. इथे चांदणे माहेरी येते आणि पावसात दारापुढे सोन्या-चांदीच्या धारा खेळतात... किती नितांत सुंदर आणि अत्यंत कल्पनारम्य, पण जिव्हाळ्याने केलेले हे वर्णन आहे! त्यांच्या सर्वच प्रकारच्या लेखनात, विशेषत: कवितेत नियमितपणे निसर्ग डोकावतो. निसर्ग भाषा हेच त्यांचे वेगळेपण.
१९३२ साली बोरकरांच्या कवितेने भारावून जाऊन श्रेष्ठ कवी भा. रा. तांबे यांच्या तोंडून Here is a new star on horisen असे कौतुकाचे उद्गार निघाले. कवीवर्य भा. रा. तांबे यांच्या विचारसरणीचा, काव्यशैलीचा त्यांच्यावर खूप परिणाम झालेला दिसतो. एकलव्यासारखे तांबे यांचे गुरुपद त्यांनी मनोमन स्वीकारले व मानाने मिरवलेही. त्यामुळे तांब्यांच्या घराण्याची गायकी पुढे नेणारे कवी अशी त्यांची प्रतिमा झाली. बोरकरांचे वि. स. खांडेकर, काकासाहेब कालेलकर, कुमार गंधर्व, पु.ल.देशपांडे, चित्रकार दलाल, यांच्यासह म. गांधी, डॉ. लोहिया, पं. नेहरू, योगी अरविंद बाबू यांसारया विविध प्रांतांतील थोर लोकांबरोबर स्नेहपूर्ण नाते होते. त्यामुळे त्यांचे अनुभवविश्र्व व जीवन अधिक समृद्ध झाले. बोरकरांच्या संपूर्ण काव्यप्रवासात त्यांची कविता जीवनाच्या गतीनुसार आशयदृष्ट्या समृद्ध होत गेलेली दिसते. ते सौंदर्यलुब्ध मनाचे कवी होते. या सौंदर्यातूनच त्यांना दिव्यत्वाचा, अपार्थिवाचा साक्षात्कार होतो.
दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती,
यज्ञी ज्यांनी देऊनी निज शीर, घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभुमीवर, नाही चिरा नाही पणती,
तेथे कर माझे जुळती.
या कवितेतील मानवतावादामागील सच्चेपणा आपणास आजही भावतो. अतिशय प्रगल्भ व अर्थगर्भ शब्दयोजनेमुळे ही कविता मैलाचा दगड ठरली. ज्ञानदेव गेले तेव्हा, देखणे ते चेहरे, जीवन त्यांना कळले हो अशा एकाहून एक सरस कविता त्यांनी लिहिल्या. स्त्री सौंदर्य आणि प्रेमभावना हेदेखील त्यांच्या कवितांचे प्रमुख विषय होते. त्यांचे गोव्यावर व कोकणी भाषेवरही अतिशय उत्कट प्रेम होते. कोकणी भाषेतही त्यांची बरीच पुस्तके प्रकाशित आहेत. त्यातील सासाय या कोकणी संगहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. वास्तवाच्या प्रखर आचेतही बोरकरांच्या कवितेने काव्यात्मतेची स्वप्नील धुंदी टिकवून ठेवली. सुंदरतेच्या श्रद्धेतून, श्रुतिमधूर, गीतधर्मी व भावपूर्ण कवितांसाठी आजही ते आदरपूर्वक ओळखले जातात. १९३४ मध्ये बडोदा येथील साहित्य संमेलनात तेथे कर माझे जुळती या कवितेसाठी त्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले.
बोरकरांच्या भावीण या कादंबरीला १९५० मध्ये गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे सुवर्णपदक मिळाले. त्यांच्या आनंदभैरवी, चित्रवीणा, गितार, आनंदयात्री रवींद्रनाथ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले. १९६७ साली राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री हा किताब देऊन त्यांना गौरवण्यात आले. स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांच्या बहुमोल सकिय सहभागाबद्दल भारत सरकारतर्फे १९७४ मध्ये तामपट देण्यात आला.
  *मा.बा भ. बोरकर* यांचे ८ जुलै १९८४ निधन झाले. आपल्या समूहाकडून *मा.बा भ. बोरकर* यांना आदरांजली.
*माझ्या गोव्याच्या भूमीत*

माझ्या गोव्याच्या भूमीत
गड्या नारळ मधाचे,
कड्या-कपाऱ्यां मधुन
घट फ़ुटती दुधाचे||

माझ्या गोव्याच्या भूमीत
आंब्या-फ़णसाची रास,
फ़ुली फ़ळांचे पाझर
फ़ळी फ़ुलांचे सुवास||

माझ्या गोव्याच्या भूमीत
वनश्रीची कारागिरी,
पाना-फ़ुलांची कुसर
पशु-पक्ष्यांच्या किनारी||

माझ्या गोव्याच्या भूमीत
उन्हाळ्यात खारा वारा,
पावसात दारापुढे
सोन्याचांदीच्या रे धारा||

माझ्या गोव्याच्या भूमीत
येते चांदणे माहेरा,
ओलावल्या लोचनांनी
भेटे आकाश सागरा||

माझ्या गोव्याच्या भूमीत
चाफ़ा पानाविण फ़ुले,
भोळा भाबडा शालीन
भाव शब्दाविण बोले||

माझ्या गोव्याच्या भूमीत
गडे साळीचा रे भात,
वाढी आईच्या मायेने
सोन-केवड्याचा हात||

माझ्या गोव्याच्या भूमीत
सागरात खेळे चांदी,
आतिथ्याची, अगत्याची
साऱ्या षडरसांची नांदी||
बा. भ. बोरकर

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...