Saturday, 23 April 2022

महर्षी कर्वे

पुनर्विवाह : महर्षी कर्वे

त्यांच्या सहचारिणी राधाबाई कालवश झाल्या, त्या वेळी अण्णांचे वय पंचेचाळीसच्या आसपास होते. प्रौढ वयात विधुर झालेल्या पुरुषानेही अल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याची त्या काळात प्रथा होती.

लहान वयात मुलींची लग्ने होत, पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे. ही समाज रीत नाकारणाऱ्या अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला.

ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. अण्णा पत्‍नीसह मुरूडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. अण्णासाहेबांच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता.

अण्णांचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती; घातक सामाजिक प्रथांविरुद्ध केलेले ते बंड होते.

पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे, या हेतूने २१ मे, इ.स. १८९४ या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा घेतला. याच सुमारास अण्णांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक‘ मंडळाची स्थापना केली. विधवा-विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालणे हे या मंडळाचे काम होते.

बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यासारख्या अन्याय्य रूढींत अडकलेल्या अनिकेत स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून इ.स. १८९६ मध्ये अण्णांनी सहा विधवा महिलांसह ‘अनाथ बालिकाश्रम‘ काढला. ‘विधवा विवाहोत्तेजक‘ मंडळाची स्थापना केली.

विधवाविवाह न्याय संमत मानला जात नव्हता अशा काळामध्ये अण्णांनी विधवा विवाहाचा आग्रह धरून समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल करण्यासाठी चळवळ उभी केली या चळवळीचा एकूणच परिणाम म्हणजे या काळामध्ये पुनर्विवाह साठी समाजाची मानसिकता तयार होऊ लागली रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णांचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि रु. ७५० संस्थेच्या उभारणीसाठी अण्णांकडे सुपूर्द केले. या उजाड माळरानावर अण्णांनी एक झोपडी बांधली. ही पहिलीवहिली झोपडी ही हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेची गंगोत्री. आज अनेक वास्तूंनी गजबजून गेलेल्या या वैभवसमृद्ध परिसरात अण्णांची झोपडी त्यांच्या तपाचे महाभारत जगाला सांगत उभी आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...