Monday, 11 April 2022

तुका म्हणे /म्हणी व अर्थ

मराठी व्याकरण व लेखन:
🌷तुका म्हणे🌷

ओले मुळ भेदी खडकाचे अंग । अभ्यासासी सांग कार्य सिद्धी ।। नव्हे ऐसे काही नाही अवघड । नाही कईवाड तोची वरी ।। दोरे चिरा कापे पडिलां कांचणी ।
अभ्यासे सेवनी विष पडे ।। तुका म्हने कैंचा बैसण्यासी ठाव । जठरीं बाळा वाव एकांएकी ।।

🌷तुकाराम महाराज म्हणतात,जमिनीतील झाडाच्या मुळा अत्यंत नाजूक आणि ओलसर राहतात,परंतु त्याच मुळा कठीण अशा खडकाला भेदून जातात. अभ्यासा अंती,प्रयत्नाअंती कोणतेही कार्य यशस्वी होते,शेवटास जाते.

🌷या जगात कोणतेही काम अवघड असे नाहीच.छोटा दोर किंवा दोरा सतत घासून घासून दगडाला सुद्धा कापू शकतो, जर नेहमी रोज रोज थोडे थोडे करून विष जरी घेतले तर त्याचा सराव होऊन विष सुद्धा पचवण्याची ताकत निर्माण होते.

🌷आईच्या उदरात बाळास वाढण्यास जागा नसते परंतु हळूहळू ते बसण्यासाठी,वाढण्यासाठी जागा निर्माण करतेच. थोडक्यात या अभंगातून तुकारामांनी दैवावर विसंबून न राहता माणसाने प्रयत्नवादी बनले पाहिजे असा उपदेश केला आहे.

___________________

🌷म्हणी व अर्थ🌷
🌷करायला गेलो एक अन् झाले एक------
करायचे एक आणि झाले भलतेच

🌷करावे तसे भरावे------
जसे चांगले वाईट करावे तसे त्याचे चांगले वाईट परिणाम भोगावे

🌷करीन ती पूर्व दिशा------
एखादी अधिकारी व्यक्ती सांगेल ते सारे इतरांनी निमूटपणे मान्य करणे

🌷करू गेले काय अन् उलटे झाले काय------
करायचे एक आणि झाले भलतेच

🌷कवडी कवडी माया जोडी------
काटकसरीने वागून थोडी थोडी बचत केल्यास बरीच मोठी रक्कम शिल्लक पडते

🌷कर्कशेला कलह गोड, पद्मिनीला प्रीती गोड------
दुष्ट स्त्रीला कलह करणे आवडते तर गुणवंतीला प्रेम आवडते

🌷कवड्याचे दान वाटले, गावात नगारे वाजले------
करणे थोडे पण गवगवाच फार

🌷कसायाला गाय धार्जिणी------
भांडखोर व नीतिमत्ता नसलेल्या गुंड माणसापुढे गरीब माणसे नसतात

🌷का गं बाई उभी, घरात दोघीतिघी------
घरात पुष्कळ लोक काम करावयास असले म्हणजे आळस चढतो

🌷काकडीची चोरी, फाशीची शिक्षा------
अपराध खूप लहान पण शिक्षा मात्र फार मोठी

🌷काखेत कळसा अन् गावाला वळसा------
भान नसल्याने जवळच असलेली वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे

No comments:

Post a Comment