Thursday, 21 April 2022

श्री. एच.डी. देवेगौडा

श्री. एच.डी. देवेगौडा

June 1, 1996 - April 21, 1997 | Janata Dal
श्री. एच.डी. देवेगौडा

सामाजिक आर्थिक विकास व भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे कट्टर समर्थक असलेल्या श्री. एच. डी. देवेगौडा यांचा जन्म 18मे 1933 रोजी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील होलेनारासिपुरा तालुक्यात असलेल्या हरदनहल्ली गावात झाला.
सिविल इंजिनीरिंग पदविका धारक श्री. देवेगौडा यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी शिक्षण पूर्ण करून राजकारणात प्रवेश केला. 1953 साली त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला व 1962 पर्यंत ते या पक्षाचे सदस्य राहिले. एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबाचे सदस्य असलेल्या श्री. देवेगौडा यांनी शेतकऱ्याच्या जीवनातील समस्या बघितल्या होत्या त्यामुळे त्यांनी शेतकरी, वंचित शोषित लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवला.

लोकशाही व्यवस्थेतील तळागाळातील घटकांशी संबंध ठेवणाऱ्या श्री. देवेगौडांनी यथावकाश राजकीय यश प्राप्त केले. अंजनेय सहकारी संस्थेचे अध्यक्ष व होलेनारासिपुरा तालुक्याच्या तहसील विकास बोर्डच्या सदस्याच्या रुपात त्यांनी लोकांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते. त्यांनी नेहमी असमानताविरहीत समाजाचे स्वप्न बघितले.28व्या वर्षी श्री. गौडा अपक्ष म्हणून निवडणूक लढले व 1962 मध्ये कर्नाटक विधानसभेचे सदस्य बनले. विधानसभेचे वक्ते असताना त्यांनी सर्वांना प्रभावित केले. होलेनारासिपुरा मतदारसंघातून चौथ्या (1967-1971), पाचव्या(1972-1977)व सहाव्या (1978-1983) विधानसभेवर ते सलग निवडून आले .

मार्च 1972 पासून मार्च 1976 पर्यंत व नोव्हेंबर 1976 पासून डिसेंबर 1977 पर्यंत विधानसभेत ते विरोधी पक्ष नेते म्हणून प्रख्यात होते. श्री. देवेगौडा यांनी 22 नोव्हेंबर 1982रोजी विधान सभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सातव्या व आठव्या विधानसभेचे सदस्य असताना त्यांनी सार्वजनिक बांधकाम व सिंचन मंत्री म्हणून काम पाहिले. सिंचन मंत्री असताना त्यांनी अनेक सिंचन प्रकल्प सुरु केले. 1987 मध्ये त्यांनी सिंचन क्षेत्रासाठी दिल्या गेलेल्या अपुऱ्या निधीचा विरोध करून मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

स्वातंत्र्य व समानतेचे समर्थक असलेल्या श्री. देवेगौडा यांना 1975-76 मध्ये केंद्र सरकारच्या नाराजीचा सामना करावा लागला एवढेच नव्हे तर त्यांना आणीबाणीच्या काळात अटकही करण्यात आली. श्री. देवेगौडा यांनी ह्या काळाचा उपयोग अभ्यासात घालवला ज्यायोगे त्यांना आपल्या ज्ञानाचा प्रसार करता येईल. त्यांचा अभ्यास तसेच यादरम्यान तुरुंगात बंद असताना भारतीय राजकारणातील अन्य दिग्गज नेत्याशी झालेल्या चर्चांमधून त्यांच्या व्यक्तिमत्त्व व दृष्टीकोनात बदल घडून आला. तुरुंगातून सुटून आल्यानंतर ते एक परिपक्व व दृढनिश्चयी व्यक्ती म्हणून समोर आले.

1991 मध्ये हसन लोकसभा मतदार संधातून ते खासदार म्हणून निवडून आले. श्री. गौडा यांनी राज्यांच्या व विशेषत्वाने शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या निवारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी शेतकऱ्यांच्या दुर्दशेबाबत संसदेमध्ये मांडलेल्या परखड विचारांसाठी सगळ्यांची प्रशंसा मिळवली. संसद व संसदेच्या इतर संस्थांचे पावित्र्य व सन्मान राखल्याबद्दलही त्यांनी नावलौकिक प्राप्त केला. श्री. देवेगौडा दोनदा राज्य पातळीवर जनता पक्षाचे अध्यक्ष बनले. 1994 मध्ये ते जनता दलाचे अध्यक्ष बनले. 1994मध्ये राज्यामध्ये जनता दलाला मिळालेल्या विजयाचे ते सूत्रधार होते. ते जनता दलाचे नेते म्हणून निवडून आले व 11 डिसेंबर 1994 रोजी ते कर्नाटकाचे 14 वे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर त्यांनी रामनगर मतदार संघातून निवडणूक लढवली व प्रचंड बहुमताने विजय संपादन केला.
राजकारणातील अनुभव तसेच तळागाळातील लोकांपर्यंत असलेल्या संपर्कामुळे त्यांना राज्याला भेडसावणाऱ्या समस्या सोडवताना मदत झाली. हुबळीच्या इदगाह मैदानाचा मुद्दा उठवला त्यावेळी त्यांच्या चाणाक्ष राजकीय बुद्धीची पुन्हा एकदा प्रचीती आली. हे मैदान अल्पसंख्याक समुदायाचे होते ज्याचा वापर नेहमीच राजकीय विवादांसाठी केला गेला होता. श्री. देवेगौडा यांनी यशस्वीपणे या मुद्यावर तोडगा काढला. जानेवारी 1995 मध्ये श्री. गौडा स्वित्झर्लंड दौऱ्यावर गेले असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रज्ञांच्या परिषदेत सहभाग घेतला होता. युरोपीय तसेच मध्य पूर्व देशांमधील त्यांचे दौरे ते एक समर्पित राजनेते असल्याचे दाखले देतात. श्री. गौडा यांनी आपल्या सिंगापूरच्या दौऱ्या दरम्यान राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक परकीय गुंतवणूक राज्यात आणली ह्यावरून त्यांच्या व्यावसायिक चाणाक्ष बुद्धीचा प्रत्यय येतो.
सत्तरीच्या दशकात राजकारण व त्याच्याशी निगडीत प्रक्रियांमध्ये त्यांनी मिळवलेली एकहाती पकड त्यांच्या मित्र तसेच शत्रूंच्या चर्चेचा विषय ठरली. श्री. गौडा यांच्या मते त्यांचे राजकारण हे लोकांसाठी असून लोकांच्या सान्निध्यात तसेच त्यांच्यासाठी काहीतरी करण्यात त्यांना आनंद मिळतो.

1989 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये जनता दलाला 222 मधील केवळ 2 जागांवर यश मिळाले हा पक्षाचा कडवा पराभव होता. श्री. गौडा यांच्यासाठी ही कारकीर्दीतील पहिलीच मोठी हार होती, त्यांनी लढवलेल्या दोन्ही जागांवर त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
या पराभवाने त्यांना आपली गमावलेली प्रतिष्ठा आणि सत्ता परत मिळवण्यासाठी व आपली राजकीय शैली तपासून पाहण्यासाठी प्रेरित केले. त्यांनी दिल्ली व कर्नाटक येथील आपल्या प्रतिस्पर्ध्यांसोबत असलेले कटू संबध दूर सारत त्यांच्या सोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. सरळमार्गी आयुष्य जगणारे प्रभावी व्यक्ती म्हणून गौडा यांची ओळख आहे.

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ते बांधकामासंबंधित छोटी कामे घेणारे ठेकेदार होते. सात वर्ष अपक्ष म्हणून काम केल्यामुळे त्यांना पक्षीय राजकारण समजून घेण्यास मदत झाली. आपल्या कामामध्ये चिकाटी असलेले श्री. गौडा विधिमंडळ ग्रंथालयात पुस्तके व नियतकालिके वाचण्यात रममाण होत असत. 1967मध्ये फेर निवडणुकीत यश संपादन केल्यावर त्यांना गमावलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त झाला. 1969 मध्ये काँग्रेस पक्षाचे विभाजन झाल्यानंतर ते निजलिंगप्पा यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी काँग्रेस (ओ) पक्षात सहभागी झाले. 1971 मधील काँग्रेस(ओ)च्या पराभवाने त्यांना मोठी संधी प्राप्त करून दिली. जेव्हा संपूर्ण देशात इंदिरा गांधीची लाट होती तेव्हा ते सशक्त विरोधी पक्ष नेते म्हणून नावारूपाला आले.

श्री. देवेगौडा व श्रीमती. देवाम्मांचे सुपुत्र असलेले श्री. देवेगौडा यांना आपल्या कौटुंबिक शेतकरी पार्श्वभूमीचा अभिमान वाटतो. देवगौडांना अचानकपणे तिसऱ्या आघाडीचे(प्रादेशिक पक्ष व बिगर काँगेस व बिगर भाजप युती) नेतृत्व करण्याची संधी मिळाली ज्यामुळे ते पंतप्रधान पदापर्यंत जाऊ शकले.
30 मे 1996 रोजी देवेगौडा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन भारताचे 11 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...