Thursday, 7 April 2022

पानवळ रेल्वे पूल

पानवळ रेल्वे पूल:
.
कोकण रेल्वेवरील पानवळ पूल हा एक अभियांत्रिकी चमत्कार आहे.


पानवळ रेल्वे पूल:
.. हा पूल कोकण रेल्वेवरील रत्नागिरी आणि निवसर या दोन स्थानकांदरम्यान पानवळ नदीवर बांधला आहे. रत्नागिरी स्थानकापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या पुलाची लांबी सुमारे 360 मीटर्स आणी उंची 64 मीटर आहे. सर्वसाधारणपणे इतक्या लांब पुलाच्या निर्माणासाठी अनेक गर्डर्स वापरले जातात; परंतु पानवळ पुलाच्या निर्मितीसाठी केवळ एक सलग गर्डर बनविला गेला. हा गर्डर इंक्रीमेंटल लॉंचिंग या पद्धतीने पुलाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत लॉंच केला गेला. या गर्डर लॉंचिंगचा वेग सुमारे दोन फूट प्रती तास एवढा होता. अशाप्रकारचे गर्डर लॉंचिंग तंत्र भारतीय रेल्वेत पहिल्यांदाच वापरण्यात आले. या पुलाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे याचा एक पिअर कुतुब मिनारपेक्षाही उंच आहे. या पुलावरून खाली पाहिले, तर जीप आगपेटीएवढी दिसते. या पुलावरून शंभर किलोमीटर प्रती तास वेगाने धावणारी गाडी पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. हिरव्यागार पर्वतांनी वेढलेल्या पानवळ पुलाखालून वाहणारे पानवळ नदीचे पात्र पुलावरून खूपच सुंदर दिसते. या पुलाची भौगोलिक स्थिती अशी आहे, की येथे वाऱ्याचा वेग धोकादायक पातळीपर्यंत जाऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन या पुलावर वाऱ्याचा वेग सतत मोजण्यासाठी ऍनॉमिमीटर बसविण्यात आले आहे. वाऱ्याचा वेग साठ किलोमीटर प्रतितासापेक्षा अधिक झाल्यास, गाडी निवसर आणि रत्नागिरी स्थानकावर थांबविण्यासाठी विशेष प्रणाली बसविण्यात आली आहे. रत्नागिरी ते हातखंबा रस्त्यावर पानवळ फाट्यावरून पानवळ पुलापर्यंत पोचता येते. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात हा पूल पाहायला जाऊ शकतो.

No comments:

Post a Comment