Monday, 25 April 2022

देश छद्मबुद्धी विध्वंसकांच्या ताब्यात!; ९५व्या साहित्य संमेलनाचे उदगीर येथे उद्घाटन.

🐠काळ मोठा कठीण आला आहे. आपण आत्यंतिक अशा भ्रमयुगामध्ये प्रवेश केला आहे. आता पुढच्या टप्प्यात हळूहळू आपण छद्मबुद्धी विध्वंसकांच्या ताब्यात जातोय.

🐠 हे विध्वंसक आपल्या पुढील पिढीच्या हातात भिकेचा कटोरा देतील, अशा परखड शब्दात ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कांदबरीकार भारत सासणे यांनी विभाजनवादी नवसंस्कृतीवर कडाडून प्रहार केला.

🐠उदगीर येथे आयोजित साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी सासणे बोलत होते. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन टप्प्यांत सासणे यांनी आपली अध्यक्षीय भूमिका मांडली.

🐠ते म्हणाले, लोकांना थाळी वाजवताना बघून लेखक, विचारवंत आणि विचारी माणूस चिंतेत पडला. समाजात विभाजनवादी निर्थक, पण अनर्थकारी, उत्तेजन वाढवणारा खेळ मांडला जात आहे. कला विभाजित झाली आहे. सर्वत्र उपद्रव आणि उन्मादाचा उच्छाद सुरू आहे.

🐠विदूषकाच्या हातात अधिकार केंद्रित होत आहेत. सर्वत्र तडे बसवणारी शांतता आहे, कोणीच बोलत नाही, सर्वत्र चतुर मौन पसरले आहे. या मौनात स्वार्थ आहे, तुच्छता आहे, हिशेब आणि व्यवहारदेखील आहे.

🐠 याच बरोबरीने सामान्य जनतेच्या दु:खाला चिरडणे आहे, भीती, दहशत, प्रलोभने आणि विनाशदेखील आहे, याकडे सासणे यांनी प्रकर्षांने लक्ष वेधले.

No comments:

Post a Comment