🎨नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांच्या उड्डाणावर असलेल्या स्थगितीची मुदत ‘पुढील आदेशापर्यंत’ वाढवण्यात आली असल्याचे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सोमवारी सांगितले. यापूर्वी १९ जानेवारीला या स्थगितीला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
🎨करोना महासाथीच्या फैलावानंतर भारतात २३ मार्च २०२० पासून नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा स्थगित करण्यात आली आहे. तथापि, काही देशांसोबत करण्यात आलेल्या करारानुसार (एअर बबल अरेंजमेंट) भारत आणि सुमारे ४५ देशांदरम्यान जुलै २०२० पासून विशेष प्रवासी सेवांचे संचालन होत आहे.
🎨‘भारतातून जाणाऱ्या व भारतात येणाऱ्या नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी सेवांवरील स्थगितीची मुदत पुढील आदेशापर्यंत वाढवण्याचा निर्णय सक्षम प्राधिकरणाने घेतला आहे. हे निर्बंध आंतरराष्ट्रीय मालवाहतूक विमान सेवा आणि डीजीसीएने खास करून मंजुरी दिलेल्या उड्डाणांना लागू होणार नाहीत’, अ्से डीजीसीएने सोमवारी जारी केलेल्या एका परिपत्रकात म्हटले आहे.
🎨एअर बबल व्यवस्थेंतर्गतच्या विमानोड्डाणांवर याचा काही परिणाम होणार नसल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. १५ डिसेंबर २०२१ पासून भारत नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा पुन्हा सुरू करेल, असे डीजीसीएने २६ नोव्हेंबर २०२१ ला जाहीर केले होते.
🎨दुसऱ्याच दिवशी, करोनाच्या ओमायक्रॉन या उपप्रकाराच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचा फेरविचार करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालय व डीजीसीए यांना केले होते. यानंतर, या विमानसेवेवरील स्थगिती किती काळ कायम राहील याचा उल्लेख न करता डीजीसीएने १ डिसेंबर २०२१ रोजी आपला २६ नोव्हेंबरचा निर्णय फिरवला होता.
No comments:
Post a Comment