Wednesday, 9 March 2022

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा - रिदम-अनिष जोडीला सुवर्ण .

🪀भारताच्या रिदम सांगवान आणि अनिष भानवाला या जोडीने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत अखेरच्या दिवशी २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक आपल्या नावे केले.

🪀सोमवारी रिदम-अनिष या जोडीने सुवर्णपदकाच्या लढतीत थायलंडच्या पादुका चाविसा आणि राम खांहाएंग या जोडीला १७-७ अशी धूळ चारली. त्यांच्या या कामगिरीमुळे विश्वचषकाअखेरीस भारताने चार सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशा सात पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

🪀रिदम-अनिष या जोडीने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक गटातील पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत ४०० पैकी ३७० गुणांसह दुसरे स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. थायलंडच्या चाविसा आणि खांहाएंग जोडीने ३८१ गुणांसह अग्रस्थान कमावले होते. मात्र, सुवर्णपदकाच्या लढतीत त्यांना या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात अपयश आले. भारताच्या इशा सिंग आणि भावेश शेखावत या जोडीनेही पात्रतेची दुसरी फेरी गाठली होती; परंतु त्यांना ३५६ गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

🪀त्याआधी भारताने पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. सुवर्णपदकाच्या लढतीत जर्मनीच्या ख्रिस्टियन रित्झ, गेस ऑलिव्हर आणि पीटर फ्लोरियन या त्रिकुटाने भारताच्या गुरप्रीत सिंग, अनिष आणि भावेश शेखावत या त्रिकुटावर मात केली. कैरो येथे झालेल्या या विश्वचषकात ६० देशांच्या ५०० हून अधिक नेमबाजांचा सहभाग होता. एकूण २२ देशांना या स्पर्धेत पदक जिंकण्यात यश आले. गुणतालिकेत भारताने चार सुवर्णपदकांसह अव्वल, नॉर्वेने तीन सुवर्णपदकांसह (एकूण सहा पदके) दुसरा, तर फ्रान्सने तीन सुवर्णपदकांसह तिसरा क्रमांक पटकावला.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...