🧩युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी अमेरिका, ब्रिटनसह युरोपीय महासंघाने निवडक रशियन बँकांना ‘स्विफ्ट’ या जागतिक आर्थिक संदेश प्रणालीतून हद्दपार करण्याबरोबरच रशियाच्या मध्यवर्ती बँकेवर प्रतिबंधात्मक निर्बंध लादले. या कठोर निर्बंधांमागे रशियाची अर्थक्षमता नियंत्रित करून युद्धाचा अर्थपुरवठा खंडित करण्याचा अमेरिका आणि मित्रराष्ट्रांचा हेतू आहे.
🧩अमेरिका, ब्रिटन, युरोपीय महासंघ आणि कॅनडाने रशियावरील आर्थिक निर्बंधांना मान्यता दिल्यानंतर काही रशियन बँकांना ‘स्विफ्ट’मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. रशियाच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख भाग असलेली ‘तेल आणि वायू निर्यात’ ‘स्विफ्ट’वर अवलंबून आहे. त्यामुळे या निर्बंधांचा रशियाला मोठा फटका बसेल, असा अंदाज आहे.
🧩‘स्विफ्ट’ ही जगातील मुख्य बँकिंग संदेश सेवा आहे. भारतासह २००हून अधिक देशांमधील सुमारे ११ हजार बँका आणि वित्तसंस्थांना ती सेवा पुरवते. ही प्रणाली जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदेशवहनात केंद्रस्थानी असल्याने रशियाला गंभीर आर्थिक परिणामांचा सामना करावा लागेल, असे सांगण्यात येते.
🧩रशियन सैन्याचे युक्रेनवर हवाई हल्ले सुरू असताना मित्रराष्ट्रांनी शनिवारी कठोर आर्थिक निर्बंधांचा निर्णय घेतला. त्यानुसार रशियाच्या मध्यवर्ती बँकेच्या काही मालमत्ताही गोठवल्या जाणार आहेत. त्यामुळे परदेशातील राखीव अर्थसाठे मिळवण्याच्या रशियाच्या क्षमतेवर अंकुश येईल. मित्रराष्ट्रांनी घातलेल्या निर्बंधांचा प्रभाव कमी करण्यासाठी रशिया युद्धासाठी पैसा वापरणे थांबवेल, असा या निर्बंधांमागील हेतू आहे.
No comments:
Post a Comment