Wednesday, 12 January 2022

नेदरलँड, चिलीसारख्या देशांपेक्षाही मराठवाडय़ातील प्राणवायू क्षमता अधिक

🔰पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत प्राणवायूचा तुटवडय़ाचे चित्र होते पण आता मराठवाडय़ात प्राणवायू निर्मितीचे समान लोकसंख्या असणाऱ्या नेदरलँड, बेल्जियम, चिली, कझाकीस्थान या देशापेक्षाही अधिक आहे. पहिल्या लाटेत ८० मे. टन प्राणवायू लागला. तेव्हा साठवण क्षमता खूप कमी होती. दुसऱ्या लाटेत २२० मे. टन प्राणवायू लागला. तेव्हाही २५० मेट्रीक टनाची क्षमता होती. आता तिसऱ्या लाटेपूर्वी प्राणवायू साठवणूक व निर्मितीची क्षमता  ८४५ मे टन एवढी असून ती १ हजार २९६ पर्यंत वाढेल असे सांगण्यात येत आहे.

🔰ही सारी यंत्रणा उभी करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर खास पुढाकार घेत आठ जिल्हाधिकाऱ्यांना कामाला लावले. साखर कारखान्यासह, स्टील उद्योगात तसेच वीज निर्मिती प्रकल्पातही प्राणवायू प्रकल्प उभे करण्यात आले. किनवटसारख्या आदिवासी व दुर्गम भागात आता प्राणवायू साठवणुकीची क्षमता उभी करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

🔰करोनाची पहिली लाट आली होती तेव्हा पीपीई किटपासून ते औषधांचीही कमतरता होती. दुसऱ्या लाटेत प्राणवायूसाठी होणारी धावपळ तर महाराष्ट्रात सर्वानी पाहिली. त्यानंतर प्राणवायू प्रकल्प कुठे आणि कसे सुरू करता येतील याचे दौरे सुरू करण्यात आले. स्वत: विभागीय आयुक्तांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. काही वेळा युद्धजन्यस्थितीसारखी कामे करुन घेण्यात आली. मराठवाडय़ाची लोकसंख्या साधारणत: दोन कोटी आहे. एवढीच लोकसंख्या असणाऱ्या अन्य देशात किती प्राणवायू साठवणूक याचा अंदाजही मराठवाडय़ातील अधिकारी घेत होते. 

🔰मराठवाडय़ातील शेवटच्या टोकांच्या गावात प्राणवायू पोहचविण्यासाठी नांदेड व परभणी जिल्हाधिकाऱ्यांना बऱ्याच खटपटी कराव्या लागल्या होत्या. हैदराबाद व कर्नाटकातूनही प्राणवायूचे टँकर मागवावे लागले होते. तेव्हापासून प्राणवायू साठवणूक क्षमता व निर्मिती वाढविण्यावर जोर दिला जात होता.

🔰मराठवाडय़ातील शहराच्या आकारानुसार गरज ओळखून प्राणवायू प्रकल्प उभारण्यात आले आहेत. आता त्यात पुरेसा प्राणवायूही साठवणूक करण्यात आला आहे. तिसरी लाट आली तर प्राणवायूची गरज असणाऱ्या रुग्णांसाठी पुन्हा धावपळ करावी लागण्याची शक्यता कमी असल्याचा दावा केला जात आहे.

No comments:

Post a Comment