Monday, 20 December 2021

CSAT मधील खात्रीशीर गुण मिळवून देणारा घटक म्हणजे 'निर्णय क्षमता व समस्या निराकरण

● सी सॅट मधील हमखास गुण मिळवून देणारा घटक म्हणजे निर्णय निर्धारण व समस्या समाधान.  एकूण १२.५ गुणांसाठी ५ प्रश्न या विभागात विचारले जातात. या प्रश्नांना नकारात्मक गुण दिले जात नाहीत. त्यामुळे चांगला स्कोअर करायचा असेल तर अधिकाधिक समर्पक उत्तरे देऊन जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे प्रश्न सोडविताना पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.

●  प्रश्न लक्षपूर्वक वाचून नेमकी समस्या समजून घ्यावी. प्रसंगातील पुढील महत्त्वाच्या ठळक बाबी लक्षात घ्याव्यात — प्रसंगातील नेमकी समस्या मांडणारे मुद्दे, संवेदनशीलतेने हाताळायचे मुद्दे, संबंधित व्यक्ती वा व्यक्तिगटांचे हितसंबंध, असल्यास वर्णन केलेल्या शक्यता, दिले असल्यास सामाजिक/ सांस्कृतिक/ आर्थिक/ राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचे मुद्दे.

●  या प्रसंगातील तुमची नेमकी भूमिका कोणती आहे ते लक्षात घ्यावे. कोणतीही भूमिका स्पष्टपणे तुम्हाला दिलेली नसेल तर एक सुजाण नागरिक म्हणून योग्य निर्णय घेणे तुमच्याकडून अपेक्षित आहे हे समजून घ्यावे.

प्रसंगातील सर्वात कच्चा व मजबूत पक्ष कोणता ते लक्षात घ्यावे. राज्यघटनेतील तरतुदी व तत्त्वज्ञान, सर्वसाधारण नैतिकता व नैसर्गिक न्याय, निर्बल समाजघटकांविषयी तसेच पर्यावरणीय संवेदनशीलता यांच्या आधारे समतोल दृष्टिकोन व तटस्थता ठेवून याबाबतचे मूल्यमापन करावे.

●  दिलेले सर्व पर्याय व्यवस्थित वाचून घ्यावेत. वरील मूल्यमापनाच्या आधारे पूर्णपणे असंवेदनशील, बेजबाबदार, टोकाचे पर्याय बाद करावेत.

●  यानंतर योग्य वाटणाऱ्या पर्यायांच्या योग्यतेची श्रेणी ठरवावी. आपण निवडलेल्या उत्तराला तुलनात्मकरीत्या किती गुण मिळू शकतील याचा अंदाज येण्यासाठी पर्यायांचे श्रेणीकरण करण्याची सवय उपयोगाची ठरते.

●  पर्यायांची श्रेणी ठरवताना तुमच्या भूमिकेच्या अनुषंगाने पर्यायांमधील आवश्यकता, व्यवहार्यता विचारात घ्यावी. आवश्यक वाटू शकला तरी व्यवहार्य नसलेला पर्याय बाजूला ठेवावा. त्यानंतर असा पर्याय अमलात आणण्याचे अधिकार तुमच्याकडे आहेत का हे तपासावे. अशी अधिकारिता नसेल तर तो पर्याय योग्य असला तरी तुम्ही अमलात आणू शकत नसल्याने त्याची श्रेणी त्या भूमिकेपुरती कमीच गृहीत धरायला हवी. अशा श्रेणीकरणातून जास्तीत जास्त योग्य पर्यायापर्यंत पोचण्यास मदत होते.

●  उरलेल्या पर्यायातून जास्तीत जास्त सकारात्मक आणि बहुतांश हितसंबंधीयांना मान्य होऊ शकेल असा पर्याय शोधावा. असे दोन पर्याय आढळले तर जास्त दूरगामी परिणाम करणारा, कायमस्वरूपी तोडगा सांगणारा पर्याय निवडावा.

No comments:

Post a Comment