Tuesday, 5 July 2022

पॉलिटी या विषयाची शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये कशी तयारी कराल??

⭕️ पॉलिटी या विषयाला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये पंधरा प्रश्न विचारले जातात पैकी किमान बारा प्रश्न हे कोअर पॉलिटी वर असतात तर एखादा दुसरा प्रश्न हा पंचायत राज या घटका वरून पडतो. 2018 पर्यंत चे पेपर पाहता आयोगाचा ट्रेंड सोपा वाटतो परंतु 2019 आणि 2020 मधील पूर्व परीक्षांमध्ये आयोगाने लांबलचक व अवघड प्रश्न विचारल्यावर भर दिलेला आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच प्रश्नांचा दर्जा मध्यम कठीण आणि वेळखाऊ असेल अशी मनाची तयारी आपण करून ठेवायला हवी.



⭕️ सपूर्ण पॉलिटी आता इथून पुढे उजळणी करणे शक्य नाही त्यामुळे नेमक्या घटकांचा अभ्यास आपण करायला हवा. उदाहरणार्थ संसद राष्ट्रपती निवडणूक आयोग राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय आणीबाणी केंद्र-राज्य संबंध या घटकांवर आयोग सातत्याने प्रश्न विचारत आहे. त्यामुळे हे घटक आपण पुन्हा पुन्हा मूळ पुस्तकातुन वाचणे फायदेशीर ठरेल.



⭕️ इतर काही घटक जसे की दुय्यम न्यायालये, लोकपाल, भारताचे महालेखापाल व महा नियंत्रक, महाधिवक्ता व महान्यायवादी अशा निवडक घटकांचे महत्त्व जरी अनन्यसाधारण असले तरी त्यांचे पाठांतर करणे तुलनेने सोपे असते. त्यामुळे या घटकांना शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये वेळ न देता तो वेळ मागे उल्लेख केलेल्या घटकांसाठी वापरता येईल. 



⭕️ याव्यतिरिक्त महत्वाची कलमे, table of precedence , घटनादुरुस्त्या यासारख्या गोष्टी देखील विसरून चालणार नाहीत. कमी वेळेत आणि कमी कष्टात आपल्याला गुण मिळवून देण्यासाठी हे घटक अत्यंत किफायतशीर ठरतात. त्यामुळे परिक्षेला जाण्याच्या आदल्या दिवशी या घटकांवर नजर फिरविणे अनिवार्य आहे.



⭕️ पचायत राज या घटकावर ती एक ते तीन प्रश्न पडू शकतात. त्यामुळे इतक्या थोड्या गुणांसाठी भरपूर वेळ खर्ची पाडणे बिलकुल अपेक्षित नाही. तुम्ही आज पर्यंत तयार केलेल्या नोट्स अथवा बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही नोट्स वापरून तुम्ही हे दोन तीन गुण सहज मिळू शकतात. किशोर लवटे सरांच्या पंचायतराज पुस्तकाच्या मागे शॉर्ट नोट्स दिलेल्या आहेत त्याचादेखील तुम्ही वापर करू शकता. 



❇️ पॉलिटी हा पूर्व परीक्षांमधील सर्वाधिक आउटपुट देणारा विषय आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये या विषयांमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये वीसपेक्षा कमी गुण मिळणे अपेक्षित नाही. आयोगाच्या पूर्वीच्या प्रश्नांचा जोरदार अभ्यास आणि लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून केलेले वाचन यांच्या जोरावर 12 ते 15 प्रश्न आपण बरोबर सोडवू शकतो. त्यामुळे या विषयाकडे व्यवस्थित लक्ष देऊन याचे नियोजन करावे.


धन्यवाद..

No comments:

Post a Comment