Monday 15 November 2021

२०३० पर्यंत चीनकडे असतील तब्बल एक हजार अण्वस्त्र, अमेरिकेने सादर केला अहवाल



🔰जपानला मागे टाकत चीन जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाला आहे. आता जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेशी टक्कर देण्याचा प्रयत्न चीन करत आहे. व्यापार, उद्योग, अवकाश तंत्रज्ञान, खेळ, संशोधन, विज्ञान, वहातुक अशा विविध क्षेत्रात चीन अमेरिकेवर कुरघोडी करत जगावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये संरक्षण क्षेत्रही मागे नाहीये. चीन गेल्या दोन दशकांपासून वेगाने संरक्षण क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.


🔰असं असतांना अमेरिकेच्या संरक्षण विभागाने चीनच्या लष्करी तयारीबाबत खास करुन अण्वस्त्र क्षमतेबाबत एक अहवाल तयार केला आहे. यानुसार चीनकडे २०३० पर्यंत एक हजार अण्वस्त्र असतील असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. याआधी चीनकडे सुमारे ३५० अण्वस्त्रे असावीत असा एक अंदाज होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून चीनचे लष्करी सामर्थ्य वाढत असून २०३० पर्यंत एक हजार अणु बॉम्ब तयार करण्याची क्षमता चीनकडे झालेली असेल असं या अहवालात म्हंटलं आहे.


🔰चीनकडे जमिनवरुन जमिनीवर मारा करणारी, पाण्याखालून पाणबुडीतून जमिनीवर मारा करणारी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. तसंच दीर्घ पल्ला असलेली बॉम्बफेकी विमानेही चीनकडे तयार होत आहेत.


🔰एवढंच नाही तर लष्कर, लढाऊ विमाने, युद्धनौका, पाणबुडी यांमध्ये लक्षणीय वाढ चीन दरवर्षी करत आहे. यामुळेच जास्तीत जास्त अण्वस्त्र वाहून नेता येतील, वेळप्रसंगी हल्ला करता येईल अशी क्षमता चीनची तयार होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अण्वस्त्रासाठी आवश्यक असलेल्या प्लुटोनियमच्या निर्मितीकडे चीनकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. यासाठी आवश्यक असलेल्या ‘फास्ट ब्रीडर रिएक्टर’ प्रकारातील अणुभट्टीबाबत मोठी गुंतवणूक चीन करत आहे.

No comments:

Post a Comment