भारत आणि चीन यांच्या संबंधांचा सध्या सर्वात कटुकाळ आहे. चीनने करारांचे उल्लंघन करणाऱ्या काही कृती केल्या आहेत, ज्यासाठी त्याच्याकडे कुठलेही विश्वासार्ह स्पष्टीकरण नाही. आपल्याला द्विपक्षीय संबंध कुठे न्यायचे आहेत याचे उत्तर आता चिनी नेतृत्वालाच द्यायचे आहे, असे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी सांगितले.
शांतता राखण्यासाठी पूर्व लडाखमधील सैन्यमाघारीच्या प्रक्रियेची प्रगती आवश्यक असून, सर्वंकष द्विपक्षीय संबंधांच्या विकासाचा तो आधार आहे, असे भारताने चीनला सांगितले आहे.
पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील उर्वरित मुद्द्यांवर लवकर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय करारांचे पूर्णपणे पालन करून काम करायला हवे, यावर जयशंकर यांनी १६ सप्टेंबरला ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बेमध्ये आपले चिनी समपदस्थ वांग यी यांच्यासोबत झालेल्या यापूर्वीच्या बैठकीत भर दिला होता.
‘आपले संबंध नक्की कसे आहेत आणि त्यात काय योग्य घडलेले नाही याबद्दल चीनला काही शंका असेल असे मला वाटत नाही. माझे समपदस्थ वांग यी यांना मी अनेकदा भेटलो आहे. तुम्ही अनुभव घेतलाच असेल, की मी पुरेसा स्पष्ट बोलतो आणि त्यात काही संदिग्धता नसते.
त्यामुळे त्यांना ऐकायची इच्छा असेल तर त्यांनी ते ऐकले असेल याची मला खात्री आहे,’ असे ‘ग्रेटर पॉवर कॉम्पिटिशन : दि इमर्जिंग वर्ल्ड ऑर्डर’ या विषयावर सिंगापूरमधील ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमिक फोरम येथे आयोजित करण्यात आलेल्या गटचर्चेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात जयशंकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment