Friday, 12 November 2021

राष्ट्रीय शिक्षण दिन : देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची आज जयंती


⚡️ अविद्येने किती अनर्थ होतात हे महात्मा फुले यांनी केव्हाच सांगून ठेवले आहे. तेव्हापासून शिक्षणाची महती अनेक थोरामोठ्यांनी सांगितलेली आहे. भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद हे सच्चे राष्ट्रभक्त आणि महान शिक्षणतज्ञ होते. त्यांचा जन्मदिवस 11 नोव्हेंबर दरवर्षी भारतात राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा होतो.

💁‍♂️ सन 2008 पासून हा दिवस साजरा करण्याचा निर्णय तेव्हाच्या केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने घेतला होता. मौलाना आझाद यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान बहुमोल आहे. त्यांनी विद्यापीठ आयोग, साहित्य अकादमी आणि संगीत अकादमीची स्थापना केली. या संस्थांनी आतापर्यंत भारताच्या शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अजूनही प्रतिष्ठित संस्था म्हणून त्यांना मान आहे.

🧐 दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रातील घडामोडी, देशाच्या विकासात शिक्षण क्षेत्राचे योगदान, शैक्षणिक धोरणात आवश्यक बदल, आव्हाने, उपाययोजना याविषयी चर्चा होते. साक्षरता आणि शिक्षणाचा प्रसार हे ध्येय केंद्रस्थानी ठेवून ते साध्य करण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जातो.

👨‍🏫 विशेषतः स्त्रियांसाठी शिक्षणाच्या सुविधा, प्रत्येकाला प्राथमिक शिक्षण अनिवार्य, व्यावसायिक अभ्यासक्रमांचे महत्त्व, लहान मुलांना मोफत शिक्षण, तंत्र शिक्षणासाठी माफक शुल्क अशा अनेक उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न व्हावा असा उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे आहे.

📍 शिक्षण हा माणसाच्या मूलभूत हक्कांपैकी एक आहे. राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त या हक्काची जाणीव सर्वांना व्हावी. शिक्षणानेच विकासाच्या संधीचे दार खुले होते, तेव्हा त्या दिशेने पावले पडावी.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...