Friday, 15 October 2021

अल्फ्रेड नोबेल कोण होते?

21 ऑक्टोबर 1833ला अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म स्वीडनमधल्या स्टॉकहोममध्ये झाला. त्यांचे वडील इमॅन्युएल नोबेल हे पेशाने इंजिनियर आणि संशोधक होते. त्यांनी स्टॉकहोममध्ये अनेक ब्रिज आणि इमारती बांधल्या होत्या.

अल्फ्रेड हे रशियामध्ये लहानाचे मोठे झाले. फ्रान्स आणि अमेरिकेमध्ये त्यांनी रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञानाचं शिक्षण घेतलं.

अल्फ्रेड नोबेल यांचा विविध भाषांमध्ये हातखंडा होता. वयाच्या 17व्या वर्षी त्यांना स्विडीश, रशियन, फ्रेंच, इंग्लिश आणि जर्मन या भाषा येत होत्या.

ते कविता रचत आणि नाटकंही लिहीत. साहित्य, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रात त्यांना रस होता.

सामाजिक आणि शांततेशी संबंधित घडामोडींमध्ये नोबेल यांना रस होता. आणि त्यांची मत त्या काळासाठी प्रागतिक होती.

डायनामाईटचा शोध अल्फ्रेड नोबेल यांनी लावला होता.

नोबेल यांनी आपल्या मृत्यूपत्राद्वारे तब्बल 26.5 कोटी डॉलर्सची संपत्ती जागतिक पातळीवरचे पुरस्कार स्थापन करण्यासाठी दान केली.

त्यांनी त्यांची बहुतांश संपत्ती या पुरस्कारांसाठी दिल्याने त्यांच्या कुटुंबीयांचा तेव्हा नोबेल पुरस्कारांना विरोध होता.

त्यांच्या मृत्यूच्या तब्बल 5 वर्षांनी 1901मध्ये पहिल्यांदा नोबेल पुरस्कार देण्यात आले. रेड क्रॉसच्या हेन्री डनंट यांना पहिलं नोबेल मिळालं.

कोणत्या क्षेत्रांत नोबेल पुरस्कार दिले जातात?

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रातल्या कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार देण्यात येतात. या सगळ्या क्षेत्रांमध्ये अल्फ्रेड नोबेल यांना प्रचंड रस होता.

आधीच्या 12 महिन्यांमध्ये ज्यांनी मानवजातीसाठी अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे, अशांचा सन्मान या पुरस्काराने करण्यात येतो.

नोबेल यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहीलं आहे, "prizes to those who, during the preceding year, have conferred the greatest benefit to humankind" म्हणजेच आधीच्या वर्षभरात मानवजातीसाठी महत्त्वाचं ठरणारं काम करणाऱ्यांना हे पुरस्कार देण्यात यावेत.

या पुरस्कारांमध्ये स्वीडनच्या सेंट्रल बँकेने 1968 मध्ये अर्थशास्त्राच्या पुरस्काराची भर टाकली. पण याला नोबेल पुरस्कार म्हटलं जात नाही. अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.

No comments:

Post a Comment