🔰कोकण रेल्वेनंतर या प्रदेशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वाचा टप्पा ठरू शकणाऱ्या सिंधुदुर्ग विमानतळाचे स्वप्न सुमारे पाव शतकाच्या सर्वपक्षीय पाठपुराव्यानंतर शनिवारी साकार होत आहे.
🔰 क. मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस आणि रामकृष्ण हेगडे यांच्या प्रयत्नांतून १९९६-९७ मध्ये कोकणात रेल्वे गाडी धावू लागली त्याच सुमारास या भागातील काँग्रेसचे तत्कालीन खासदार मेजर सुधीर सावंत यांनी येथे विमानतळ व्हावा, म्हणून प्रयत्न सुरू केले. तेव्हा केंद्रात सत्तेवर असलेल्या काँग्रेस आघाडीच्या सरकारमधील नागरी हवाई वाहतूकमंत्री कै. माधवराव शिंदे यांना भेटून त्यांनी या प्रकल्पासाठी गळ घातली. त्यावेळी मेजर सावंत अखिल भारतीय काँग्रेस समितीचे चिटणीस होते. त्यामुळे दिल्लीत त्यांचे वजन होते.
🔰गोव्यातील दाभोळी विमानतळ त्या वेळी नौदलाच्या ताब्यात असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यास या ठिकाणी गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला फायदा होईल, असे मेजर सावंत यांनी तत्कालीन हवाईमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर शिंदे यांनी १९९५ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची हवाई पाहणी केली आणि १९९६ मध्ये राज्यातील तत्कालीन युती सरकारच्या धोरणानुसार सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा करण्याबरोबरच येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत केंद्रीय पातळीवरून चाचपणी सुरू झाली.
🔰तयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्या विमानतळ झालेल्या चिपी-परुळे भागात जागा पाहण्यासाठी समिती नेमण्यात आली आणि या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली, अशी माहिती सावंत यांनी दिली. योगायोगाचा भाग म्हणजे, माधवराव शिंदे यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य शिंदे सध्या त्याच नागरी हवाई वाहतूक खात्याचे मंत्री या नात्याने या विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत.
No comments:
Post a Comment