Friday, 15 October 2021

दिव्या देशमुख महाराष्ट्राची सर्वात युवा ‘महिला ग्रँडमास्टर’

🔰महाराष्ट्राची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने भारताची २२वी ‘महिला ग्रँडमास्टर’ ठरण्याचा मान पटकावला. १६ वर्षीय दिव्याने महाराष्ट्राची सर्वात युवा ‘महिला ग्रँडमास्टर’ ठरतानाच आंतरराष्ट्रीय मास्टरचा दुसरा निकषही (नॉर्म) प्राप्त केला आहे.

🔰हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दिव्याने अप्रतिम कामगिरी केली. तब्बल १९ महिन्यांनंतर प्रत्यक्षात बुद्धिबळाच्या पटावर खेळणाऱ्या दिव्याने (एलो २३०५ गुण) ‘महिला ग्रँडमास्टर’ किताबासाठी आवश्यक सर्व निकष पूर्ण केले.

🔰१० दिवस चाललेल्या स्पर्धेत दिव्याने तिच्यापेक्षा वरचे किताब मिळवलेल्या चार खेळाडूंना बरोबरीत रोखले. तसेच तिने तीन लढती जिंकल्या आणि दोन लढतींत तिला पराभव पत्करावा लागला. शेवटून दुसऱ्या फेरीत सिंगापूरच्या सिद्धार्थ जगदीशला बरोबरीत रोखल्याने दिव्याचा ‘महिला ग्रँडमास्टर’साठी आवश्यक तिसरा निकष पूर्ण झाला.

🔰‘महिला ग्रँडमास्टर’चा किताब पटकावण्यासाठी खेळाडूने एलो २३०० गुण आणि तीन निकष पूर्ण करणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे, अखेरच्या फेरीत हंगेरीच्या पाप लेव्हेंटेला बरोबरीत रोखत दिव्याने आंतरराष्ट्रीय मास्टरचा दुसरा निकष पूर्ण केला. हा किताब मिळवण्यासाठी तिला एलो २४०० गुण आणि तीन निकषांचा टप्पा पूर्ण करावा लागेल. दिव्याला या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे १७.७ आंतरराष्ट्रीय गुण मिळाले.

No comments:

Post a Comment