Friday 3 February 2023

मूलद्रव्य : लिथियम

🅾️सामान्य स्थितीमध्ये अर्थात कक्ष-तापमानाला सर्व स्थायूरूप मूलद्रव्यांमध्ये लिथियम सर्वात हलका धातू आहे. तो चांदीसारखा पांढरा परंतु मऊ असतो आणि चाकूने कापताही येतो. लिथियम साठवून ठेवणं फार कठीण. अति क्रियाशील असलेला हा धातू हवेत उघडा राहिला असता लगेच काळा पडतो व पृष्ठभागावर त्याचे ऑक्साइड तयार होते. म्हणूनच लिथियम पेट्रोलियम जेली लाऊन साठवला जातो. 


🅾️अल्कली धातू असलेला हा लिथियम अग्निजन्य खडकांपासून माहीत झाला, मात्र इतर अल्कली धातू वनस्पतींपासून शोधले गेले. म्हणूनच या मूलद्रव्याला दगड अशा अर्थाने ‘लिथोस’ या ग्रीक शब्दावरून लिथियम हे नाव दिले गेले.

निसर्गात लिथियम मुक्त स्थितीत आढळत नाही; तो सामान्यपणे सर्व अग्निजन्य खडकांमध्ये आणि खनिजांच्या झऱ्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात आढळतो. स्पॉडय़ुमिन, पेटॅलाइट, लेपिडोलाइट, अ‍ॅम्ब्लियगोनाइट या खनिजांपासून लिथियम पुरेशा प्रमाणात मिळते. समुद्राच्या पाण्यात एक कोटी भागांत सुमारे एक भाग इतक्या अल्प प्रमाणात लिथियम आढळतो. नैसर्गिकरीत्या लिथियम (६) वलिथियम (७) ही लिथियमची दोन समस्थानिके आढळतात.


🅾️१७९० साली स्वीडनमधील युटो बेटावर जोस बोनिफॅशियो-द-अ‍ॅद्राल्दा-द-सिल्वा या रसायनशास्त्रज्ञाला पेटॅलाइट हे खनिज आढळून आले. आगीवर या खनिजाची भुकटी फवारली असता ज्योत भडक किरमिजी रंगाची होत असल्याचे त्यांना दिसले. १८१७ साली या खनिजाचे विश्लेषण करत असताना जोहान ऑगस्त आर्फव्हेडसन यांना लिथियम धातूचा शोध लागला. लिथियम हा सोडियमपेक्षा हलका असल्याचे त्यांच्या लक्षात आले, परंतु त्यांना लिथियम वेगळा करता आला नाही. १८२१ साली विल्यम ब्रँडे यांनी लिथियम ऑक्साइडचे विद्युत अपघटन करून अत्यंत कमी प्रमाणात लिथियम वेगळा केला. १८५५ साली रॉबर्ट बुन्सेन (बुन्सेन बर्नरचा जनक) आणि ऑगस्तस मॅथिसन यांनी वितळलेल्या लिथियम क्लोराइडचे विद्युत अपघटन करून ग्रॅममध्ये मोजता येईल, एवढा लिथियम वेगळा केला. १९२३ मध्ये लिथियम क्लोराइड व पोटॅशियम क्लोराइड या संयुगाच्या मिश्रणाचे विद्युत अपघटन करून लिथियमच्या व्यापारी उत्पादनाची पद्धत जर्मनीतील एका कंपनीने शोधून काढली.


No comments:

Post a Comment