Friday, 23 July 2021

अ‍ॅमेझॉनवीराची अवकाशवारी.



अमेरिकेचे अब्जाधीश उद्योगपती जेफ बेझॉस यांनी मंगळवारी त्यांच्या ब्लू ओरिजिन या कंपनीच्या वतीने पहिली साहसी अवकाशवारी पूर्ण केली. स्वत:च्या अवकाशयानातून सफर करणारे ते आठवडाभराच्या अंतरातील दुसरे अब्जाधीश ठरले.


अ‍ॅमेझॉनचे संस्थापक असलेल्या बेझॉस यांच्यासमवेत त्यांचे बंधू आणि इतर दोघे होते. ब्लू ओरिजिन यानाच्या अग्निबाणास न्यू शेफर्ड असे नाव देण्यात आले होते. पश्चिम टेक्सासमधून हा अग्निबाण अपोलो ११ या चांद्रमोहिमेच्या बावन्नाव्या वर्धापनदिनी अवकाशात झेपावला. नंतर सर्व जण तेथेच परतले. व्हर्जिन गॅलक्टिकचे रिचर्ड ब्रॅन्सन यांनी अलीकडे अशाच प्रकारे न्यू मेक्सिकोतून अवकाशवारी केली होती.


बेझॉस यांनी त्यांची योजना आधी जाहीर केलेली असताना ब्रॅन्सन यांनी त्यांची योजना मध्येच जाहीर करून आघाडी मारली होती. ब्रॅन्सन यांचे अग्निबाणयुक्त विमान होते, तर बेझॉस यांची कॅप्सूल होती; पण दोन्ही स्वयंनियंत्रित होते. ब्लू ओरिजिन यान ६६ मैल म्हणजे १०६ कि.मी. उंचीवर गेले होते.  बेझॉस यांचे अवकाशयान १० मैल म्हणजे १६ कि.मी. जास्त उंचीवर जाऊन आले. साठ फूट बूस्टरच्या मदतीने मॅक ३ म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या ३ पट वेगाने कॅप्सूल अवकाशात गेले. नंतर विलग झाले. प्रवाशांना तीन ते चार मिनिटे शून्य गुरुत्वाचा अनुभव घेता आला. त्यानंतर कॅप्सूल खाली जमिनीवर आले तेव्हा त्यांना सहापट गुरुत्व जाणवले. बेझॉस यांचे एक मोठे स्वप्न  पूर्ण झाले. वॅली फंक या महिला वैमानिक त्यांच्यासमवेत होत्या. ऑलिव्हिएर डेमेन यांनी २८ दशलक्ष डॉलर्स भरून या सफरीत पर्यटक म्हणून स्थान मिळवले.

No comments:

Post a Comment