Friday, 30 July 2021

मीराबाई चानु .... 'लाकूडतोड ते अॉलिंपिक पदक!'

 


मीराबाई चा जन्म मणीपूर मधल्या एका खेड्यातला! 'लाकूड' हे घरातलं मुख्य इंधन. मीराबाई लाकडं आणण्यासाठी आपल्या भावंडांबरोबर जायची. सहा भावंडातली ती सर्वात लहान. पण येताना सर्वात जास्त लाकडं ती घेऊन यायची. तिनं आणलेली मोळी तिच्या मोठ्या  भावांनाही  उचलता येत नसे. तिची आई चाणाक्ष होती. आपल्या मुलीला वेटलिफ्टर बनवावं अशी तिची इच्छा होती. पण मीराला मात्र तिरंदाज व्हायचं होतं. मात्र आठवीच्या पुस्तकात तिनं मणीपूरच्याच कुंजराणी देवीवरचा धडा वाचला आणि तिचं जीवनाचं ध्येय ठरलं... वेटलिफ्टरच व्हायचं! 


नंतर खडतर परिश्रम करत राज्य पातळीवर,  राष्ट्रीय पातळीवर तिनं उत्तम चमक दाखवली. आशियाई गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स , जागतिक चँपियनशिप अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धात तिनं सुवर्णपदकं जिंकली. 


पण सर्वात महत्वाची स्पर्धा म्हणजे अॉलिंपिक ! 2015 च्या रिओ अॉलिंपिक मधे तीन प्रयत्नात ही वजन उचलण्यात अपयशी ठरली. तिच्या कारकीर्दीला लागलेला हा फार मोठा डाग होता. 2015 नंतर तिनं वर नमूद केल्याप्रमाणे अनेक पदकं जिंकलेली असली तरी रिओ मधील अपयशाची भरपाई झाली नव्हती. 


त्यातच तिला पाठीच्या दुखण्याचा जबरदस्त त्रास होऊ लागला. दोन-तीन दिवसातून एकदा सराव करणंही अशक्य झालं. तशात कोवीडचं संकट ! लॉकडाऊन मुळे प्रॕक्टिस पूर्णपणे बंद! करियर संपणार की काय अशी सर्वांना धास्ती वाटू लागली. पण केंद्र सरकारनं 71 लाख रुपये खर्च करुन तिला ट्रेनिंग आणि प्रॕक्टिस साठी अमेरिकेत पाठवलं.. अॉक्टोबर 2020 मधे. तिथल्या प्रशिक्षणाचे सुपरिणाम लवकरच दिसू लागले. दररोज सराव करणं शक्य होऊ लागलं. हळूहळू दिवसातून दोनदा सराव करायलाही जमू लागलं. तिची जिद्द, चिकाटी, मेहनत यावर प्रशिक्षक खूष झाले. 


... आणि पुन्हा एकदा मोठ्या परीक्षेचा दिवस उजाडला ... टोकियो अॉलिंपिक ! यावेळी मीरा पूर्ण तयारीत होती. यावेळी रिओची पुनरावृत्ती घडणार नव्हती. 49 कि. गटात तिनं, 'क्लीन अँड जर्क' मधे 115 किलो वजन उचलून नवीन अॉलिंपिक रेकॉर्ड केलं. आणि एकूण 202 किलो वजन उचलून तिनं 'सिल्व्हर मेडल' जिंकलं. संपूर्ण देशात आनंदाची लहर उमटली. 


जे हात  लाकडाची मोळी वाहून आणत होते तेच आज 'अॉलिंपिक पदक' अभिमानानं उंचावत आहेत. अतिशय प्रेरणादायी अशी ही जीवनकथा !

आता शालेय पुस्तकात मीराबाईच्याही जीवनावरचा एक धडा समाविष्ट झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

No comments:

Post a Comment