नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देऊबा हे मंगळवारी पाचव्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. त्यांची नेमणूक पंतप्रधानपदी अध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांनी केली आहे.
राज्य घटनेच्या अनुच्छेद ७६ (५)नुसार ही नेमणूक करण्यात आली आहे, असे ‘दी हिमालयन टाइम्स’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या निकालानुसार ७४ वर्षीय देऊबा यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयाने आदेश दिला होता की, के. पी शर्मा ओली यांना काढून देऊबा यांना पंतप्रधानपदी नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा करावा. अध्यक्षीय सूत्रांनी सांगितले, त्यांच्या कार्यालयाने देऊबा यांची पंतप्रधानपदी नेमणूक करीत असल्याचे कळवले आहे. शपथविधी कधी होणार हे अजून ठरवण्यात आलेली नाही.
तत्कालीन पंतप्रधान ओली यांनी २१ मे रोजी प्रतिनिधीगृह बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय घटनाबाह्य़ होता व त्यामुळे देऊबा यांची पंतप्रधानपदी नेमणूक करण्यात यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. सरन्यायाधीश न्या. चोलेंद्र समशेर राणा यांनी सांगितले की, ओली यांनी पंतप्रधानपदासाठी केलेला दावा अवैध व घटनाबाह्य़ आहे.
No comments:
Post a Comment