Tuesday, 12 March 2024

युपीएससी परीक्षा म्हणजे नेमके काय ???

संघ लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आय.ए.एस.,आय.पी.एस.,आय.एफ.एस. यांसारख्या किमान १६ प्रकारच्या पदांसाठी परीक्षा घेतली जाते. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रीय तरुण मागे पडतात. याबाबत बऱ्याच वेळा चर्चा होताना दिसते. मात्र वस्तुस्थिती अशी आहे, की गेल्या काही वर्षांपासून संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांची संख्या आता वाढण्यास सुरुवात झाली आहे. २०११ मध्ये संघ लोकसेवा आयोगाने आपल्या परीक्षाप्रणालीत मोठा बदल केला. २०११ पूर्वी परीक्षार्थीला सामान्य अध्ययन पेपरबरोबर एक ऐच्छिक विषयाचा पेपर द्यावा लागत असे. २०११ मध्ये हा पूर्वपरीक्षांचे ऐच्छिक पेपर काढून टाकण्यात आला व त्यासाठी सी सॅटचा पेपर ठेवण्यात आला म्हणजे आता पूर्वपरीक्षेत पेपर १ (२०० गुण) आणि पेपर २ (२०० गुण) हे दोन वेगवेगळे पेपर असतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचा व संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षांचा अभ्यासक्रम तंतोतंत सारखा आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्राचा भूगोलाचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना या दोन परीक्षांसाठी स्वतंत्र अभ्यास करावा लागत नाही. एम.पी.एस.सी व यू.पी.एस.सी या दोन्ही परीक्षांची तयारी बरोबरच सुरू केली तर या परीक्षांमध्ये यश मिळविणे सोपे होते.

१) अभ्यासाची सुरुवात :  पदवी परीक्षेचा अभ्यास करीत असतानाच   या परीक्षेची तयारी सुरू केल्यास फायदेशीर ठरते. मात्र काही कारणांमुळे या काळात अभ्यास करणे शक्य झाले नसल्यास  निराश होण्याचे कारण नाही. पदवीनंतर किमान एक वर्ष काही न करता फक्त या परीक्षेची तयारी करावी.

२) तयारी करताना सर्वप्रथम इ. ५ वी ते १० वी पर्यंत एन.सी.आर.टी.ची पुस्तके व्यवस्थित दोन ते तीन वेळेला वाचून टाकावीत. हा तयारीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.

३) अभ्यासक्रम समजून घेऊन काही महत्त्वपूर्ण पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. उदा. आधुनिक भारताच्या इतिहासासाठी बिपिनचंद्र, स्वातंत्र्योत्तर भारत – बिपिनचंद्र, भारतीय राज्यघटना- एम. लक्ष्मीकांत, भारताचा भूगोल – माजिद हुसन,  जिऑग्री थ्रु मॅप – के. सिद्धार्थ, विज्ञान आणि तंत्रज्ञान – विझार्ड पब्लिकेशन तसेच अर्थशात्रासाठी सर्वप्रथम अर्थशात्राच्या संकल्पना समजून दत्ता आणि सुंदरम किंवा रमेशसिंग यांची पुस्तके वाचावीत. मूलभूत पुस्तकांचेच वाचन तीन ते चार वेळा केल्यास जास्त फायदा होतो.

४) यूपीएससी  व एमपीएससी या दोन्ही परीक्षांच्या पूर्वपरीक्षेसाठी सी सॅट पेपर २ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे किंबहुना आपण मुख्य परीक्षेसाठी पात्र होणार किंवा नाही, हे ठरविणारा हा पेपर आहे. या पेपरच्या बाबतीत मोठा विरोधाभास दिसून येतो. तो म्हणजे जे विद्यार्थी विज्ञान शाखेतील, इंजिनीअरिंग शाखेतील आहेत, त्यांना या पेपरची तयारी करणे सोपे जाते. या पेपरमध्ये हे विद्यार्थी सहजतेने पास होताना दिसतात. मात्र जे विद्यार्थी कला, वाणिज्य शाखेतील आहे, त्यांना या पेपरची तयारी करणे अवघड जाते. या पेपरच्या संदर्भात त्यांच्या मनात मोठा न्यूनगंड दिसतो म्हणून अशा विद्यार्थ्यांनी वर्षांच्या सुरुवातीपासूनच दिवसांतील काही वेळ या पेपरच्या तयारीस दिल्यास हा पेपर त्यांच्यासाठी देखील सोपा होऊ शकतो. ज्यांच्या मनात गणिताबद्दल भीती बसलेली आहे, त्यांनी हे लक्षात ठेवावे, की सी-सॅट पेपर २ म्हणजे गणिताचा पेपर नव्हे. मात्र गणित, बुद्धिमत्ता यांचे योग्य नियोजन व तयारी केल्यास ती तयारी या पेपरसाठी उपयोगी ठरते.

६) २०१३ च्या मुख्य परीक्षेत जे विद्यार्थी नियमित वृत्तपत्रांचे वाचन करत होते; तसेच ज्यांना आपल्या अवती-भोवती घडणाऱ्या घटनांबद्दल योग्य ज्ञान होते, त्यांनाच मुख्य परीक्षेचे पेपर सोपे गेले.(२०१३ मध्ये मुख्य परीक्षेसाठी संघ लोकसेवा आयोगाने बदल केला होता तो आपण पुढील भागात पाहणार आहोत.), या परीक्षेत सामान्य अध्ययनाच्या पेपर मध्ये (मुख्य) अडीचशे गुणांसाठी २५ प्रश्न विचारलेले होते. प्रत्येक प्रश्न १० गुणांसाठी होता व १० गुणांसाठी २०० शब्दांची शब्दमर्यादा दिलेली होती म्हणजेच थोडक्यात तीन तासांत ५ हजार शब्द लिहावयाचे होते. या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी लिखाणाचा सराव मोठय़ा प्रमाणात करावा. हस्ताक्षर मात्र वाचनीय असावे.

७) परीक्षा मराठी माध्यमातून की इंग्रजी माध्यमातून द्यावी: मुख्य परीक्षा व मुलाखत आपण मराठी माध्यमात देऊ शकतो. फक्त एक इंग्रजीचा अनिवार्य ३०० गुणांचा पेपर इंग्रजीत लिहायचा असतो. या पेपरचे गुण अंतिम गुणांमध्ये ग्राह्य धरले जात नाहीत. मात्र हा पेपर पास होणे आवश्यक असते. मुख्य परीक्षा ही मराठी माध्यामातून द्यावी की इंग्रजी माध्यमातून द्यावी हा एक नेहमीचा प्रश्न आहे.

जे विद्यार्थी विज्ञान शाखेतील आहेत व ज्यांना इंग्रजी बोलताना थोडी अडचण येते, ते मात्र शेवटपर्यंत गोंधळात असतात की पेपर मराठी माध्यमातून लिहावा की इंग्रजी माध्यमातून. जर मराठी माध्यमातून पेपर लिहिणार असेल, तर अभ्यास साहित्य मराठीतून वाचावे की इंग्रजीतून वाचावे येथून प्रश्नांना सुरुवात होते. खरंतर माध्यमाचा प्रश्न पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर येणार असतो.   जे विद्यार्थी कला, वाणिज्य शाखेतील आहेत व ज्यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतले, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपण मराठी माध्यमातून पेपर लिहिणार असाल, तर मुख्य परीक्षेतील विज्ञान संदर्भात घटकांची तयारी करताना तो घटक मराठीत सांगणे अवघड जाते.  आता मराठी भाषेतून चांगली पुस्तके उपलब्ध झालेली आहेत. थोडक्यात पेपर मराठीतून किंवा इंग्रजीतून लिहावा याबाबत जास्त खल न करता सर्वप्रथम अभ्यासक्रम समजून त्यातील प्रत्येक उपघटकांवर आपली व्यवस्थित पकड निर्माण करावी. एकदा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हे ठरविणे जास्त सोपे होते की माध्यम कोणते निवडावे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...