आता नव्याने आलेल्या मागणीपत्रानुसार नव्या परीक्षांचे वेळापत्रकही तयार केले जात असल्याची माहिती आयोगाच्या सचिव स्वाती म्हसे-पाटील यांनी दिली.
सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील (MPSC) प्रलंबित 2019 व 2020 मध्ये झालेल्या परीक्षांचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होईल. तर सप्टेंबरमध्ये संयुक्त पूर्व परीक्षा आणि राज्य सेवेची मुख्य परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्याचेही नियोजन केले जात आहे. आता नव्याने आलेल्या मागणीपत्रानुसार नव्या परीक्षांचे वेळापत्रकही तयार केले जात असल्याची माहिती आयोगाच्या सचिव स्वाती म्हसे-पाटील यांनी दिली.
मराठा समाजाचे आरक्षण (Maratha reservation) रद्द झाल्यानंतर एसईबीसीतील उमेदवारांना ईडब्ल्यूएस व खुल्या प्रवर्गातून संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तत्पूर्वी, आयोगाच्या माध्यमातून पार पडलेल्या सुमारे 13 परीक्षांचा निकाल पुन्हा जाहीर करावा लागणार आहे. त्यामध्ये प्रारंभी वनसेवा (Forestry), स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering), इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी (Electrical Engineering) या परीक्षांचे निकाल लावले जाणार आहेत. मुख्य परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील, असेही आयोगाकडून सांगण्यात आले. नवीन मागणीपत्रात आता एसईबीसी वगळून ईडब्ल्यूएस व खुल्या प्रवर्गासाठीच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. परंतु, वंजारी व धनगर समाजातील उमेदवारांच्या जागा कमी झाल्याची ओरड उमेदवारांनी केली आहे. त्यासंदर्भातील निर्णय आयोगाकडे नसून सामान्य प्रशासनाकडून त्यात बदल होणे अपेक्षित आहे. दरम्यान, कोरोना काळात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या काही उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात आली असून त्यांना आणखी एक-दोन परीक्षांची वाढीव संधी द्यावी, अशीही मागणी विद्यार्थी संघटनांसह त्या उमेदवारांनी सरकारकडे केली आहे. त्यावर अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही.
नोव्हेंबरपर्यंत नव्या पदांच्याही परीक्षा
राज्यातील कोरोनाची (Covid-19) स्थिती पाहता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील प्रलंबित परीक्षा कधीपर्यंत घेता येतील, याबाबत आयोगाने आपत्ती व्यवस्थापनाला पत्र पाठविले आहे. अजूनपर्यंत त्यांच्याकडून त्यावर काहीच उत्तर मिळालेले नाही. मुंबईसह अन्य जिल्ह्यांमधील मुसळधार पावसामुळे ऑगस्टमध्ये परीक्षा घेणे अशक्य आहे. त्यामुळे संयुक्त पूर्वपरीक्षा सप्टेंबरमध्ये तर राज्य सेवेची मुख्य परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्याचे आयोगाचे नियोजन आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून नव्याने आलेल्या मागणीपत्रानुसार नवीन परीक्षांचे वेळापत्रकही एकाचवेळी जाहीर होईल, अशी तयारी आयोगाने केली आहे.
राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार 2019 व 2020 मध्ये झालेल्या पूर्व परीक्षांचे निकाल 15 दिवसांत लावण्याचे नियोजन केले आहे. वनसेवा, स्थापत्य अभियांत्रिकीसह अन्य काही परीक्षांचे निकाल त्यावेळी जाहीर होतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होईल.
- स्वाती म्हसे-पाटील, सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
No comments:
Post a Comment