🔰तळागाळातील सर्व घटकांचे लोकनेते : नड्डा
मुंबई : दिवंगत ज्येष्ठ भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे हे केवळ एका समाजाचे नेते नसून तळागळातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करणारे लोकनेते होते. त्यामुळे देशातल्या वंचित, गरीब जनतेच्या विकासासाठी कार्य करणे, हीच मुंडे यांच्यासाठी खरी श्रद्धांजली असेल, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी गुरुवारी केले.
🔰मुंडे यांच्या सातव्या पुण्यातिथीनिमित्ताने भारत सरकारच्या टपाल विभागाकडून त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाचा गौरव म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते टपाल पाकिटाचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी दूरसंचार खात्याचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, रावसाहेब दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आदींनी ऑनलाइनच्या माध्यमातून सहभाग घेतला होता.
🔰केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर गरीब जनतेसाठी, त्यांच्या कल्याणासाठी संघर्ष केला. संसदेच्या सभागृहातही त्यांनी सातत्याने गरीब, वंचित घटकांच्या विकासासाठी आवाज उठविला.
🔰गोपीनाथ मुंडे हे लोकनेते व लोकनायक होते. सत्तेविरोधात संघर्ष करतो तोच खरा नेता असतो हे त्यांनी वारंवार त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment