Saturday, 5 June 2021

तैनाती फौज

🔸(सब्‌सिडिअरी फोर्स) हिंदुस्थानात सार्वभौम सत्ता स्थापन करण्यासाठी फ्रेंच आणि इंग्रज यांनी अवलंबिलेली एक उपाययोजना. तैनाती फौजेची सुरूवात प्रथम फ्रेंचांनी केली.

▪️१७४८–४९ मध्ये द्यूप्लेक्स व चंदासाहेब यांच्यात करार होऊन फ्रेंचांनी आपली फौज नबाबाच्या मदतीसाठी ठेवली. त्याबद्दल नबाबने द्यूप्लेक्सला पॉंडिचेरीजवळचा मुलूख तोडून दिला. यातच पुढे इंग्रजांनी सुरू केलेल्या तैनाती फौजेचा उगम आहे. अशाच तऱ्हेचा करार १७६० मध्ये इंग्रजांनी मीर कासीमशीही केला होता.

◾️वॉरन हेस्टिंग्जने थोड्या फार प्रमाणात तैनाती फौजेची योजना अंमलात आणली होती. पण बेलस्लीने हिंदुस्थानात खऱ्या अर्थाने तैनाती फौजेचा प्रसार केला आणि एतद्देशीय संस्थानिकांना ब्रिटिश अंमलाखाली आणले व हिंदुस्थानचे ब्रिटिश साम्राज्यात रूपांतर केले.

◾️वेलस्लीने प्रथम निजामाकडची फ्रेंच फौज काढून टाकण्यास सांगून त्या जागी इंग्रज फौज ठेवून तैनाती फौजेच्या योजनेला मूर्त स्वरूप दिले. पुढे त्याने या योजनेची सक्ती केली व जे एतद्देशीय संस्थानिक फौज ठेवून घेणार नाहीत, अशांबरोबर काहीतरी निमित्त काढून युद्धे केली. उदा., टिपू, दुसरा बाजीराव पेशवा, नागपूरकर भोसले, शिंदे, होळकर इत्यादी. तसेच जे संस्थानिक इंग्रजांची तैनाती फौज ठेवून घेतील, त्यांच्यावर काही अटी लादण्यात आल्या.

🔴त्यापैकी महत्त्वाच्या अटी अशा :

(१) संस्थानिकांनी फौजेच्या खर्चापुरता मुलूख तोडून द्यावा.

(२) इंग्रजांच्या परवानगीशिवाय इतर युरोपीयांस आपल्या पदरी नोकरीस ठेवू नये व परकीय सत्तेशी कोणताही करार करू नये.

(३) आपापसांतील तंट्याचा निकाल इंग्रज करतील तो संस्थानिकांनी मान्य करावा.

(४) तैनाती फौजेचे अधिकारी इंग्रजच असावेत.

(५) संस्थानची देखरेख पाहण्यास रेसिडेंट नावाचा अधिकारी ठेवून घ्यावा. अशा तऱ्हेच्या अनेक अटी घालून वेलस्लीने पेशवे, नागपूरकर भोसले, गायकवाड, शिंदे वगैरे मराठी संस्थानिकांस तसेच म्हैसूर व हैदराबाद येथील सत्ताधारी यांच्या पदरी तैनाती फौज ठेवून त्यांना आपले मांडलिक केले. अशा तऱ्हेने एतद्देशीयांची विरोध करण्याची शक्ती कमी करून इंग्रजांनी आपली सार्वभौम सत्ता प्रस्थापित केली.

⌛️तैनाती फौजेच्या प्रकारामुळे एतद्देशीय संस्थानिकांतील स्वत्व नाहीसे होऊन हिंदुस्थानला लवकरच पारतंत्र्य प्राप्त झाले. या योजनेत अनेक दोष होते. इंग्रजांनी संस्थानिकांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतल्यामुळे संस्थानिकांनी स्वतःची फौज ठेवेण बंद केले. त्यामुळे संस्थानात बंडाळी व लुटालूट वाढली. रयतेला आणि उद्योगधंद्यांना संरक्षण मिळेनासे झाले. संस्थानात ठेवलेली तैनाती फौज सर्व राज्यातील बंडाळीचा मोड करण्यास अपुरी होती. एतद्देशीय राज्यकर्ते क्रमाने परतंत्र बनून बेजबाबदारपणे वागू लागले. त्यांची कारभार करण्याची कार्यक्षमता कमी झाली. जनतेतील लढण्याची शक्तीच नाहीशी होऊन तीही परतंत्र बनू लागली

No comments:

Post a Comment

Latest post

Eklavya

विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE रयत प्रबोधनी : CLICK HERE सारथ...