बीजिंग : चीनमध्ये एच १० एन ३ हा बर्ड फ्लूचा विषाणू माणसात आढळून आला आहे, मानवात हा विषाणू आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने ही घोषणा केली आहे.
झेनजियांग शहरात ४१ वर्षांची एक व्यक्ती बर्ड फ्लूच्या एच १० एन ३ या विषाणूने बाधित झाली असून सध्या त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. हा संसर्ग फारसा गंभीर नसल्याचे सीजीटीएन टीव्हीने म्हटले आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी बर्ड फ्लूची साथ आल्याचा इन्कार केला असून एखादा दुसरा रुग्ण सापडत असल्याचे म्हटले आहे. याचे साथीत रुपांतर होण्याची शक्यता फार कमी असल्याचे स्पष्ट होत आहे.
या रुग्णास एच १० एन ३ इन्फ्लुएंझा झाल्याचे निदान २८ मे रोजी करण्यात आले होते. या व्यक्तीस बर्ड फ्लू कसा झाला हे समजलेले नाही. एच १० एन ३ या विषाणूचे एकही प्रकरण याआधी सापडले नव्हते. एच १० एन ३ हा विषाणू फारसा घातक मानला जात नाही. तो कोंबडय़ांमध्ये आढळून येतो. त्याचा मोठय़ा प्रमाणात प्रसार होण्याची शक्यता कमी असते.
अॅव्हीएन इन्फ्लुएंझाचे अनेक विषाणू प्रकार आहेत. ते चीनमध्ये अस्तित्वात आहेत. काही विषाणू तुरळक प्रमाणात माणसांना संसर्ग करतात. एच ५ एन ८ हा विषाणू इन्फ्लुएंझा ए चा उपप्रकार असून त्याला बर्ड फ्लूचा विषाणू म्हटले जाते. तो कमी संसर्गजन्य असतो आणि तुलनेत माणसांपेक्षा पक्ष्यांना जास्त त्रासदायक ठरतो. एप्रिलमध्ये एच ५ एन ६ अॅव्हीयन फ्लूचा वन्य पक्ष्यातील विषाणू शेनयांग शहरात सापडला होता.
No comments:
Post a Comment