Tuesday, 6 April 2021

राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास; शिक्षणमंत्र्यांची घोषणा


🔶राज्यातील शालेय शिक्षण विभागाने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील करोना स्थिती पाहता, राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

🔶करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचे शालेय शिक्षण विभागाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले. त्यानुसार इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यात आले. मात्र, इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या आणि ऑनलाइन शिक्षणासाठी पुरेशा प्रमाणात साधनांची उपलब्धता नसल्याने, विद्यार्थ्यांना शिकण्यात अडचणी आल्या.

🔶शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात या अडचणी अधिक होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अपेक्षित अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याने, त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. इयत्ता पहिली ते आठवीचा निकाल सर्वंकष मूल्यमापन पद्धतीद्वारे जाहीर केला जातो. मात्र, यंदा जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद, महापालिका अशा सरकारी शाळांमध्ये दोन चाचण्या आणि दोन संकलित मूल्यमापन योग्य पद्धतीने होऊ शकले नाही, अशी माहिती शिक्षकांनी दिली आहे. शहरी भागातील अनुदानित शाळांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या असून, निकाल तयार केला आहे.

🔶मात्र, शैक्षणिक वर्ष संपत असून, आता गुणपत्रके तयार करून निकाल जाहीर करण्याची वेळ आली होती.त्यासाठी कोणती कार्यपद्धती अवलंबण्यात यावी, याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन सूचना मिळाल्या नव्हत्या. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय जाहीर केला. या सर्व पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...