Saturday, 13 March 2021

नीती आयोगाचे ‘SDG इंडिया इंडेक्स आणि डॅशबोर्ड 2020-21'



भारताच्या शाश्वत विकास ध्येय (SDG) निर्देशांकाची तिसरी आवृत्ती नीती आयोगामार्फत प्रकशित केली जात आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ राजीव कुमार हे “SDG इंडिया इंडेक्स आणि डॅशबोर्ड, 2020-21 : पार्टनरशिप इन द डीकेड ऑफ अॅक्शन” प्रकाशित करतील.


भारताने 2030 कार्यसूची साध्य करण्याच्या प्रवासाचा एक तृतीयांश टप्पा पूर्ण केला आहे.


▪️पार्श्वभूमी


“SDG इंडिया इंडेक्स” हा निर्देशांक देशातील SDG प्रगतीवर देखरेख ठेवण्याचे प्राथमिक साधन बनले आहे आणि त्याचबरोबर त्याने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील स्पर्धेला चालना दिली आहे. हा निर्देशांक जागतिक उद्दिष्टे व लक्ष्य पूर्ण करण्याच्या दिशेने देशाच्या राष्ट्रीय आणि उप-राष्ट्रीय पातळीवरील प्रगतीचे मोजमाप करतो.


डिसेंबर 2018 मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. सन 2018-19 मधील पहिल्या आवृत्तीतील 13 उद्दिष्टे, 39 लक्ष्य आणि 62 सूचकांक, द्वितीय आवृत्तीमध्ये 17 उद्दिष्टे, 54 लक्ष्य आणि 100 सूचकांक तर तिसऱ्या आवृत्तीमध्ये 17 उद्दिष्टे, 70 लक्ष्य आणि 115 सूचकांकाचा समावेश आहे.


▪️शाश्वत विकास ध्येये (SDGs) विषयी


2015 सालासाठी ठरविण्यात आलेली सहस्त्राब्द विकास ध्येये (MDGs) यांपासून 2030 सालासाठी शाश्वत विकास ध्येये (SDGs) विकसित झाली आहेत. 2000 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहस्त्राब्द (मिलेनियम) शिखर परिषदेनी ठरविलेल्या 2015 सालासाठीच्या सहस्त्राब्द विकास ध्येये (MDGs) यामध्ये 18 लक्ष्यांसह आठ आंतरराष्ट्रीय विकास ध्येयांची एक सूची होती. हा जगभरातल्या आव्हानांना सोडविण्यासाठी केला गेलेला प्रथम आणि एकमात्र वैश्विक प्रयत्न होता.


शाश्वत विकास ध्येये (SDGs) ही 17 ध्येये, 169 लक्ष्ये आणि 306 राष्ट्रीय निर्देशकांची एक सार्वत्रिक सूची आहे, जे मानवी कल्याणासाठी 2030 सालापर्यंत कोणीही विकासाच्या दृष्टीने मागे राहणार नाही या उद्देशाने मोठ्या यशासाठी विकासात्मक कृतींचे नियोजन करण्यास आणि सुव्यवस्थित करण्यासाठी मदत करतात.


सप्टेंबर 2015 मध्ये झालेल्या ऐतिहासिक संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या शिखर परिषदेत 193 सदस्य राष्ट्रांनी अंगिकारलेल्या आणि दि. 1 जानेवारी 2016 रोजी लागू झालेल्या “ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड: द 2030 एजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट” या पुढाकाराचा हा एक भाग आहे.


सन 2030 साठीची शाश्वत विकास ध्येये (SDGs)


ध्येय 1: दारिद्र्याचे संपूर्ण उच्चाटन


ध्येय 2: शून्य उपासमार (उपासमार थांबवणे, अन्न सुरक्षा आणि सुधारित पोषक आहार साध्य करणे आणि शाश्वत शेतीस प्रोत्साहन देणे)


ध्येय 3: सर्वांसाठी निरोगी आरोग्य आणि सर्व वयोगटातील सर्वांसाठी कल्याणाचा प्रचार करणे


ध्येय 4: सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण (सर्वसमावेशक आणि न्याय गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करणे आणि सर्वांसाठी आजीवन शिक्षण संधींचा प्रचार करणे)


ध्येय 5: स्त्री-पुरुष समानता (लैंगिक समानता प्राप्त करणे आणि सर्व महिला व मुलींना सशक्त करणे)


ध्येय 6: सर्वांसाठी स्वच्छ पाणी आणि स्वच्छता


ध्येय 7: सर्वांसाठी स्वस्त, विश्वासार्ह, शाश्वत आणि स्वच्छ ऊर्जा


ध्येय 8: सर्वांसाठी सभ्य काम आणि आर्थिक वाढ (सतत, सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक वाढ, पूर्णकाळ आणि उत्पादनक्षम रोजगार तसेच सभ्य कामांना प्रोत्साहन देणे)


ध्येय 9: उद्योग, नवकल्पना आणि पायाभूत सुविधा (लवचिक अश्या पायाभूत संरचना तयार करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरणास आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे)


ध्येय 10: असमानता कमी करणे (देशांच्या आतमधील आणि देशांदरम्यान असलेली असमानता कमी करणे)


ध्येय 11: शाश्वत शहरे आणि मानवी वस्ती


ध्येय 12: शाश्वत उपभोग आणि उत्पादन


ध्येय 13: हवामानविषयक कार्य (हवामानातील बदल आणि त्यांचे परिणाम टाळण्यासाठी त्वरित कारवाई करणे)


ध्येय 14: जलजीवन (शाश्वत विकासासाठी महासागर, समुद्र आणि सागरी स्त्रोतांचे संवर्धन आणि सातत्यपूर्ण वापर)


ध्येय 15: थल जीवन (जमिनीवर पर्यावरणविषयक व्यवस्थेच्या शाश्वत वापराला प्रोत्साहन देणे आणि त्यांचे रक्षण आणि पुनर्संचयन करणे, वनांचे शाश्वत व्यवस्थापन करणे, वाळवंटीकरणाशी लढा देणे तसेच भूमी नापीक होण्यास थांबविणे आणि परिस्थितीला उलट करणे आणि जैवविविधतेची हानी थांबविणे.


ध्येय 16: शांती, न्याय आणि बळकट संस्था (सर्वांसाठी न्यायपूर्ण व्यवस्था तयार करणे, शाश्वत विकासासाठी शांतीपूर्ण आणि सर्वसमावेशक मानवी समाजांना प्रोत्साहन देणे, सर्व सर्व स्तरांवर प्रभावी, जबाबदार आणि सर्वसमावेशक संस्था तयार करणे.


ध्येय 17: ध्येयांसाठी भागीदारी (शाश्वत विकासासाठी वैश्विक भागीदारीची अंमलबजावणी आणि पुनरुत्थान करण्यास उद्देशांना भक्कम करणे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...