तुर्कस्तानच्या इस्तांबुल शहरात सुरू असलेल्या बॉस्फोरस बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखत झरीनला पराभवाचा धक्का बसला आहे. महिलांच्या 51 किलो वजनी गटात खेळणाऱ्या निखतचा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तुर्कीच्या बुसेनाडने पराभव केला. या स्पर्धेत स्वप्नवत कामगिरी करणाऱ्या निखतला 5-0 असे हरवत बुसेनाडने स्पर्धेबाहेर ढकलले. त्यामुळे निखतला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात निखतने दोन वेळा विश्वविजेती कझाकिस्तानच्या कझायबे नाझिमचा 4-1 असा पाडाव केला होता. त्याअगोदर तिने गतविजेती रशियाची बॉक्सिंगपटू पल्टेसेवा एकटेरिनाला 5-0 असे पराभूत केले होते.
गौरव सोलंकीलाही कांस्य
पुरुषांमध्ये 57 किलो वजनी गटात खेळणाऱ्या गौरव सोलंकीलाही कांस्यपदक घेऊन भारतात परतावे लागणार आहे. अर्जेंटिनाच्या निर्को कुएलोने गौरवला उपांत्य सामन्यात 5-0 असे हरवत अंतिम फेरीत स्थान मिळवले. 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता गौरव सोलंकीने उपांत्यपूर्व फेरीत इकोल मिझानचा 4-1 असा पराभव केला होता.
भारताचे आव्हान संपुष्टात
या दोघांच्या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. याआधी भारताच्या अन्य महिला बॉक्सिंगपटू सोनिया लादर (59 किलो), परवीन (60 किलो) आणि ज्योती (69 किलो) यांना उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. पुरुषांमध्ये 63 किलो वजनी गटात शिव थापाला तुर्कीच्या हाकान डोगानकडून 1-4 असा पराभव पत्करावा लागला.
No comments:
Post a Comment