Monday, 1 January 2024

एल निनो म्हणजे काय?

अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन या संस्थेकडून अलीकडेच प्रकाशित करण्यात आले आलेल्या अहवालानुसार जून ते ऑगस्ट या काळात 'एल निनो'ची परिस्थिती उद्भवण्याचा अंदाज आहे. भारतात जून ते ऑगस्ट या काळात जवळपास 60 टक्के एल निनो परतण्याचा संस्थेचा अंदाज आहे.


भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) कडून प्राप्त माहितीनुसार हवामानाची जी सध्याची स्थिती आहे, त्यावरून असे दिसून येते की कमकुवत एल निनोच्या संदर्भात इशारा करीत आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांपर्यंत ही स्थिती राहण्याचा अंदाज आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यात आणि मेच्या शेवटपर्यंत याबाबत स्पष्टता मिळणार. तेव्हाच पावसावरील त्याच्या प्रभावाबाबत स्पष्टता दिली जाऊ शकणार.


▪️एल निनो म्हणजे काय?


डिसेंबर महिन्यात दक्षिण अमेरिकेतील किनारपट्टी भागात प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा अचानक वाढते. त्यामुळे होणाऱ्या हवामानबदलास एल निनो म्हणतात.


एल निनो प्रशांत महासागरात तयार होणारा एक जलवायू चक्र आहे, ज्याचा प्रभाव जगभरातल्या हवामानावर पडतो. हा चक्र तेव्हाच सुरू होतो जेव्हा पश्चिम उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरात गरम पाणी दक्षिण अमेरिकेच्या तटाकडे भूमध्य सीमेबरोबर पूर्वेकडे प्रवाहीत होतो.


‘एल-निनो’ परिणाम म्हणजे प्रशांत महासागरात असलेले ताहिती नावाचे बेट आणि पेरू या देशाच्या किनापट्टीजवळून वाहणारा गरम पाण्याचा प्रवाह होय. या गरम पाण्याच्या प्रवाहामुळे हजारो चौरस किलोमिटर क्षेत्रफळावरील पाण्याचे तापमान वाढण्यास सुरुवात होते. ही तापमान वाढ एक अंश सेल्सियसपेक्षा कमी असल्यास त्याचा पावसाच्या अंदाजावर फारसा परिणाम होत नाही. 


परंतु तापमान एक ते दीड अंश सेल्सियसपर्यंत गेल्यास पावसाचा अंदाज वर्तविताना या तापमान वाढीचा प्रभाव विचारात घ्यावा लागतो. एल-निनो तीव्र असल्यास तापमान पाच अंश सेल्सियसपर्यंत वाढते. या वाढलेल्या तापमानामुळे प्रशांत महासागरात पाण्यालगतची हवा गरम होऊन तिचे बाष्पात रुपांतर होते व ती उंचावर निघून जाते. त्यामुळे या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होतो.


हिंदी महासागर व प्रशांत महासागर यांच्यावरील हवेचा दाब एकमेकांशी निगडित असल्याने हिंदी महासागरात जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. चांगला मोसमी पाऊस पडण्यासाठी हवेचा दाब हा कमी असावा लागतो. त्यामुळे एल-निनो आल्यास मोसमी पाऊस भारत व त्याच्या शेजारील राष्ट्रांत कमी पडतो वा पडतही नाही. हा एल-निनो दरवर्षी येतोच असे नाही.


2017 साली निधन पावलेले हवामानशास्त्रज्ञ देव राज सिक्का यांनी 1982 साली पहिल्यांदा एल निनो घटना आणि भारतीय मान्सून यादरम्यान असलेला संबंध प्रस्तावित केला होता.


▪️एल निनोचा प्रभाव :-


विकसनशील देश हे शेती आणि मासेमारी यावर अवलंबून आहेत. ज्या देशांच्या सीमा प्रशांत महासागराला जोडलेल्या आहेत, तेथे हा परिणाम मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागल्याचे अनुभव आतापर्यंत आले आहेत.


गेल्या काही वर्षांत एल निनोमुळे पॅसिफिक महासागरातील समुद्राचा पृष्ठभाग उबदार होऊ लागला आहे. त्यामुळे वाऱ्याच्या वेगात आणि मार्गात बदल होत आहे आणि त्याचा ऋतुमानाच्या चक्रावरही वाईट परिणाम घडू लागल्यामुळे बऱ्याच देशात दुष्काळसदृश्य तर काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होताना दिसून आली आहे. 


▪️एल निनोची लक्षणे :-


अभ्यासानुसार, प्रशांत महासागराचे विषुववृत्तावरील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सतत तीन महिने 0.5 अंश सेल्सियस ते 0.9 सेल्सियसपर्यंत वाढल्यासच एल निनोचा प्रभाव दिसून येतो.


हिंदी महासागराच्या पाण्याचा पृष्ठभाग, तसेच इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियावरील हवेच्या दाबात वाढ होणे. ताहिती, मध्य पूर्व प्रशांत महासागराच्या भागावरील हवेचा दाब कमी होणे.  दक्षिण प्रशांत महासागराच्या भागातील ‘ट्रेड विन्डस्‘ म्हणजेच विषुववृत्तीय भागातून वाहणारे वारे कमकुवत असणे आणि त्यांची दिशा पूर्वेकडे असणे.  


पश्चिम प्रशांत महासागरातले आणि हिंदी महासागरातले उष्ण पाण्याचे प्रवाह पूर्व प्रशांत महासागराकडे पसरणे. त्याचा परिणाम पश्चिम प्रशांत महासागराजवळच्या भागात दुष्काळ आणि कोरड्या पूर्व प्रशांत महासागराच्या भागात पाऊस असा होतो. अश्या अनेक लक्षणांवरून याबाबत निश्चिती करण्यात येते.


उष्ण कटिबंधातील पूर्व मध्य प्रशांत महासागरात सातत्याने पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढण्याने सातत्याने ‘एल निनो’साठी प्रभावी वातावरणनिर्मिती होते. त्यातूनच प्रशांत महासागराकडून वाहणाऱ्‍या वाऱ्‍याचा वेग कमी होतो. त्याचाच परिणाम पूर्वेकडील उत्तर भागातल्या ऑस्ट्रेलियामध्ये पाऊस होतो. प्रामुख्याने भारत, स्वीडन, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, पाकिस्तान या देशांवर परिणाम होतो.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...