भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्यां, प्रभावी वक्त्त्या व कवयित्री. त्यांचा जन्म हैदराबाद येथे सधन कुटुंबात झाला.
त्यांचे पूर्ण नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय (चतर्जी). अघोरनाथांचे मूळ घराणे पूर्व बंगालमधील व गाव ब्रह्मनगर. अघोरनाथ १८७८ मध्ये हैदराबादला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने आले आणि पुढे निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य झाले.
ते शिक्षणतज्ज्ञ व कळकळीचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. सरोजिनींच्या आई वरदासुंदरीदेवी मूळच्या बंगालच्याच. त्या बंगालीमध्ये कविता करीत. सरोजिनींवर अशा सुसंस्कृत पालकांचे संस्कार लहानपणीच झाले.
यांतून त्यांचे कविमन घडले आणि लहानपणीच त्यांना कविता रचण्याचा छंद जडला व स्फूर्ती मिळाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच खाजगीरीत्या झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्या मद्रास प्रदेशात मॅट्रिक परीक्षेत पहिल्या आल्या (१८९२). त्यानंतर सुमारे तीन वर्षे प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या घरीच राहिल्या.
निजामाची छात्रवृत्ती घेऊन पुढे त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या (१८९५). लंडन आणि केंब्रिज येथे थोडे शिक्षण घेतल्यानंतर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून इटली पाहून त्या मायदेशी परतल्या; पण या वास्तव्यात त्यांचा एडमंड गॉस या इंग्रज साहित्य समीक्षकाशी चांगला परिचय झाला.
त्यांनी आपल्या काही कविता त्यास दाखविल्या आणि पुढील काव्यलेखनात गॉस यांचे त्यांस चांगलेच मार्गदर्शन लाभले. द गोल्डन थ्रेशहोल्ड (१९०५) या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहास गॉसनी प्रस्तावना लिहिली आणि हा काव्यसंग्रह त्या वेळच्या साहित्यक्षेत्रात चांगलाच गाजला.
त्याला वृत्तपत्रांतून यथोचित प्रतिसाद मिळाला. रवींद्रनाथ टागोरांनीही सरोजिनींचे कौतुक केले.
No comments:
Post a Comment