Saturday, 27 February 2021

२७ फेब्रुवारी - कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती


जन्म - २७ फेब्रुवारी १९१२ (पुणे)

स्मृती - १० मार्च १९९९ (नाशिक)


"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन्‌ आशा किनारा तुला पामराला' असे स्पष्टपणे सांगणारी अजरामर कविता लिहिणाऱ्या कविवर्य कुसुमाग्रजांची आज जयंती.


वि.वा.शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन करत. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्नवं असे त्यांचे वर्णन करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. 


कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस हा "मराठी भाषा दिवस" म्हणून साजरा केला जातो. मराठी साहित्यातील काव्य, कथा, नाटक या सर्व प्रकारात वैपुल्याने भर घालणाऱ्या आणि आपला ठसा उमटविणाऱ्या कुसुमाग्रजांचे मराठी कवितेत एक अढळ स्थान आहे. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. 


कुसुमाग्रज यांचे वडील शेतकरी होते. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. 


कुसुमाग्रजांनी उठा उठा चिऊताई सारख्या किलबिल कविता लिहिल्या तशाच पृथ्वीचे प्रेमगीत सारख्या गहन कविताही लिहिल्या. ’काढ सखे गळ्यातले’ सारखे लडिवाळ शब्दही त्यांचे आणि ’जे भुक्त त्यांची राहते पोटात सारी संस्कृती’ हे स्पष्टोक्तीचे परखड बोलही त्यांचेच. 


या महान साहित्यिकाचा काव्यव्यासंग अथांग असला तरीही कुसुमाग्रजांचे नाव घेताच डोळ्यापुढे उभा राहतो तो एक ओजस्वी क्रांतिकवी आणि कानी ऐकू येतो गगनभेदी जयघोष, ’गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’. कवी कुसुमाग्रज हे खऱ्या अर्थाने ’क्रांतिकवी’. वयाच्या अवघ्या विशीत कुसुमाग्रजांनी अनेक तेजस्वी क्रांतिकाव्ये लिहिली. 


हुतात्मा चंद्रशेखर आझाद, हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा राजगुरू, हुतात्मा सुखदेव,  हुतात्मा महावीरसिंह या सारखे महात्मे आपले दिव्य करून गेले. क्रांतिकारकारकांच्या बलिदानाची महती गाणारी क्रांतिगीते कुसुमाग्रजांनी लिहिली आणि त्या महात्म्यांची ध्येयगाथा जगाला सांगितली. जे काही ते क्रांतिकारक स्वतः सांगू शकले नव्हते मात्र करून गेले होते ते महान कार्य या क्रांतिकवीने घराघरात व मुखामुखात पोचवले. 


कुसुमाग्रजांचे विशाखा, समिधा, किनारा, हिमरेषा, मराठी माती, वादळवेल, रसयात्रा, छंदोमयी यासारखे कवितासंग्रह आणि नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, कौतेंय या सारख्या नाट्यकृतींचा अभ्यास अजूनही होत आहे. 


‘गर्जा जयजयकार’ सारखी कविता लिहून क्रांतिवीरांना स्फुरण देणाऱ्या कुसुमाग्रजांनी ‘काढ सखे गळ्यातले, चांदण्याचे तुझे हात’ सारखी कविताही लिहिली. ‘नटसम्राट’ मधून नाट्यरसिकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या आणि ‘कल्पनेच्या तीरावर’ सारख्या कादबंरीतून त्यांना खळखळून हसायलाही लावले. 


मा.कुसुमाग्रज यांचे १० मार्च १९९९ रोजी निधन झाले. 


मा.कुसुमाग्रज यांना आदरांजली !

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...