Saturday, 27 February 2021

जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी महत्त्वाची.



🔰महान अष्टपैलू कपिलदेव यांच्या १३१ कसोटींचा विक्रम मोडण्याचा अद्याप विचारही केला नसून सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला पोहोचविण्याचे एकमेव ध्येय माझ्यासमोर आहे, अशी प्रतिक्रिया अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने व्यक्त केली.


🔰मोटेरा येथील सरदार पटेल स्टेडियमवर भारत-इंग्लंड यांच्यातील गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या प्रकाशझोतातील तिसऱ्या कसोटीला बुधवारपासून प्रारंभ होणार आहे. इशांतच्या कारकीर्दीतील हा १००वा कसोटी सामना असणार आहे.


🔰कपिल यांच्यानंतर १०० कसोटी खेळणारा इशांत हा भारताचा दुसराच वेगवान गोलंदाज ठरणार आहे. त्याशिवाय कपिल यांच्या १३१ कसोटींचा विक्रम मोडण्याचीही संधी इशांतला आहे. याविषयी इशांत म्हणाला, ‘‘कपिल यांच्या विक्रमाविषयी मी अद्याप विचारही केलेला नाही. भारतासाठी १००वी कसोटी खेळण्याची संधी मिळणे, हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. सध्या मी ३२ वर्षांचा असून एकाच प्रकारात भारतासाठी खेळत असल्याने तंदुरुस्ती टिकवण्याबरोबरच जोपर्यंत स्वत:चे १०० टक्के योगदान देऊ शकेन, तोपर्यंत निवृत्तीचाही विचार करणार नाही.’’


🔰‘‘जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका फार महत्त्वपूर्ण असल्याने मी सध्या भारताला कशाप्रकारे जिंकवता येईल, याचाच विचार करत आहे. कारकीर्दीत मी एकदाही विश्वचषक खेळलो नाही. त्यामुळे आम्ही जर जागतिक स्पर्धा जिंकली, तर अन्य खेळाडू ज्याप्रमाणे विश्वचषक विजयाचा जल्लोष करतात त्याचप्रमाणे मीसुद्धा या जेतेपदाचा आनंद साजरा करेन,’’ असेही इशांतने सांगितले.

No comments:

Post a Comment