🟠कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादामुळे दोन्ही राज्यांमधील नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. बुधवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणामध्ये वादग्रस्त भागाला केंद्रशासित घोषित करण्याची मागणी केली. त्यानंतर आता भाजपाचे नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणामध्ये प्रतिक्रिया दिलीय.
🟠लक्ष्मण सवादी यांनी, “ज्या क्षेत्रावरुन महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये वाद आहे त्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांची अशी मागणी आहे की मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करण्यात यावा. माझीही हीच मागणी आहे,” असं मत व्यक्त केलं आहे. इतकचं नाही सवादी यांनी मुंबईलाच केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणीही केलीय. “जोपर्यंत मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश केला जात नाही तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात यावं अशी मागणी मी केंद्र सरकारकडे करतो,” असं सवादी म्हणाले आहेत.
🟠कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्यक्त केला. ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद -संघर्ष आणि संकल्प’ पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. “मला आता नुसत्या रडकथा नकोत, तर जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल पडलं पाहिजे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. “सीमाभाग हा कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे. तुम्ही महाराष्ट्रातच आहात.
🟠कर्नाटक सरकार उर्मटपणाने एक एक पाऊल टाकत आहे. एखादं प्रकरण कोर्टात गेल्यानंतर काही करायचं नसतं, तो कोर्टाचा अपमान ठरतो. पण तरीही बेळगावचं नामांतर करण्यात आलं. त्याला उपराजधानी केली गेली. विधीमंडळाचं अधिवेशन केलं जातं. हा न्यायालयाचा अपमान नाही का?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर काही तासांमध्येच सवादी यांनी मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी केलीय.
No comments:
Post a Comment