Tuesday, 12 January 2021

राज्यावर ‘बर्ड फ्लू’चे सावट



लातूर, बीडमध्ये पक्षी-कोंबडय़ांचा मृत्यू; सात राज्यांमध्ये फैलाव

नवी दिल्ली, लातूर, बीड, नगर :  केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे केंद्र सरकारने रविवारी जाहीर केले. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कोंबडय़ा आणि कावळे दगावल्याने राज्यावर या रोगाच्या साथीचे सावट आहे.

महाराष्ट्र आणि दिल्लीत मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे रविवारी केंद्रीय पशुपालन मंत्रालयाने स्पष्ट केले.

महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले नसले तरी लातूर जिल्ह्य़ाच्या अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथे ३५० कोंबडय़ा दगावल्याने भीतीचे वातावरण आहे. कोंबडय़ांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

बीड जिल्ह्य़ाच्या पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे रविवारी २६ कावळे मृतावस्थेत आढळले. तीन कावळ्यांचे अवशेष भोपाळला तर अन्य काही नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, नगर जिल्ह्य़ातील तीन हजार ३२१ कुक्कुटपालन केंद्रांचे सर्वेक्षण जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सुरू केले आहे.

सात राज्यांमधील स्थिती

हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्य़ातील दोन कुक्कुटपालन केंद्रांतून संकलित केलेल्या नमुन्यांच्या अहवालातून कोंबडय़ांना ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग झाल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. त्यामुळे तेथे नऊ शीघ्र प्रतिसाद दले तैनात करण्यात आली असून, साथ प्रतिबंधात्मक उपाययोजनाही केल्या जात असल्याचे केंद्रीय पशूपालन मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.

गुजरात आणि राजस्थानमध्येही ‘बर्ड फ्लू’ची साथ पसरल्याचे निष्पन्न झाले. गुजरातमधील सूरत जिल्ह्य़ातून आणि राजस्थानच्या सिरोही जिल्ह्य़ातून संकलित केलेल्या पक्ष्यांच्या नमुन्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा विषाणू आढळला.

हिमाचल प्रदेशातील कांग्रा जिल्ह्य़ातही ८६ कावळे आणि दोन बगळे मृतावस्थेत आढळले. नहान, बिलासपूर आणि मंडी जिल्ह्य़ातूनही मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे पशुपालन विभागाच्या निवेदनात म्हटले आहे.

छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्य़ातून घेतलेले पक्ष्यांच्या नमुन्यांचा अहवाल आला असून तेथे बर्ड फ्लूची साथ नसल्याचे पशूपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाने निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

मार्गदर्शक सूचना 

‘बर्ड फ्लू’ साथीचा फैलाव झालेल्या सातही राज्यांना साथप्रतिबंध आणि नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय पशूपालन मंत्रालयाने रविवारी दिली.

केंद्राच्या राज्यांना सूचना

’‘बर्ड फ्लू’बाधित भागांतील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय पथके स्थापन करण्यात आली असून ती त्या त्या भागांची पाहणी करीत आहेत, असे केंद्राने सांगितले.

मुंबईतील चेंबूर परिसरातील टाटा कॉलनीजवळ नऊ कावळे रविवारी मृतावस्थेत आढळले. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले. तपासणी अहवाल आल्यानंतर या कावळ्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

No comments:

Post a Comment